
नगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर झाले. आरक्षणानंतर 70 टक्के जागांबाबत समाधान व्यक्त केले गेले. तर 30 टक्के जागांवरील दिग्गजांच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली. आरक्षानंतर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, राजश्री घुले, मंजुषा गुंड, हर्षदा काकडे यांचे गट कायम राहिले. याखेरीज अनुराधा नागवडे, पुष्पा गिरमकर, सुवर्णा जगताप यांनाही संधी चालून आली. हे सगळं पाहता, जिल्हा परिषदेत खऱ्या अर्थाने महिलाराज येण्याची चिन्हे निर्माण झालीत. नेमकं कुठं हुकलं गणित? कुठं जुळला हातचा? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…
2017 ला निवडून आलेल्या अनेक जिल्हा परिषद सदस्यांना यावेळी पुन्हा संधी मिळणार असल्याचे आरक्षणानंतर स्पष्ट झाले. तर काही दिग्गजांची संधी हुकल्याने नाराजीही पसरली. आरक्षणात महिलांना 50 टक्के संधी मिळाल्याने अनेक दिग्गजांना आपल्या जागेवर आपल्या सौभाग्यवतींना उभे करण्याची लाँटरी लागली. शिवाय खुल्या प्रवर्गातील अनेक नेत्यांकडे कुणबी सर्टीफिकेट असल्याने इतर मागास वर्गाच्या जागेवरही अनेकांना संधी मिळणार आहे. काही सदस्यांना मात्र आपला गट आरक्षित झाल्याने दुसरीकडे चाचपणी करण्याची वेळ आली आहे. नेवाशाचे माजी सभापती सुनील गडाख, संगमनेरचे अजय फटांगरे, श्रीरामपूरचे शरद नवले, अकोल्याचे जालिंदर वाकचौरे, नगरचे संदेश कार्ले यांना मात्र यावेळी शांत बसावे लागणार आहे. नगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांत नेमकं काय घडलं, ते आपण थोडक्यात पाहू…
1. अकोला- अकोले तालुक्यातील महिलेला जिल्हा परिषदेचा अध्यक्षा होण्याची संधी आहे. माजी सदस्या सुनीता भांगरे यांचा राजूर गट यावेळी राखीव झाला. गेल्यावेळी त्या खुल्या गटातून निवडून आल्या होत्या. परंतु यावेळी त्यांना त्यांच्या सोयीचे आरक्षण निघाले. धामणगाव गटांतून निवडून आलेले माजी सभापती कैलास वाकचौरे यांना यावेळी थांबावे लागेल. ही जागा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित राहिल्याने त्यांच्याऐवजी त्यांच्या कुटुंबातील महिलेला येथे संधी मिळण्याची शक्यता आहे. सगळ्यात जास्त हिरमोड झाला, भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांचा… वाकचौरे यांचा देवठाण गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला. आरक्षानानंतर तालुक्यातील लहामटे, पिचड व भांगरे गट यावेळी जास्त अँक्टीव्ह दिसू लागला आहे.
2. संगमनेर- ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातही अनेकांचा हिरमोड झाला. माजी सभापती अजय फटांगरे यांचा बोटा गट यावेळी अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला. माजी सभापती मिरा शेटे यांना मात्र साकूर गटातून उभे राहण्याची पुन्हा संधी आहे. भाऊसाहेब कुटे यांचा समनापूर गट ओबीसी महिलेसाठी राखीव झाला. सिताराम राऊत यांचा घुलेवाडी सर्वसाधारण राहिला. तर धांदरफळही खुला राहिल्याने रामहरी कातोरे यांच्यासमोर आव्हान वाढण्याची शक्यता आहे. आ. अमोल खताळ यांनी यावेळी लक्ष घातल्याने या तालुक्यातील सर्व लढती रंगतदार होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
3. कोपरगाव- संवत्सर गटाचे नेते राजेश परजणे यांना यावेळी पुन्हा संधी आहे. संवत्सर गट खुला असल्याने त्यांची सोय झाली. तर दुसरीकडे ब्राम्हणगाव, सुरेगाव, शिंगणापूर व पोहेगाव या गटांत मात्र रंगत वाढली आहे.
4. राहाता- राहाता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक गटांत यावेळी सर्वात जास्त चुरस राहणार आहे. गेल्यावेळी हा गट अनुसूचित जमातीसाठी राखीव होता. यंदा तो खुला झाला. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांचा लोणी खुर्द गट यावेळी ओबीसीसाठी राखीव झाला. हे आरक्षणही त्यांच्यासाठी सोयीचे आहे. त्यामुळे विखेंना पुन्हा संधी मिळणार आहे. याशिवाय पुणतांबा अनुसूचित जातीसाठी, वाकडे अनुसूचित जमातीसाठी, आश्वी ओबीसी महिलेसाठी तर जोर्वे ओबीसीसाठी राखीव आहे.
5. श्रीरामपूर- श्रीरामपूरमध्ये यंदा अनेक फेरबदल झाले. दत्तनगर गट अनुसूचित जातीसाठी तर बेलापूर गट अनूसुचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाल्याने माजी सभापती बाबासाहेब दिघे व शरद नवले यांची अडचण झाली. टाकळीभान गट सर्वसाधारण महिलेसाठी खुला झाल्याने तेथील रंगत वाढली.
