Latest

शिर्डी प्रसादालयात चपाती उशिरा मिळाली म्हणून राडा, कर्मचाऱ्यांना धमक्या ? शिवसेना नेत्यावर गुन्हा

शिर्डी साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात चपाती उशिरा मिळाल्याच्या कारणावरून मोठा वाद झाला आहे. या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोपरगाव तालुकाप्रमुख भरत मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्री साईबाबा संस्थानच्या सशुल्क भोजन हॉल क्रमांक १ मध्ये भरत मोरे जेवणासाठी आले होते. यावेळी चपाती देण्यास काहीसा विलंब झाल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांशी जोरदार वाद घालत मोठ्याने आरडाओरडा केल्याचा आरोप आहे. यावेळी त्यांनी आपल्या सहकाऱ्याकडून संपूर्ण प्रकाराचे मोबाईलवर चित्रीकरण करून घेतले.

तसेच, “मी तुम्हाला काम करू देणार नाही,” अशी धमकी देत प्रसाद वाटपाच्या कामात अडथळा आणल्याचाही आरोप आहे. यानंतर भरत मोरे यांनी प्रसादालयातील चपाती आणि पापड निकृष्ट असल्याचा दावा करत संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. यामुळे संस्थानची प्रतिमा जाणूनबुजून मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांना धमकावणे, कामकाजात अडथळा निर्माण करणे, चुकीची माहिती पसरवणे आणि संस्थेची बदनामी केल्याप्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button