Explained

मृत माणसाला जिवंत करणारी ‘संजीवनी विद्या’ महाराष्ट्रात कुठे लुप्त झाली? पहा, कोपरगावचं महारहस्य

मृत्यूवर विजय मिळवणं शक्य आहे का हो..? विज्ञान सांगतं—नाही. हे अशक्यच! पण, थांबा, थांबा… हजारो वर्षांपूर्वी याच भारताच्या भूमीत एक असा मंत्र उच्चारला जात होता, ज्यामुळं, मृतदेहातही प्राण फुंकले जायचे. मेलेला माणूस जागा व्हायचा. आपण ज्या जागेला फक्त नगर जिल्ह्यातील उत्तरेतील एक तालुका म्हणून ओळखतो, ते कोपरगाव खरंतर जगातील सर्वात मोठ्या रहस्याचं केंद्र आहे..! याच भूमीत देवांचा थरकाप उडवणारी विद्या, म्हणजे मृतसंजीवनी मंत्राची विद्या जन्मली. आणि ही विद्या जन्माला घालणारे महान विभूती होते, दैत्यगूरु शुक्राचार्य… आज आपण कोपरगावच्या भूमीचा हाच पौराणिक इतिहास उलगडणार आहोत, जो अनेकांना माहितही नाही. या व्हिडीओत आम्ही काही ऐकीव व काही लिखित संदर्भ गुंफले आहेत.

कोपरगाव… गोदावरीच्या कुशीत वसलेलं हे क्षेत्र प्राचीन काळापासून अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. पण या भूमीचं महत्त्व फक्त पौराणिक नाही, तर ऐतिहासिकही आहे. कोपरगावात पाऊल ठेवताच आपल्याला आठवण होते ती मराठा साम्राज्यातील एका अत्यंत वादग्रस्त आणि पराक्रमी पात्राची—ते म्हणजेच रघुनाथराव पेशवे उर्फ राघोबादादा. अटकेपार झेंडे रोवणाऱ्या मराठ्यांच्या इतिहासात राघोबादादांचे नाव जितके पराक्रमासाठी घेतले जाते, तितकेच ते नारायणराव पेशव्यांच्या हत्येच्या कटातील संशयासाठीही घेतले जाते. याच कोपरगावात राघोबादादांनी आपला भव्य वाडा बांधला होता. आज हा वाडा पडक्या अवस्थेत असला, तरी त्याच्या भिंतींमध्ये अनेक गुप्त रहस्ये दडलेली आहेत. असं म्हटलं जातं की, या वाड्यापासून थेट गोदावरी नदीच्या पात्राखालून जाणारा एक गुप्त भुयारी मार्ग होता. शत्रूपासून वाचण्यासाठी आणि गुप्त हालचालींसाठी याचा वापर केला जायचा. ज्या कोपरगावाने पेशवाईचा सुवर्णकाळ आणि पडझड दोन्ही पाहिली, त्या भूमीचा इतिहास इथेच संपत नाही, तो थेट जोडला गेलाय सतयुगाशी!

आता आपण वळणार आहोत अशा एका रहस्याकडे ज्याचा संबंध थेट विश्वाच्या निर्मितीशी आहे. हिंदू धर्मग्रंथांनुसार, जेव्हा देव आणि दानवांमध्ये अमृतासाठी समुद्रमंथन झाले, तेव्हा ती घटना नेमकी कुठे घडली होती? पुराणातील संदर्भांनुसार, नगर जिल्ह्यातील नेवासा परिसराजवळ या समुद्रमंथनाचे भौगोलिक आणि आध्यात्मिक धागेदोरे जोडलेले आहेत. देव आणि दानवांनी वासुकी सर्पाची दोरी करून जेव्हा क्षीरसागर मंथन केले, तेव्हा त्यातून १४ रत्ने बाहेर पडली. पण या समुद्रमंथनानंतर दानवांची अवस्था दयनीय झाली. देवांना अमृत मिळाले आणि दानव अमरत्वापासून वंचित राहिले. आपल्या असूर शिष्यांवर होत असलेला हा अन्याय पाहून, महर्षी भृगु यांचे पुत्र आणि दैत्यांचे गुरू शुक्राचार्य अत्यंत क्रोधित झाले. दानवांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना देवांच्या तोडीस तोड शक्ती देण्यासाठी शुक्राचार्यांनी एका शांत, पवित्र आणि सुरक्षित जागेचा शोध सुरू केला. शोध घेता घेता ते गोदावरीच्या तीरावरील घनदाट दंडकारण्यात आले—ती जागा म्हणजेच आजचे श्री क्षेत्र बेट, कोपरगाव…

कोपरगावात आल्यानंतर दैत्यगुरू शुक्राचार्यांनी भगवान शिवशंकराची अत्यंत कठोर तपश्चर्या सुरू केली. ही साधना एवढी भयानक होती की स्वतः देवराज इंद्रही घाबरला होता. शुक्राचार्यांचा हेतू एकच होता—अशी विद्या मिळवणे जी निसर्गाच्या नियमांनाही बदलू शकेल..!