6. नेवासा- नेवासा तालुक्यातील आरक्षण हे विद्यमान आ. विठ्ठल लंघे यांच्या सोयीचे निघाले. सातपैकी पाच गटांत महिलांना संधी मिळणार आहे. आ. लंघे यांच्या कन्येसाठी बालेकिल्ला असलेला कुकाणा गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव राहिला. माजी सभापती सुनील गडाख यांना मात्र यावेळी थांबावे लागेल. त्यांचा खरवंडी गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव राहिला. या जागेवर त्यांच्या पत्नी जयश्री गडाख यांना संधी मिळू शकते. सोनई गटांतही यावेळी चुरस राहणार आहे. पूर्वी अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव असलेला सोनई गट यावेळी ओबीसी महिलेसाठी राखीव झाला. या गटांत माजी खा. तुकाराम गडाख विरुद्ध माजी आ. शंकरराव गडाख यांच्या घरातील महिला उभ्या राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
7. शेवगाव- जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले यांचा दहिगाव गट यावेळीही सर्वसाधारण राहिला. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळाली आहे. दुसरीकडे माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांचा लाडजळगाव गटही ओबीसी महिलेसाठी राखीव राहिला. त्यामुळे त्यांनाही पुन्हा संधी मिळणार आहे.
8. पाथर्डी- पाथर्डी तालुक्यातील आरक्षणही सर्व नेत्यांच्या सोयीचे निघाल्याच्या चर्चा आहेत. राहुल राजळे यांचा कासार पिंपळगाव गट सर्वसाधारण राहिला. तर प्रभावती ढाकणे यांचा भालवडगाव गटही खुला राहिला. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. तिसगाव व मिरी या दोन गटांत यावेळी जास्त चुरस दिसण्याची शक्यता आहे. तिसगाव गट खुला तर मिरी गटांत सर्वसाधारण महिलेला संधी असल्याने अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.
9. नगर- नगर तालुक्यातील आरक्षण हे काहींसाठी अडचणीचे ठरले. शरद झोडगे यांचा नागरदेवळे व संदेश कार्ले यांचा दरेवाडी गट अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाला. त्याऊलट वाळकी हा बाळासाहेब हराळ व निंबळक हा माधवराव लामखडे यांच्यासाठी सोयीचा राहिला. जेऊर गट हा ओबीसी महिलेसाठी राखीव झाल्याने यंदा तेथे आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या सूनबाईंना राजकारणाचा श्रीगणेशा करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अक्षय कर्डिले हेही वाळकी गटांतून हराळ यांच्याविरोधात दंड थोपटतील अशी शक्यता वाढली आहे.
10. श्रीगोंदा- श्रीगोंदा तालुक्यातील अनुराधा नागवडे, प्रणोती जगताप, सुवर्णा जगताप, पुष्पा गिरमकर यांच्या सोयीचे आरक्षण निघाले. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात यंदा घमासान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
11. पारनेर- टाकळी ढोकेश्वर, ढवळपुरी या गटांचे आरक्षण पहिल्या फळीतील नेत्यांच्या सोयीचे निघाले. आ. काशिनाथ दाते, माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला येथे संधी असेल. निघोजमधून पुष्पा वराळ यांना पुन्हा संधी मिळू शकते. सुपा गट ओबीसी महिलेसाठी राखीव राहिल्याने खा. निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या पुन्हा निवडणूक रिंगणात उतरतील का, हे पहाणे मनोरंजक ठरणार आहे. मात्र येथेही लंके विरोधी गट प्रबळ असल्याने लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे.
12. कर्जत- माजी अध्यक्ष मंजुषा गुंड यांचा कुळधरण गट ओबीसीसाठी राखीव झाला आहे. या जागेवर त्या किंवा त्यांचे पती राजेंद्र गुंड निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. मिरजगाव, चापडगाव गटात चुरस वाढली आहे. हे दोन्ही गट सर्वसाधारण व सर्वसाधारण महिलेसाठी राहिले आहेत. दुसरीकडे राशीन गट हा ओबीसीसाठी राहिल्याने तेथेही चुरस वाढली आहे.
13. जामखेड- खर्डा गट खुला झाल्याने यापूर्वी अनुसूचित जाती महिलेच्या आरक्षणात निवडून आलेल्या माजी खा. सदाशिव लोखंडे यांच्या सूनबाई वंदना लोखंडे या पुन्हा या जागेवरुन लढतात का, हे पहावे लागणार आहे. याशिवाय खुला असलेल्या साकत गटांतही चुरस वाढली आहे. जवळा गट ओबीसी महिलेसाठी राखीव राहिल्याने येथेही चुरस वाढली आहे.
14. राहुरी- राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी व वांबोरी हे दोन्ही गट खुले झाल्याने येथे चुरस वाढणार आहे. बांबोरी गटांत खुल्या गटांतील महिलेला संधी मिळणार आहे. तर जिल्हा परिषदेची अध्यक्ष होण्याची संधी बारागाव नांदूर गटांतून मिळणार असल्याने या गटांतही कर्डिले-तनपुरे गटांत चांगली लढत होण्याची शक्यता आहे. टाकळीमिया व गुहा गटांतही चांगल्या लढती होणार आहेत.





