Explained

Sharad Pawar यांनी राहुरीत नेमकी काय जुळवाजुळ केली? तनपुरेंचं टेन्शन वाढलं…

गेल्या आठवड्यात ठाकरेंचे सहा खासदार फुटले. तीन वर्षांत शिवसेनेत दोनदा भुकंप झाला. महाराष्ट्राच्या राजकारणात तत्व, निष्ठा, आदर, सन्मान हे सगळं बासनात गुंडाळलं गेलंय, हे आता जाणवू लागलंय. धरसोड करणाऱ्या खासदारांत, आपल्या शिर्डीचे वाकचौरेही होते. ठाकरेंकडे भुकंप झाल्यावर, नेहमीप्रमाणे शरद पवारांच्या गटाबाबतही चर्चा सुरु झाल्या. ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन तुतारीही होईल, असे अंदाज बांधले गेले. कारण, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जशी ठाकरेंची स्थिती आहे, तशीच स्थिती पवारांचीही आहे. शरद पवार गट सध्या भांबावलाय. परंतु राजकीय चाणक्य म्हणविल्या जाणाऱ्या शरद पवारांनी याच बातम्यांची दखल घेत, पुढच्या २४ तासांत पायाला भिंगरी बांधली.

गेल्या चार-पाच दिवसांपासून पवार महाराष्ट्रभर हिंडताहेत. बुधवारी ते नगरमध्येही आले. आधी संगमनेर, नंतर लोणी, त्यानंतर राहुरी आणि अहिल्यानगर, अशा काही तासांच्या दौऱ्यात, त्यांनी पत्रकारांना विचार करायला अनेक विषय दिले. पवारांनी संगमनेरमध्ये थोरातांची भेट का घेतली? लोणी खुर्दमध्ये ते घोगरे कुटुंबाकडे का गेले?या प्रश्नांसोबतच, पवार राहुरीत का थांबले? हा प्रश्नही चर्चीत आला. कुणाला फरक पडो न पडो, पण पवारांनी तनपुरेंचं टेन्शन मात्र वाढवलं. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात… अशी तनपुरेंची स्थिती झालीय. आता ती का?

महाराष्ट्राचं राजकारण सध्या चांगलंच गोंधळलंय. फाटा-फुटीच्या गणितानं आणि आकडेमोडीनं डोक्याचा पार भुगा केलाय. परंतु याच गोंधळात ८५ वर्षांचा तरुण मात्र पुन्हा नव्या डावपेचांना आकार देतोय. आता हे आम्ही कुणाबाबत सांगतोय, तर ज्येष्ठ नेते शरद पवारांबाबत… होय, वयाच्या ८५ व्या वर्षीही, भाजपला टक्कर देण्याची ताकद फक्त पवारांमध्ये आहे. आणि हे आजही सत्यच आहे. कुणी साडेतीन जिल्ह्याचे जिल्हे-ईलाही म्हणो, नाही कुणी गावठी चाणक्य म्हणो, पवार साहेब राजकारण ढवळण्याची ताकद ठेवतात, हे तितकंच खरंय.

जुनमध्ये ठाकरे गटाला दुसऱ्यांदा सुरुंग लागला. ऑपरेशन टायगर सक्सेस झालं. ठाकरेंचे सहा खासदार थेट एकनाथ शिंदेंकडे गेले. दोन तृतीआंश बहुमतासाठी, भाजपची कसरत सुरु असल्याच्या चर्चा रंगल्या. ठाकरे गटाच्या बातम्यानंतर विश्लेषक थेट शरद पवार गटाकडे वळाले. शरद पवार गटातील खासदारांची आकडेमोड सुरु झाली.

ऑपरेशन तुतारीही लवकरच होईल, असं म्हणत काही विश्लेषकांनी तर पवार गटाच्या खासदारांच्या पक्षप्रवेशाच्या तारखाही सांगून टाकल्या. पण एवढं सगळं होत असतानाही, शरद पवार मात्र अगदी थंड डोक्यानं सगळं पहात-ऐकत राहिले. राजकारणाचा अंदाज घेऊन काहीही न बोलता घराबाहेर पडलेत. बुधवारी ते थेट नगरमध्ये दाखल झाले. प्रवरानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या एका कार्यक्रमासाठी येत, त्यांनी अवघ्या काही तासांत बरीच राजकीय गणिते जुळवली.

