
मंडळी, विधान परिषदेवर नियुक्त झालेल्या भाजप आमदार सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, प्राजक्त तनपुरे आणि विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेले अक्षय कर्डिले यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. कार्यक्रमात सर्वाधिक चर्चा झाली ती आमदार प्राजक्त तनपुरे आणि त्यांचे मामा जयंत पाटील यांच्याभोवती.
प्रकृती अस्वस्थ असल्याने प्राजक्त तनपुरे यांनी सत्कार स्वीकारताच कार्यक्रमातून लवकर बाहेर पडले. यावर बोलताना प्रा. राम शिंदे म्हणाले, “तनपुरे अजूनही भाजपमध्ये थोडे अवघडलेले दिसतात. कारण त्यांचे मामा जयंत पाटील अजूनही शरद पवार राष्ट्रवादीत आहेत.”
यानंतर भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी मिश्कील टोला लगावत म्हटले, “भाच्यानंतर आता मामांनाही आपल्या पक्षात घ्या.” यावर प्रा. राम शिंदे यांनी चेंडू थेट राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कोर्टात टाकत, “जयंत पाटलांची जबाबदारी आता विखेंवर,” अशी टिप्पणी केली. त्यावर सभागृहात एकच हशा पिकला आणि हा संवाद कार्यक्रमातील चर्चेचा मुख्य विषय ठरला.





