Explained

Ahilyanagar Crime | अगोदर चाकूने सपासप वार, नंतर थेट पोटात गोळी मारली…

पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांनी नगरच्या एसपी कार्यालयाची सूत्रे घेऊन दोन महिने झाले. परंतु या दोन महिन्यांत नगरला व्यवस्थीत वळण लावलं मात्र त्यांना जमलं नाही. सुदर्शन यांच्या नगरला बदलीनंतर, त्यांच्या सिंघमपणाची जी हवा केली गेली होती, ती अद्याप दिसली नाही. नगर जिल्ह्यात आजही गँगवार, वाळू व मुरुम तस्करी, गुटखा तस्करी, अवैध धंदे, यातून सर्रास गोळीबाराच्या घटना घडताना दिसत आहेत. सुदर्शन नगरला आल्यापासून दोन महिन्यांत पाच वेळा गोळीबाराच्या घटना घडल्या. १ जुलै आणि २ जुलैला सलग चोवीत तासांत दोनदा गोळीबार झाला. या सगळ्या घटना पाहता, सुदर्शन यांना बिघडलेल्या नगरला वळण लावणं खरंच जमणार नाही का? हा प्रश्न पडलाय. गेल्या दोन दिवसांत श्रीरामपूर गँगवारचा भडका उडाला. तर संगमनेरला वाळू व मुरुम तस्करांनी थेट उपसरपंचावर गोळीबार केलाय. नगर रक्तरंजीत झालंय. नेमकं काय चाललंय नगर जिल्ह्यात?

दोन मे रोजी मुम्मका सुदर्शन यांनी नगरच्या पोलिस अधिक्षकपदाची जबाबदारी घेतली. त्यापूर्वी जिल्हा उडता पंजाबच्या वाटेवर चालला होता. राज्यातील सगळ्यात मोठा जिल्हा असलेल्या अहिल्यानगरला वळण लावायला खमक्या पोलिस अधिकारीच मिळत नव्हता. ज्योतीप्रिया सिंग, कृष्णप्रकाश साहेब, संतोष खाडे साहेब या अधिकाऱ्यांनी नगरला काही प्रमाणात वळण लावण्याचा प्रयत्न केला. परंतु पुन्हा नगरमधील टोळ्या सक्रीय झाल्या. पोलिस दलातच खाबुगिरी करणारे व आरोपींशीं संगनमत करणारे अधिकारी- कर्मचारी तयार झाले. ड्रग्ज तस्करीत नगरची स्थानिक गुन्हे शाखा, तर राज्यात बदनाम झाली. हे सगळं पाहता, गृहविभागाच्या आदेशाने नव्याने दाखल झालेल्या मुम्मका सुदर्शन यांच्याकडून, नगरकरांच्या अपेक्षा वाढल्या. सुदर्शन साहेब तरी नगरला वळण लावतील व दोरीत वागायला भाग पाडतील, असं बोललं गेलं. परंतु ते नगरला जाँईन झाल्यापासून गेल्या दोन महिन्यांत नगर जिल्ह्यात पाच वेळा गोळीबाराच्या घटना घडल्या. मुरुम व वाळूतस्करी, अवैध धंदे, ड्रग्ज, गँगवार, गुटखा तस्करी, भेसळ, अशा सगळ्यात बाबतीत नगर जिल्ह्याने गुन्ह्यांचे वेगवेगळे रेकाँर्ड तोडले. गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्याच्या घटनांचेही नवे रेकाँर्ड झाले. त्यामुळे आता तरी सुदर्शन यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करावा, अशी नगरकरांची अपेक्षा आहे.

-७ जूनला अहिल्यानगर- संभाजीनगर महामार्गावरील जेऊर परिसरात पूर्ववैमन्यातून कोयत्याने हल्ला करण्याची घटना घडली. या प्रकरणात हवेत गोळीबार केल्याचेही सांगितले गेले.
-त्यानंतर ९ जूनला श्रीरामपूरला गोळीबार झाला. शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. सुदैवाने त्यात कहाणे बचावले.
-त्यानंतर १३ जूनला पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथे जमिनीच्या वादातून राडा झाला. एका कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली. त्यातही गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याचे सांगितले गेले.
-आता १ जुलैला संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथे उपसंरपंचावर मुरुम तस्करांनी गोळीबार करत, त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला.
-संगमनेरच्या घटनेला २४ तास उलटत नाही, तोच श्रीरामपूर शहरातील पूर्णावाद नगर येथे भर दुपारी २५ वर्षीय युवकावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर त्याच्यावर चाकूने हल्ला करत त्याला गंभीर जखमी करण्यात आले.

