
स्वतःचं घर घेण्यासाठी आयुष्यभराची पुंजी खर्च केली, गृहकर्जही घेतलं… पण घराची मूळ कागदपत्रं बँकेकडे जमा आहेत ! मग तुम्हीच त्या घराचे कायदेशीर मालक आहात, हे सिद्ध कसं करणार ?
तर मंडळी, यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोंदणीकृत खरेदीखत! घराची मालकी सिद्ध करण्यासाठी हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे.
दुसरं म्हणजे जुन्या मालकीची कागदपत्रं. घराची मालकी यापूर्वी कोणाकडे होती आणि ती कशी हस्तांतरित झाली, हे यातून समजतं.
तिसरं म्हणजे फेरफार नोंद. मात्र, केवळ या नोंदीवरून मालकीचा अंतिम निर्णय होत नाही.
याशिवाय मालमत्ता कराच्या पावत्या, वीजबिल, पाणीबिल आणि बँकेच्या कर्जाशी संबंधित कागदपत्रंही जपून ठेवा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट! गृहकर्जाची परतफेड पूर्ण झाल्यानंतर बँकेकडून मूळ कागदपत्रं, कर्जफेडीचं प्रमाणपत्र आणि ना-हरकत
प्रमाणपत्र म्हणजेच एनओसी घ्यायला विसरू नका. मूळ खरेदीखत बँकेकडे असल्यास संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयात त्याची प्रत मिळवण्याची प्रक्रिया जाणून घ्या. मालकीबाबत शंका असल्यास मालमत्ता वकिलांचा सल्ला घ्या.





