
अहिल्यानगर शहरातील जुन्या इमारती आणि सोसायट्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता नवीन नळ जोडणी किंवा ड्रेनेज लाईन मिळवण्यासाठी केवळ अर्ज करून चालणार नाही. अर्जासोबत इमारतीची बांधकाम परवानगी आणि वैध स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अर्ज मिळाल्यानंतर महापालिका अभियंता प्रत्यक्ष जागेची पाहणी करणार आहेत. इमारतीची कागदपत्रे तपासण्यासोबतच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि घनकचरा किंवा जैव-गाळ व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध आहे का, हेही पाहिले जाणार आहे.
या कामामुळे इमारतीला किंवा परिसरातील वीज, गॅस, पाणी आणि ड्रेनेज जोडण्यांना धोका निर्माण होणार नाही, याचीही खात्री केली जाईल.
अभियंत्याचा अहवाल सकारात्मक असल्यास अर्जदाराकडून बंधपत्र घेतले जाईल. त्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतरच अंतिम पाहणी करून नळ जोडणी मंजूर केली जाणार आहे.





