साईंची शिर्डी हे राज्यातील, देशातीलच नव्हे तर जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान. येथील अन्नछत्रही जगप्रसिद्ध आहे. रोज हजारो भाविक येथे मोफत अन्नसेवेचा लाभ घेत होते. तिरुपती देवस्थानमध्ये जसा लाडू दिला जातो, तसाच येथील लाडूही प्रसिद्ध आहे. शिर्डी संस्थानतर्फे लाडू हाच येथील मुख्य प्रसाद म्हणून दिला जातो. पण, पण… थांबा… गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा आणि सबुरीच्या याच तिर्थक्षेत्री चिरंजीव नावाचा पेढा गाजतोय. जून महिन्यांत याच पेढ्यांचा गोडवा थेट अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात घुमला. त्यानंतर पुन्हा १५ दिवसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी, शिर्डीतील आणखी काही ब्रँण्डच्या पेढ्यांचा गोडवा चाखला.
नमुने ताब्यात घेतले आणि तब्बल दोन लाख रुपये किंमतीचा ६०० किलो पेढा जमीनीत खड्डा घेऊन पुरुन टाकला. अर्थातच, हा पेढा नित्कृष्ठ दर्जाचा होता, हे सांगावे लागले नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून भाविकांच्या आरोग्याशी सुरु असलेला खेळ आता कुठे एफडीएच्या नजरेस पडला. एफडीए आत्तापर्यंत झोपलं होतं का? हा प्रश्न निराळा… परंतु हे सगळं किती धक्कादायक आहे, या चर्चा या कारवाईनंतर सुरु झाल्या. शिर्डीतल्या चिरंजीव पेढ्यांचा इतिहास तर याहून भयंकर…. आता शिर्डीतल्या या पेढ्यांचा गोरखधंदा नेमका काय? आणि धाडीत काय हाती लागलंय?
शिर्डीत प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याच्या तक्रारी यापूर्वी अनेकदा केल्या गेल्या. परंतु, आएएस तुकाराम मुंडे यांनी या विभागाचा कारभार हाती घेतल्यावर, नगरच्या एफडीए विभागाची झोपमोड झाली. ८ व ९ जूनला या पथकानं शिर्डीतील पेढ्यांच्या दुकानांवर छापे टाकले. काही दुकानांतील माल ताब्यात घेतला. या कारवाईत अनेक धक्कादायक गोष्टी बातम्यांमधून निदर्षनास आल्या. बुरशीयुक्त पेढे, खराब पेढे, बनावट खव्याचे पेढे, साखरेच्या पाकात केमिकल टाकून तयार केलेले पेढे, असं सगळं या कारवाईतून समोर आलं. साईंचे देशविदेशातील भक्त प्रसादाच्या नावाखाली काय खात होते, हे त्यावेळी उघड पडलं. प्रसादाच्या पाकीटावर उत्पादकाचे नाव नसणे, उत्पादनाची तारीख नसणे, एक्स्पायरी डेट नसणे, याबाबीही उघड झाल्या. देशभर या धाडीची चर्चा रंगली.
आता बुधवारी पुन्हा एकदा एफडीएच्या पथकानं शिर्डीत पेढ्यांच्या दुकानांवर व उत्पादन केंद्रांवर धाडी टाकल्या. अन्न व औषध प्रशासन, दुग्ध विकास विभाग व वजनमापे निरीक्षक यांच्या संयुक्त पथकानं शिर्डीच्या गल्लीबोळीत धाडसत्र राबवलं. अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करुन शिर्डीत पेढे तयार होत असल्याच्या तक्रारी अजूनही येताहेत. त्यात अनुषंगाने हे धाडसत्र राबविल्याचं सांगितलं गेलं. बुधवारी सकाळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी शिर्डीतील प्रमुख पेढ्यांची दुकाने, विक्री आस्थापना, उत्पादन केंद्रे यांची तपासणी केली.
