Explained

Vivek Kolhe नी आभार मानल्यानंतर विखेंसोबतचा वाद संपणार का? नेमक्या शक्यता काय?

महाराष्ट्राच्या राजकारणातला तालेवार जिल्हा कोणता? तर नगर जिल्हा… विखे, कोल्हे, थोरात, काळे, गडाख, घुले, तनपुरे अशी काही घराणी आहेत, जी गेल्या पाच-सहा दशकांपासून नगरचं राजकारण हाकताना दिसतात. या घराण्यांमध्ये टोकाचे वाद किंवा संघर्ष असला तरी, त्यांनी सहकाराचे नुकसान मात्र कधी होऊ दिले नाही. आपापले बालेकिल्ले, कधीच निसटू दिले नाहीत. हा आता गेल्या दशकापासून नगर बदललंय. निष्ठा, प्रेम, आदर, हे शब्द मागे पडलेत. सोयीचं राजकारण सुरु झालं. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या सगळ्यात पक्षात वेळेला महत्त्व आलंय. त्यातल्या त्यात भाजपनं मात्र काही तत्व पाळलीत.

अशाच तत्वशील राजकारण्यात, लोणीचे विखे व कोपरगावचे कोल्हे ही दोन घराणे आजही नगरच्या मातीत फुल्ल टू रुजताना-वाढताना दिसताहेत. या दोन्ही घराण्यात पूर्वीपासून काही तात्वीक वाद राहिलेत. परंतु स्व. बाळासाहेब विखे व स्व. शंकरराव कोल्हे यांनी, त्यांच्यातील दुरावा मात्र वाढू दिला नाही. पुढे दुसऱ्या पिढीतही मंत्री राधाकृष्ण विखे व माजी आ. बिपीन कोल्हे यांनी हे तत्व पाळले. परंतु आता या दोन्ही घराण्याच्या तिसऱ्या पिढीत मात्र, काही टोकाच्या मुद्यांवर संघर्ष दिसला. कदाचित, बदलत्या राजकीय परिस्थितीत या संघर्षाला हवा दिली गेली किंवा तो कायम रहावा, यासाठी काहींनी प्रयत्न केले, असंही म्हणता येतं.

आता विखे-कोल्हेंच्या तिसऱ्या पिढीतील हाच संघर्ष, शुक्रवारी पुन्हा एकदा चर्चेत आला. निमित्त होते, नगर शहरात झालेल्या महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांच्या सत्कार समारंभाचे… या कार्यक्रमात नूतन आमदार विवेक कोल्हे यांनी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डाँ. सुजय विखे पाटील यांचे थेट नाव घेऊन आभार मानले. अर्थात, या आभारानंतरही काहींनी त्यात टोला, चिमटा वगैरे शोधलाच. परंतु हा मुद्दा जर पाँझिटीव्ह अँगलने घेतला तर या दोन्ही घराण्यांचा मनमुटाव संपतोय, असंही म्हणता येतं.

आठ दिवसांपूर्वी लोणी येथे झालेल्या एका कार्यक्रमात डाँ. सुजय विखे पाटील यांचं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं. हे वक्तव्य करण्यापूर्वीचे काही संदर्भ पाहिले, तर भाजपचे नूतन विधान परिषद आमदार विवेक कोल्हे यांच्याबाबतच ते बोलत होते, हे पत्रकारांनी हेरलं. कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली. विधानसभा निवडणुकीत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर माघार घेतली होती. त्याचं फळ त्यांना दोन वर्षांनी मिळालं.

आता या विजयानंतरच्या कोपरगावातील मिरवणुकीत विवेक कोल्हेंनी मिशा पिळल्या, दंड थोपाटले आणि पुष्पा स्टाईल जल्लोष केला. हाच जल्लोष लोणीच्या विखेंना खटकला. तेव्हा डाँ. सुजय विखे पाटील हे पाठीच्या आजाराने उपचार घेत होते. ते सक्रीय राजकारणात नव्हते. परंतु कोल्हेंची व्हायरल झालेली पुष्पा स्टाईल, डाँ. सुजय विखेंना आवडली नव्हती. अखेर लोणीच्या एका कार्यक्रमात त्यांनी याच स्टाईलचा नाव न घेता समाचार घेतला.

ते म्हणाले, “काहींना कारखान्याचं चेअरमन, आमदार झालं पाहिजे अशी इच्छा असते. त्यांची त्यासाठी धडपड सुरु असते. परंतु मला आमदार व्हायचं असतं, तर मी दोन महिन्यांपूर्वीच झालो असतो. आता काही नवीन पोरं सत्ता घेऊन फिरत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की, सत्तेचा आनंद मर्यादीत ठेवा. आज तुम्ही ज्या पदाचा उपभोग घेत आहात, ते पद आम्ही सोडल्यामुळेच तुम्हाला मिळालंय. आम्हाला लोकांमध्ये जाण्यासाठी कोणत्याही पदाची गरज नाही. मी नसतं फिरलो तरी लोकं, पुष्पगुच्छ घेऊन येतात….”

