
अहिल्यानगरच्या राजकीय इतिहासात गेल्या दीड वर्षात असं काही घडलंय, ज्याने संपूर्ण जिल्हा सुन्न झालाय… जिल्ह्याचा राजकीय कणा आणि एकमेकांचे व्याही असलेले तीन बलाढ्य नेते… अवघ्या दीड वर्षाच्या काळात एकापाठोपाठ एक काळाच्या पडद्याआड गेले.
२ मे २०२५ रोजी ज्येष्ठ नेते अरुणकाका जगताप यांचं निधन झालं. त्यानंतर अवघ्या ५ महिन्यांत, म्हणजेच १७ ऑक्टोबर २०२५ ला त्यांचे व्याही आणि भाजपचे धडाडीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी जगाचा निरोप घेतला. आणि आता… २४ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांचे तिसरे व्याही, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर यांचंही हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं.
आज सकाळी त्यांना शहरातील एका रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशी अनेक पदे त्यांनी भूषविली होती.
दीड वर्षांच्या आत अहिल्यानगरने आपले तीन दिग्गज नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे ‘ढाणे वाघ’ गमावले. राजकारणातील या तीन व्याही नेत्यांच्या अकाली जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. तिन्ही लोकनेत्यांना अहिल्यानगर लाईव्ह २४ कडून भावपूर्ण श्रद्धांजली!