गेल्या महिनाभरातील या पाच घटना पाहिल्या, तर नगरकरांचं संरक्षण कोण करणार? हा प्रश्न उभा राहतो. संगमनेर आणि श्रीरामपूरची घटना अगदीच ताजी आहे. संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावात अवैध मुरुम व माती वाहतूक जोमात चालते. याच वाहतुकीचा जाब विचारणाऱ्या माजी उपसरपंच संदीप भाऊसाहेब घुगे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. १ जुलैला रात्री नऊच्या सुमारास जेवण करुन घरासमोर शतपावली करत होते. त्यावेळी दोन मोटारसायकलवर सहा जण त्यांच्या घरासमोर आले. त्यातील एका गाडीवर विशाल हौशीराम खेमनर (रा. अंभोरे), प्रवणी ठकाजी पुणेकर (रा. डिग्रस) व डिग्रस गावातीलच सुदर्शन शिवाजी श्रीराम हे तिघेही घुगे यांच्या दिशेने धावले. दुसऱ्या दुचाकीवरील तिघेही हत्यारबंद होते. त्यातील विशाल व प्रवीण यांनी घुगे यांच्या दिशेने धाव घेत, तुझा कार्यक्रम आता आवरला म्हणत धमकी देत पळाले. सुदर्शन हा त्यांच्यामागून तलवार घेऊन घुगे यांच्या दिशेने पळाला. हे सगळं पाहताच, घुगे हे घराकडे पळाले. त्यांनी तातडीने दरवाजा लावून घेत स्वतःला घरात कोंडून घेतले. त्यानंतर रागावलेल्या विशाल व प्रवीण याने बंद दरवाजाच्या दिशेने दोन फायर केले. त्यातील एक गोळी दरवाजाच्या आरपार गेली. त्यानंतर सुदर्शन याने हातातील तलवारीने दरवाजावर वार केले. तसेच खिडक्याच्या काचा फोडल्या. आज वाचलास पण पुन्हा जिवंत राहणार नाहीस, अशी धमकी देत हे सहाही आरोपी पसार झाले. आरोपी निघून गेल्यावर घुगे यांनी रात्री संगमनेर पोलिस ठाण्यात हल्ल्याची माहिती दिली. त्यानंतर अकरा वाजेच्या सुमारास पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तातडीने गुन्हा दाखल करुन आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली. संगमनेर तालुक्यातील वाळू व मुरुम तस्करी किती फोफावलीय, याची प्रचिती या घटनेने आली.

या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी श्रीरामपूरही हादरले. दुपारी एक वाजेच्या सुमारास शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पुर्णवादनगरमध्ये गोळीबाराची घटना घडली. पुर्ववैमनस्यातून शुभम यादव उर्फ कल्लू (वय २५) या युवकावर हल्ला करण्यात आला. दोन ते तीन जणांनी हा हल्ला केला. हल्लेखोर हे चारचाकी गाडीतून आल्याचे सांगितले जाते. त्यांनी शुभमला घेरले व त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. एकाने शुभमच्या पोटात गोळी मारली. हल्लेखोर पूर्ण तयारीत आले होते. कल्लू या हल्ल्यातून कसाबसा वाचला आणि पळत सुटला. कल्लू मुळा-प्रवरा रस्त्याच्या दिशेन पळत होता. रस्त्यातील एका बंगल्यात तो शिरला. त्याने दरवाजा आतून लावून घेतला. त्यानंतर तो बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर गेला आणि तेथे स्वतःला कोंडून घेतले. हा प्रकार घडला त्यावेळी त्या बंगल्यात महिला एकटीत होती. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तीही घाबरली. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले.

जखमी शुभमला प्रथम साखर कामगार रुग्णालयात व त्यानंतर अहिल्यानगर येथील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. पोलिसांनी काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही मिळवले आहेत. या प्रकऱणातही पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भरदिवसा झालेल्या या गोळीबारामुळे श्रीरामपूर शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून श्रीरामपूर असुरक्षित बनत आहे. गोळीबार, हल्ले, टोळीयुद्ध, वाळूतस्करी, अंमली पदार्थांची तस्करी, नशेची इंजेक्शन यामुळे श्रीरामपूर अचानक चर्चेत आले आहे. या सगळ्या प्रकारांचा बिमोड कधी होणार, हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button