
अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाच्या झळा वाढत असताना पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. जिल्ह्यातील तब्बल तीन लाख ३१ हजार २३३ नागरिकांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाकडून किती टँकर धावत आहेत? आकडा ऐकून तुम्हालाही धक्का बसेल!
जिल्ह्यातील १६१ गावांमधील ९६१ वाड्या-वस्त्यांना सध्या १६९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये चार शासकीय, तर १६५ खासगी टँकरचा समावेश आहे. विशेष म्हणजे, पाथर्डी तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता सर्वाधिक असून, ६२ गावांतील ३५१ वाड्या-वस्त्यांना ७४ टँकरद्वारे पाणी पोहोचवले जात आहे.
कर्जत तालुक्यात २२, शेवगावमध्ये २०, तर नगर तालुक्यात १९ टँकर सुरू आहेत. पारनेर, संगमनेर, नेवासा, जामखेड आणि श्रीगोंदे तालुक्यांमध्येही पाणीपुरवठ्यासाठी टँकरची मदत घेतली जात आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानुसार प्रशासनाकडून पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. मात्र, तीन लाखांहून अधिक नागरिकांची तहान टँकरवर अवलंबून असणे, ही जिल्ह्यातील पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती दर्शवते.