मंदीर परिसरातील अनेक उत्पादन केंद्रांची तपासणी केली. हे सगळे पेढे नित्कृष्ठ दर्जाचे आहेत, हे प्राथमिक पाहणीत पथकाला दिसले. त्यानंतर सर्व पेढ्यांचे नमुने घेऊन तब्बल ६०० किलो माल या पथकानं ताब्यात घेतला. काही नमुने सिलबंद करुन प्रयोगशाळेला पाठवले. परंतु, याचा अहवाल यायला बरेच दिवस लागणार आहेत. त्यामुळे जे डोळ्यांनी दिसलं, तिच भेसळ, अस्वच्छता ग्राह्य धरुन या पथकानं तब्बल दोन लाखांचा माल नष्ट केला. शिर्डी नगरपालिकेच्या डंपिंग ग्राऊंडवर हा माल नेऊन तो पुरुन टाकण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रिकरण व पंचनामेही करण्यात आले.
अचानक झालेल्या या कारवाईनंतर पेढा उत्पादक व मिठाई व्यावयासिकांमध्ये खळबळ उडाली. तपासणी सुरु झाल्याचे कळताच, काहींनी तातडीने हालचाली करत काहीतरी काळंबेरंही केलं. अर्थात या चर्चा आहेत. आम्ही असा दावा करत नाहीत. परंतु जशी पेढ्यांवर वक्रदृष्टी पडली तशीच वक्रदृष्टी हाँटेल, रेस्टाँरंट, मिठाईचे इतर पदार्थ यावरही पडावी, अशी साईभक्तांची अपेक्षा आहे. धार्मिक स्थळांवरील अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत सरकारनं सतर्क रहावं, अशी सामान्यांची इच्छा आहे. आता प्रयोगशाळेचा अहवाल काय येतो आणि या उत्पादकांना काय शिक्षा होते, हे नंतर समजेल. परंतु अशा कारवाईंत सातत्य असावं, एवढीच साईभक्तांची इच्छा आहे.
शिर्डीत विकला जाणारा चिरंजीव पेढा हा सगळ्याच जास्त चर्चेत आहे. आता हा पेढा कसा तयार होतो, हे आम्ही सांगितलं तर तुमच्याही तोंडाची चव जाईल. दुकानांमध्ये विकले जाणारे पेढे जास्त दिवस तसेच राहिले तर ते खराब होतात. किंवा कडक होतात. या पेढ्यांवर बुरशी येते. मग हेच पेढे दुकानदार पुन्हा उत्पादकांकडे पाठवतात. अर्थात माल खरेदी करतानाच हा अलिखित करार झालेला असतो. माल विकला गेला नाही, तर विशिष्ट दिवसांत उत्पादक तो परत घेतात. परत घेतात तेव्हा, तो १०० टक्के खराब झालेलाच असतो.
मग याच खराब झालेल्या पेढ्यांचा नवा प्रवास सुरु होतो. या पेढ्यांचा भुगा केला जातो. तो कुटला जातो. मग जे मिश्रण तयार होते, त्यात नवी साखर, नवा खवा आणि दूध व पाणी घालून त्याला चिखल तयार केला जातो. हा चिखल गरम करतात. मग ते गरम झाल्यावर पु्न्हा मशिनमध्ये घालून किंवा हाताने फेटून त्यापासून पुन्हा पेढे तयार केले जातात. म्हणजेच एकदा केलेला पेढा मरत नाही. तो पुन्हा नवा जन्म घेतो, यालाच चिरंजीव पेढा म्हटले जाते… काय चिरंजीव शब्दाचा अर्थ समजला ना…?
आता हाच पेढा गेली कित्येक वर्षे, शिर्डीत आकर्षक लेबल लावून विकला जात होता, असा आरोप आहे. हे पेढे खाण्यात अत्यंत अपायकारक आहे, असं एफडीएचं म्हणणं आहे. अगदी १०० ते २०० रुपये किलोला हा चिरंजीव पेढा विकून आरोग्याशी खेळ केला जात होता. या पेढ्यांवर, पहिलं धाडसत्र ९ जुलैला व दुसरं धाडसत्र २४ जुलैला पडलं. आता त्याचा अहवाल आल्यावर आरोग्याशी खेळणाऱ्या महाभागांवर कारवाई होईल, अशी आपण अपेक्षा करूयात…