आपल्या गाडीत थेट बाळासाहेब थोरातांना बसवत त्यांनी नगर जिल्ह्यातील राजकीय डाव सावरण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, काहीही न सांगता पक्ष बदलणाऱ्या प्राजक्त तनपुरेंच्या बालेकिल्ल्यातही त्यांनी फक्त काही मिनिटांच्या भेटीत बरीच गोळाबेरीज जुळवली. नगर दक्षिणेच्या लोकसभा निवडणुकीत निलेश लंकेंच्या विजयानंतर राष्ट्रवादीचा डाव पुरता विस्कटला. नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीला त्यानंतर उतरती कळा लागली. हिच उतरती कळा, पुन्हा नव्याने सावरण्याचा प्रयत्न पवारांनी बुधवारच्या दौऱ्यात केला. राहुरी पोटनिवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांनी अचानक माघार घेत, नव्या राजकीय समि‍करणांना जन्म दिला.

पुढं काही दिवसांतच भाजपमध्ये प्रवेश करुन लगेच, तीन दिवसांत आमदारपदही मिळवलं. शरद पवारांसाठी हा मोठा धक्काच होता. पहिल्याच टर्मला आमदार केल्यावर थेट राज्यमंत्री केलेला युवा नेता, असा अचानक सोडून गेल्यावर पवारांनाही राग आलाच. अर्थात, त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी तो दाखवला नाही. परंतु ते तनपुरेंना असं मोकळं सोडणार नाहीत, हे त्यावेळीच बोललं गेलं. मामा जयंत पाटील व नेते शरद पवार यांची भेट न घेता तनपुरेंनी थेट सुप्रिया सुळेंना आपल्या मनातील चलबिचल सांगत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय सांगून टाकला. तनपुरेंनी त्यावेळी शरद पवारांची भेट आवर्जून टाळली. परंतु असं असलं तरी पवार तनपुरेंना सहजासहजी माफ करतील, अशी शक्यता अजूनही नाहीए…

लोणीवरुन अहिल्यानगरकडे जाताना शरद पवार आवर्जून राहुरीत थांबले. राहुरीत त्यांचे उत्साही कार्यकर्ते त्यांची वाटत पाहत होते. गाडीचा दरवाजा उघडून तनपुरेंनी काही युवा नेत्यांना थेट नावानीशी हाक मारली. पवारांनी सगळ्यांची आस्थेवाईक चौकशी केली. अमृत धुमाळ, चाचा तनपुरे, किरण कडू, अशोक कदम, अॅड. पंढरीनाथ पवार, यांच्यासह देवळाली प्रवराचेही काही कार्यकर्ते उपस्थित होते. तनपुरे भाजपात गेले असले तरी, पवारांचे राहुरीत गेल्या चाळीस वर्षांचे ऋणानुबंध आहेत. नाक दाबल्यावर तोंड कसं उघडायचं, हे पवारांना चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे पवारांनी राहुरी मतदारसंघातील सगळ्यात गटांतील कार्यकर्त्यांना थोडाथोडा वेळ दिला.

सगळ्यांचा सत्कार स्विकारला. त्यामुळे पवारांनी स्वीकारलेल्या या सत्कारामागे नक्कीच काहीतरी वेगळी राजकीय गणिते असणार, हे पक्कं झालं. बदलत्या राजकीय समि‍करणात पवारांनी त्यांच्या जुन्या कार्यकर्त्यांसोबत काही हितगुजही केल्याचं सांगितलं गेलं. पवारांच्या नावाच्या घोषणा आणि जयघोष यातून पवारांना काय समजायचं ते समजलं. त्यामुळेच येत्या काही दिवसांत राहुरी मतदारसंघातील काही कट्टर कार्यकर्त्यांची बैठक, पुण्यात किंवा थेट बारामतीत होईल, असंही सांगितलं जातंय. विशेष म्हणजे, पवारांच्या स्वागताला तनपुरेंचे कट्टर कार्यकर्तेही उपस्थित होते. ज्यांच्या जोरावर तनपुरे शहरात विकास आघाडीचं राजकारण करतात, ते चाचा तनपुरेही पवारांच्या सत्काराला सगळ्यात पुढे होते. हे सगळं पाहिलं तर तनपुरेंना पुढची राजकीय वाटचाल नक्कीच एकतर्फी नसेल, अशा शक्यता वाढल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button