अखेर, महादेवाने प्रसन्न होऊन शुक्राचार्यांना ती विद्या दिली, जिला ब्रह्मांडात ‘मृतसंजीवनी विद्या’ किंवा ‘संजीवनी मंत्र’ म्हटले जाते. या विद्येची ताकद अशी होती की, युद्धात मारल्या गेलेल्या कोणत्याही असुराच्या कानात जर हा मंत्र फुंकला, तर तो क्षणार्धात जिवंत होऊन पुन्हा उभा राहायचा! या एकाच विद्येच्या जोरावर दानवांनी देवांना अनेक युद्धांमध्ये पराभूत केलं. पण, विज्ञानाला आणि मृत्यूला आव्हान देणारी ही विद्या पुढे एका मोठ्या धोक्यात आली… आणि तिथेच जन्मली एक अमर प्रेम आणि शापाची कथा!

शुक्राचार्यांकडे मृत माणसाला जिवंत करण्याची शक्ती आहे, हे जेव्हा देवांना कळाले, तेव्हा त्यांनी देवांचे गुरू बृहस्पती यांचा मुलगा ‘कच’ याला ही विद्या शिकण्यासाठी शुक्राचार्यांकडे पाठवले. कच हा ओळख लपवून, शिष्य बनून कोपरगावात शुक्राचार्यांच्या आश्रमात आला. गोदावरी नदीच्या उत्तर तीरावर आज जे कचेश्वर मंदिर आहे, तिथे इतर शिष्यांसोबत कच राहायचा. आणि रोज नदी ओलांडून तो दक्षिण तीरावरील शुक्राचार्यांच्या आश्रमात विद्या शिकायला यायचा. याच काळात शुक्राचार्यांची कन्या देवयानी ही कचाच्या प्रेमात पडली. असुरांना संशय आला की कच हा देवांचा गुप्तहेर आहे, म्हणून त्यांनी कचाला तीन वेळा मारून टाकले! पण दरवेळी देवयानीच्या हट्टापायी शुक्राचार्यांनी संजीवनी विद्येचा वापर करून कचाला पुन्हा जिवंत केले.

-असं म्हणतात की, पहिल्यांदा :
असुरांनी कचाचा वध करून त्याचे शरीर लांडग्यांना खाऊ घातले. शुक्राचार्यांनी मंत्राद्वारे लांडग्यांच्या पोटातून कचाला पुन्हा जिवंत केले.
-दुसऱ्यांदा :
असुरांनी कचाला मारून त्याचे शरीर समुद्रात फेकून दिले. शुक्राचार्यांनी पुन्हा मंत्राचा वापर करून त्याला समुद्रातून जिवंत बाहेर काढले.
-तिसरा प्रकार तर आणखी भयंकर होता :
असुरांनी कचाला मारले. त्याचा मृतदेह जाळला. आणि त्याची राख शुक्राचार्यांच्या मद्यात मिसळली. देवयानीला हे सगळं उमगलं. तेव्हा तिनं आपले वडील शुक्राचार्यांना मंत्र म्हटण्याचा आग्रह केला. कन्या देवयानी हिच्या सांगण्यावरून शुक्राचार्यांनी मंत्र म्हटला, तेव्हा राख बनून पोटात असलेला कच पोटातच जिवंत झाला. शेवटी स्वतःचा जीव देऊन शुक्राचार्यांनी कचाला पोटातच विद्या शिकवली आणि कच पोट फाडून बाहेर आला व त्याने त्याच मंत्राने आपले गुरू शुक्राचार्यांना पुन्हा जिवंत केले.

हे सगळं घडलं, फक्त एका प्रेमकथेनं. देवयानीचं कचावर प्रचंड प्रेम होतं. देवयानीच्या याच प्रेमापुढं तिचे वडील शुक्राचार्यही हरले… पण जेव्हा कचाने विद्या शिकून परत स्वर्गात जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा देवयानीने त्याला लग्नाची मागणी घातली. कच म्हणाला, ‘मी तुझ्या वडिलांच्या पोटातून जन्माला आलोय, त्यामुळे तू माझी बहीण आहेस. यावरून रागावलेल्या देवयानीने कचाला शाप दिला की, ‘तू शिकलेली संजीवनी विद्या तुला ऐनवेळी कधीच आठवणार नाही!’ आणि अशा प्रकारे ती महान विद्या याच कोपरगावच्या मातीत कायमची लुप्त झाली…

मित्रांनो, हा सगळा इतिहास आणि पौराणिक वारसा आजही कोपरगावच्या या बेटावर जिवंत आहे. हे जगातील एकमेव असे मंदिर आहे जिथे शुक्राचार्यांची तपस्वी रूपातील मूर्ती पाहायला मिळते. आणि सर्वात अद्भूत गोष्ट म्हणजे, या मंदिराच्या परिसरात लग्नकार्यासाठी कोणताही शुभ मुहूर्त, पंचांग किंवा राशी पाहण्याची गरज नसते! येथे कधीही केलेले लग्न स्वतः शुक्राचार्यांच्या आशीर्वादाने नेहमी सुखी आणि यशस्वी होते, अशी भक्तांची ठाम श्रद्धा आहे. विज्ञानाला थक्क करणारी ही संजीवनी मंत्राची भूमी, आज आपल्या नगर जिल्ह्यात असूनही अनेकांना याबद्दल माहीत नाही. हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button