Explained

Explained : Sharad Pawar | Rohit Pawar | बालेकिल्ल्या केव्हाच ढासाळलाय, आता खांबही कोसळताहेत…

गेल्या सात वर्षांपासून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असणाऱ्या राजेद्र फाळके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ही फक्त हॅपनिंग बातमी नव्हती. तर गेल्या काही दशकांपासून शरद पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या, नगर जिल्ह्यातील त्यांच्या पक्षाच्या अधोगतीचा विस्फोट होती. शरद पवारासोबत गेल्या कित्येक वर्षांपासून असणारे फाळके नेमके कशामुळे नाराज होते, हे मात्र समजले नाही. परंतु पक्षाचे एकमेव आमदार असणाऱ्या रोहित पवारांसोबत त्यांचे पटत नसल्याच्या चर्चा मात्र सुरु होत्या. पवारांसोबतच्या याच मनमुटावानंतर फाळकेंनी राजीनामा दिलाय का? हे आगामी काळात कळेल. परंतु एकाच वेळी राज्यातील तीन जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, हा पक्षाचे युवा नेते समजल्या जाणाऱ्या रोहित पवारांसाठी मात्र धोक्याचा इशारा ठरला आहे. नेमकं काय चाललंय शरद पवारांच्या राष्ट्रवादीत याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…

राजेंद्र फाळके हे कर्जत तालुक्यातील नेते आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून शरद पवारांचे प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. पंचायत समिती, स्थानिक सहकारी संस्था आदींसह जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदापर्यंतची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे नगर जिल्ह्यातील शरद पवार गटाच्या सर्वच उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी होती. स्वतःचा कर्जत-जामखेड मतदारसंघ वगळता ते सगळीकडे दिसले होते. फाळके यांचे काम पाहता, त्यांना यापूर्वीही अजित पवार गटाकडून अनेकदा ऑफर आल्या होत्या. परंतु तरीही त्यांनी शरद पवारांची साथ सोडली नव्हती. परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीच त्यांनी आपल्या राजीनाम्याचा बाँम्ब टाकल्याने नगरच्या राजकारणाच खळबळ उडाली.

फाळके यांनी राजीनामा का दिला? या चर्चा आता सुरु झाल्यात. राजीनाम्याचं खरं कारण समोर आलं नसलं तरी, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे दिलेल्या राजीनाम्यात त्यांनी कौटुंबिक कारणातून राजीनामा दिल्याचं म्हणणं आहे. परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून राजकारणात असलेल्या फाळकेंचं हे कारण पटण्यासारखं नाही. मग राजीनाम्याचं कारण नेमकं काय? याबाबतच्या चर्चा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुरु केल्यात. एवढंच कशाला, तर त्यांच्या विरोधकांनीही सुरु केल्यात. या राजीनामा अस्त्रामागे, आ. रोहित पवारांची कार्यशैली हे कारण असू शकते का? असंही बोललं जाऊ लागलं आहे.

राष्ट्रवादीचे पूर्वीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, यांच्यासोबत फाळके यांचे चांगले जमत होते. आता राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलला. या बदलानंतर मात्र आता हळूहळू राष्ट्रवादीच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांचा असंतोष उफाळून येतोय. या आठवड्यात बुलढाणा, हिंगोली व नगर अशा तीन जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला. हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी तर थेट अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला. बुलढाण्याच्या जिल्हाध्यक्ष रेखा खेडकर याही लवकर दुसऱ्या पक्षात जाण्याची चर्चा सुरु झालीय. राजीनामा दिलेले नगरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळकेही अस्वस्थ आहेत.

आता ही सगळी अस्वस्थता, फिरुन-फिरुन आ. रोहित पवार यांच्यापर्यंतच येऊन पोहोचतेय. अतिआक्रमकपणा, इतरांच्या मतांचा आदर नसणे, स्वतः भावी मुख्यमंत्री म्हणून मिरवणे वगैरेंमुळे रोहित पवारांवर त्यांच्या पक्षातील नेत्यांची व कार्यकर्त्यांची नाराजी वाढत चालल्याचे सांगितले जात आहे. राज्याचं सोडा, नगर जिल्ह्यातही रोहित पवारांना आपल्या पक्षाचा नेता होता आले नाही, हे वास्तव आहे. रोहित पवार ज्या कर्जत-जामखेड मतदारसंघाचे नेतृत्व करतात, त्या मतदारसंघातही त्यांना आपला प्रभाव टिकवता आला नाही, असे बोलले जात आहे. गेल्या महिन्यांत, शरद पवारांचे कट्टर कार्यकर्ते व जामखेडचे माजी सभापती दत्ता वारे यांनी पक्षाला रामराम ठोकला. त्यापूर्वी मधुकरआबा राळेभात यांनीही रोहित पवारांची साथ सोडली. आता तर थेट पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळकेही पक्ष सोडून गेलेत. हे सगळं का होतंय..? याचा विचार शरद पवारांनी करायला हवा.

नगर जिल्ह्यात गलितगात्र झालेली, शरद पवारांची राष्ट्रवादी आता रुळावर येणारच नाही, असं संदर्भ सांगितले जाऊ लागले आहेत. खा. निलेश लंके यांना पक्षात घेण्यास अनेक स्थानिक नेत्यांचा विरोध होता. त्यात आ. रोहित पवारही होते, असेही त्यावेळी बोलले गेले. परंतु तरीही शरद पवारांनी लंकेंना आपल्या पक्षात घेतले. लंके खासदार झाल्यावर, पक्षाची भरभराट होण्याऐवजी वाताहत झाली. रोहित पवार व निलेश लंके यांच्यात नसलेला संवाद, हेही त्यातले एक कारण असावे, असे आता बोलले जात आहे. मुळातच रोहित पवारांकडे नम्रता व सर्वसमावेशकपणा नाही, अशी तक्रार अनेकदा झालीय. रोहित पवारांचे अनेक निर्णय व वक्तव्य त्यांना स्वतःला व पक्षाला नुकसानकारक ठरले आहेत. आता मोठ्या नेत्याची हीच धरसोड जिल्ह्यातील शरद पवार गट नामषेश होण्याची सुरुवात समजावी काय, असा प्रश्न पडू लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button