Explained

Explained : सातेवाडी, देवठाण, बोटा की बारागाव नांदूर… ZP च्या अध्यक्षपदाची संधी कुणाला?

जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हटलं जातं. त्यामुळे गाव पातळीवरील नेत्यापासून मुख्यमंत्र्‍यांपर्यंत, सगळेच या निवडणुकीत लक्ष घालतात. सोमवारी जिल्हा परिषदेच्या गट व पंचायत समित्यांच्या गणांची आरक्षण सोडत जाहीर झाली. जिल्हा परिषदेच्या 75 गटांत, कोठून कोणत्या जातीचा सदस्य येईल, हे जाहीर झाले. अध्यक्षपदाचे आरक्षण, यापूर्वीच जाहीर झाले होते. जिल्हा परिषदेची अध्यक्ष यावेळी अनुसूचित जमातीतील महिला होणार, हे यापूर्वीच फिक्स झालेले होते. गटाच्या आरक्षणानंतर, जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान कोणत्या गटातून मिळू शकतो, हे समजले. अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी 75 पैकी, चार गट आरक्षित राहिले. त्यामुळे या चारपैकी एका गटांतूनच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडून येणार आहे. त्यामुळे हे चार गट कोणते व अध्यक्ष कोण होणार, याच्या चर्चा वाढल्या आहेत. नेमक्या काय आहेत शक्यता, याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट.

नगर जिल्हा परिषद ही 75 सदस्यांची आहे. सोमवारी कोणत्या गटांतून कोणत्या समाजाचा प्रतिनिधी निवडून येईल, याबाबतचे आरक्षण निघाले. या आरक्षणानंतर अनेक दिग्गजांना धक्का बसला. खुल्या प्रवर्गातील अनेक इच्छुक गप-गार झाले. तर काहींना आपल्या घरातील महिलांना आता ऐनवेळी पुढे करावे लागणार आहे. दुसरीकडे यापूर्वी जे गट आरक्षित होते, ते खुले झाल्याने अनेकांची बल्ले बल्ले झाली. पाथर्डी व श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक सर्वसाधारण गट राहिल्याने, या दोन्ही तालुक्यांतील लढती रंगतदार होणार आहेत. अनेक इच्छुकांनी आत्तापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधले आहेत. नेवासा तालुक्यात सातपैकी पाच गटांत, महिला निवडून येणार आहेत. तर अकोल्यात पाच, श्रीरामपूरात व राहात्यात प्रत्येकी तीन व अहिल्यानगर तालुक्यांत दोन गट राखील झाल्याने तेथील इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.

जिल्हा परिषदेच्या इच्छुकांचा विचार करता, माजी अध्यक्ष शालीनी विखे, राजश्री घुले, मंजुषा गुंड, राजेश परजणे, क्षितिज घुले, अर्जुन शिरसाठ यांचे मार्ग मोकळे झाले आहेत. हे नेते ज्या-ज्या गटांतून निवडून आले होते, ते गट व गण खुले राहिलेत. तर माजी सभापती सुनील गडाख, कैलास वाकचौरे, संदेश कार्ले, हर्षदा काकडे, अशा अनेक दिग्गजांचे ते-ते गट मात्र आरक्षित झाले. या सर्वांना आता पर्यायी गट शोधावे लागणार आहेत. माजीमंत्री गडाखांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नेवाशातही आता, सातपैकी पाच गटांत महिलांना संधी मिळणार आहे. विद्यमान आमदार विठ्ठल लंघे यांचे प्रभुत्व असणारे भेंडे बुद्रुक व भानसहिवरे हे दोन गट मात्र खुले राहिले आहेत.

आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा विचार केला तर ते अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी यापूर्वीच आरक्षित झाले आहे. या पदासाठी चार महिला गट सोमवारी आरक्षित राहिले. अकोल्यातील सातेवाडी व दैवठाण, संगमनेर तालुक्यातील बोटा व राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर हे चार गट अनुसूचित महिलासाठी राखीव झाले. म्हणजेच या चार गटांतूनच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरणार आहे. आता या चारही गटांत सत्ताधारी व विरोधकांना जोर लावावा लागणार आहे. अध्यक्षपदासाठीची महिला उमेदवार कोण, यासाठी मात्र आता चांगलाच खल होणार आहे. त्यातल्या त्यात सातेवाडी, देवठाण व बारागाव नांदूर या गटातील महिला जिल्हा परिषद अध्यक्ष होईल, अशा शक्यता जास्त आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button