Explained

Explained : Sangamner Nagar Palika | थोरातांना पालिका जड जाणार; विखे-खताळ पुन्हा ‘गेम’ करणार

संगमनेर नगर पालिकेचे आरक्षण जाहीर झाले. नगराध्यक्षपदी सर्वसाधारण महिलेला संधी मिळणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा थोरातांकडून दुर्गाताई तांबे या मैदानात उतरतात का? याची उत्सुकता वाढली आहे. दुसरीकडे महायुतीकडे गमावण्यासारखे काहीच नसले तरी, थोरातांना पुन्हा एकदा जोर का झटका देण्याची त्यांची तयारी सुरु आहे. तेच ते चेहरे, निष्क्रीयता, नाराजी हे तिन्ही मुद्दे थोरातांना यावेळीही अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. नगरपालिकेवर 30 नगरसेवकांत 15 महिला असल्याने खऱ्या अर्थाने महिलाराज येणार आहे. याच महिलांचा भरणा महायुतीकडे जास्त असल्याच्या चर्चा आहे. त्यामुळे नगरपालिकेची ही निवडणूक चांगलीच चुरशीची होण्याची शक्यता आहे. काय आहेत संगमनेर नगरपालिकेची गणिते याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…

संगमनेर नगरपालिकेची निवडणूक गेल्या 3-4 वर्षांपासून रखडली होती. आता ती जाहीर झाली. नगराध्यक्षपदी महिला असणार हे स्पष्ट झाले. शिवाय 30 नगरसेवकांतही 15 महिलांना संधी मिळणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने संगममनेरमध्ये महिलाराज येईल. विशेष म्हणजे, आरक्षण सोडतीला एकही महिला उपस्थित नव्हती. परंतु उपस्थित असणाऱ्या पतीराजांनी आपल्या सौभाग्यवतींसाठी परफेक्ट डावपेच मात्र सुरु केले आहेत. चौकाचौकात शुभेच्छा बँनर, प्रभागातील गाठीभेटी, दिवाळी शुभेच्छांचे व्हाट्सअँप स्टेट्‍स यांची रेलचेल सुरु झाली आहे. एवढंच कशाला, शुभकार्य-अशुभकार्यातही उपस्थिती वाढू लागली आहे. सोशल मिडिया सांभाळणारेही अनेकांनी नियुक्त केल्याने प्रभागा प्रभागात शुभेच्छा व अपडेट वाढल्या आहेत.

संगमनेर नगरपालिका गेली कित्येक वर्षे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या हातात होती. 1980 पासून पालिकेवर त्यांचेच वर्चस्व राहिलेय. नगरपालिका जेव्हा स्थापन झाली तेव्हा पहिल्यांदा ती थोरातांच्याच ताब्यात गेली. त्यावेळीही त्यांचे मेहूणे डाँ. सुधीर तांबे हे पहिले नगराध्यक्ष होते. त्यानंतर थोरातांच्या भगिनी व आ. सत्यजित तांबे यांच्या मातोश्री, दुर्गाताई तांबे यांनीही कित्येक टर्म नगराध्यक्षपद सांभाळलं. त्या लोकनियुक्त नगराध्यक्षही राहिल्या. यापूर्वी दोनदा थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला गेलेला होता. परंतु पहिल्या दोन वेळेचा अनुभव पाहता थोरातांना यावेळीही नगरपालिका निवडणूक अवघड जाईल, असे संदर्भ दिले जात आहेत.

सर्वप्रथम 2001 मध्ये जनतेतून नगराध्यक्ष निवडला गेला. त्यावेळी शिवसेना-भाजप युतीत ही जागा भाजपच्या वाट्याला गेली. भाजपने ज्ञानेश्वर करपे यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसकडून विश्वास मुर्तडक उभे राहिले. राष्ट्रवादीनेही सवता सुभा केला. राष्ट्रवादीने सोमनाथ अभंग यांना उमेदवारी दिली. काँग्रेसविरोधातील मते विभागली गेल्याने, थोरातांचे समर्थक असलेले विश्वास मुर्तडक काठावर विजयी झाले. 2016 सालीही थेट जनतेतून नगराध्यक्षांची निवड झाली. काँग्रेसने थोरातांच्या भगिनी दुर्गाताई तांबे यांना उमेदवारी दिली. परंतु यावेळी शिवसेना व भाजप स्वतंत्र लढली. राष्ट्रवादीनेही स्वतंत्र उमेदवार उभा केला. त्यामुळे काँग्रेसविरोधी मतांची तीन पक्षात विभागणी झाली आणि अवघ्या 16 हजार मतांनी दुर्गाताई तांबे नगराध्यक्ष बनल्या.

आताही महिलेला नगराध्यक्ष होण्याची संधी आहे. परंतु कधीकाळी थोरातांचा बालेकिल्ला असलेले संगमनेर मात्र बदलले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत थोरातांच्या 40 वर्षांच्या अबाधित गडाला शिवसेनेच्या अमोल खताळांनी सुरुंग लावला आहे. संगमनेरचे इतर राजकीय संदर्भही बदलले आहेत. संगमनेरच्या चौका-चौकात हिंदूत्वाचा नारा ऐकू येऊ लागला आहे. यापूर्वी अनेक वर्षे थोरातांची सत्ता असल्याने, आता बदलाचे वारे वाहू लागले आहेत. तेच तेच उमेदवार, घराणेशाही आणि साचलेपण यामुळे थोरातांचा संगमनेरमध्ये पराभव झाला. तिच स्थिती आता नगरपालिका निवडणुकीतही दिसण्याची शक्यता आहे. थोरातांनी चेहरे बदलले तर विरोध वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे त्यात-त्याच कुटुंबाला संधी दिली तरी, नाराजी वाढण्याची शक्यता आहे. त्याऊलट महायुतीकडे गमावण्यासारखे काहीच नाही. शिवाय हिंदूत्वाच्या झेंड्याखाली तरुणांची संख्या जास्त आहे. नवे चेहरे महायुतीकडे असल्याने संगमनेर पालिका महायुतीकडे येईल, अशी गणिते आता जुळू लागली आहेत.

महायुतीत संगमनेर पालिकेवर शिवसेनेचा दावा आहे. दुसरीकडे विधानसभेला शिवसेनेला संधी दिल्यामुळे यावेळी भाजपचा नगराध्यक्ष व्हावा, अशीही काहींची इच्छा आहे. राज्यात भाजप-शिवसेना युती होईल, अशा शक्यता आहेत. परंतु राज्यात काहीही झाले, तरी संगमनेरमध्ये मात्र विखे-थोरात गट एकत्र निवडणूक लढविणार असे सांगितले जात आहे. या दोन्ही नेत्यांचे ट्युनिंग पाहता, सकारात्मक चर्चा व सकारात्मक परिणाम दिसण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे थोरातांना या निवडणुकीत जास्त ताकद लावावी लागणार हे निश्चीत झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button