
श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगावमध्ये मंगळवारी सकाळी दोन घटनांमुळे नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगली. नागनाथ महाराजांच्या पिंडीजवळ पहाटे पाचच्या सुमारास साप आढळला. त्याचवेळी गावातील हनुमान मंदिरातील दगडी मूर्तीतून पाण्याची धार वाहताना दिसली. बातमी पसरताच परिसरातील भाविकांनी मंदिरांकडे धाव घेतली.
चांदगाव, घोडेगाव, आढळगाव आणि कुळधरण परिसरातूनही नागरिक दर्शनासाठी दाखल झाले. मात्र, या दोन्ही घटनांमागे अंधश्रद्धा नसून नैसर्गिक आणि वैज्ञानिक कारणे असू शकतात, असे जाणकारांनी स्पष्ट केले.
मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी असल्याने वातावरण थंड राहते. त्यामुळे उष्णतेच्या काळात साप अशा थंड ठिकाणी येऊ शकतात.
तर दगडातील सूक्ष्म छिद्रे, जमिनीतील ओलावा, नैसर्गिक भेगा किंवा वातावरणातील आर्द्रतेमुळे मूर्तीतून पाणी बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