आता विखे हे कुणासाठी बोलले, हे सगळ्यांना समजलं. त्यानंतर शुक्रवारी, जिल्ह्यातील भाजपच्या सगळ्याच नूतन आमदारांचा सत्कार समारंभ झाला. या कार्यक्रमात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते. डाँ. सुजय विखे पाटील या कार्यक्रमाला नव्हते. परंतु तरीही सत्काराला उत्तर देताना, कोल्हेंनी विखेंची आवर्जून आठवण काढली. “विधान परिषदेसाठी सुजय विखे पाटील हेही इच्छुक होते. परंतु त्यांनी या पदाचा त्याग केल्यामुळे आपल्याला ही संधी मिळाली. त्याबद्दल सुजय विखे पाटील यांचेही आभार,” असं म्हणत कोल्हेंनी मनाचा मोठेपणा दाखवला.

कोल्हेंच्या याच वक्तव्यानंतर भाजपमधील हे दोन्ही नेते आता मनानेही एकत्र येतील, असे अंदाज बांधले जाऊ लागले. या दोन्ही नेत्यांमधील शाब्दीक वादावर यामुळे पडदा पडल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. आता तसा विचार केला तर, लोणीचे विखे व कोपरगावचे कोल्हे यांच्यात पूर्वीपासून वाद होता का? तर नाही. स्व. बाळासाहेब विखे व स्व. शंकरराव कोल्हे यांच्यात फक्त मतभेद होते. दोघेही वेगवेगळ्या पक्षाचे व विचारधारेचे नेते असल्याने त्यांच्यात काही काळ फक्त संघर्ष राहिला. गेली सुमारे ६५-७० वर्षे ‘विखे फॅक्टर’ हा नगर जिल्ह्याच्या राजकारणाचा परवलीचा शब्द राहिलाय.

राजकारणाला आवश्यक असलेला लोकसंग्रहाचा गुण, धूर्तपणा, अभ्यासू वृत्ती, संघटनकौशल्य, नवीन संस्थांच्या उभारणीतून लोककल्याणाची आस, हे सर्व गुण एकवटलेले दुर्मिळ व्यक्तिमत्त्व म्हणजे बाळासाहेब विखे. नगर जिल्ह्याने अनेक मातब्बर राजकीय नेते दिले. मात्र, गल्लीपासून दिल्लीपर्यंत खऱ्या अर्थाने प्रभावी फक्त बाळासाहेब विखेच राहिले. दिल्लीत महाराष्ट्र म्हटले की, शरद पवार केंद्रात जाण्याआधी सर्वांना फक्त विखेंचेच नाव ठाऊक होते. ४५ खासदार आपल्याबरोबर घेऊन त्यांनी स्व. राजीव गांधी यांना आव्हान दिले होते.

तब्बल सात वेळा खासदार, केंद्रात अर्थ राज्यमंत्री व अवजड उद्योगमंत्री अशी पदे भूषवलेले खासदार बाळासाहेब विखे विरुद्ध जिल्ह्यातील इतर प्रस्थापित मंडळी, असा राजकीय संघर्ष गेली कित्येक वर्षे सुरू होता. तसाच संघर्ष विखे विरुद्ध कोल्हे असाही राहिला. परंतु तो तात्वीक राहिला. या दोन्ही नेत्यांचे व्यक्तिगत संबंध अत्यंत सलोख्याचे राहिले. गोदावरी कालव्यांचा प्रश्न, सह्याद्रीच्या कुशीतील छोटी-मोठी धरणे, नगर-नाशिक-मराठवाड्याचा पाणी संघर्ष अशा सगळ्यात प्रश्नांत विखे-कोल्हे हे दोन्ही नेते सोबत राहिले.

परंतु गेल्या दहा वर्षांत याच घराण्याच्या तिसऱ्या पिढीत मात्र नव्याने मतभेद झाले. काहींच्या मते हे मतभेद लावले गेले. गणेश कारखाना निवडणुकीपासून ही दरी वाढत गेली. गणेश कारखान्याचा मुद्दा व युतीही काहींनी जाणीवपूर्वक केली. त्यातून विखे व कोल्हे एकमेकांपासून दूर गेले. त्यातूनच कोल्हे व विखे घराण्याच्या युवा नेत्यांमध्ये काही शाब्दीक खटके उडाले. परंतु आता बदललेली राजकीय समि‍करणे ओळखून हेच कोल्हे पुन्हा विखेंशी सलोखा राखतील, अशा चर्चा रंगल्या आहेत.

विखेंनी खरंच विधान परिषद निवडणूक सोडली नसती, तर कोल्हेंना आमदार होण्यासाठी अजून वाट पहावी लागली असती, हेही तितकेच खरे आहे. परंतु आता या दोन्ही युवा नेत्यांमधील दरी कमी होऊन दोघेही एक होतील, अशा शक्यता वाढल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button