Explained

ShaniMurti Deterioration | ना व्हिआयपी ना ५०० चे देणगीदार, शनिचौथऱ्यावरचं दर्शनच बंद व्हावं…

जगातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर हे गेल्या काही वर्षांपासून चांगलेच चर्चेत आहे. कधी बोगस कामगार भरती, कधी सरकार व विश्वस्तांमधील वाद, कधी देवस्थानमधील भ्रष्ट्राचार, कधी बनावट पावती पुस्तक व बनावट क्यूआर कोड, अशा वेगवेगळ्या कारणांनी या देवस्थानची नेहमीच चर्चा होते. भ्रष्ट्राचारानं पोखरलेलं व तेवढाच त्वरेनं भ्रष्ट्राचार दाबलेलं हे देवस्थान, आता थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलंय. असो, आजचा विषय आहे, शनिमुर्तीच्या स्ट्रक्चरल ऑडीटचा… शनिशिंगणापूर येथील प्रसिद्ध शनिशिळेला आता वज्रलेप लावला जाणार आहे. पंढरपुरच्या विठ्ठल मुर्तीवर जसा वर्ज्रलेप लावला गेलाय, तसाच वर्ज्रलेप आता शनिशिळेवरही लावला जाणार आहे. भारतीय पुरातत्व विभागानं या कामाला परवानगी दिली असून, त्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील तज्ज्ञांची नेमणूकही करण्यात आली आहे. नेमकं काय आहे हे वज्रलेप प्रकरण आणि वज्रलेपाने काय होईल? हाच विषय आज आपण समजून घेणार आहोत…

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात शनिशिंगणापूर गाव आहे. येथेच स्वयंभू शनिशिळा आहे. जवळच असलेल्या पानसनाल्यात ही शिळा वाहून आल्याचा इतिहास आहे. गावातील मामा-भाच्यांनी या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. शनिशिंगणापूरच्या शनिशिळेचा इतिहास अतिशय रहस्यमय आणि चमत्कारिक आहे. येथील काळ्या पाषाणाची शिळा स्वयंभू मानली जाते. आख्यायिकेनुसार, सुमारे ३०० ते ५०० वर्षांपूर्वी गावाजवळून वाहणाऱ्या पानसनाला नदीला आलेल्या पुरात, ही शिळा वाहून आली होती. एका मेंढपाळाने काठीने ती शिळा टोचली असता त्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर रात्री स्वप्नात शनिदेवाने दृष्टांत देऊन स्वतःची ओळख सांगितली व तिथेच स्थापना करण्यास सांगितले. स्वप्नात शनिदेवाने दिलेल्या आज्ञेनुसार ‘मामा-भाच्यांनी’ मिळून ही शिळा उभी केली आणि गावकऱ्यांनी तिची पूजा सुरू केली. शनिदेवाने दिलेल्या अटीनुसार, ही शिळा नेहमी खुल्या आकाशाखाली म्हणजेच उघड्यावर एका चौथऱ्यावर विराजमान आहे. या शिळेवर कोणत्याही प्रकारचा निवारा किंवा छप्पर नाही. अगदी शेजारच्या कडूलिंबाच्या झाडाची फांदी जरी या शिळेवर आली तरी ती लगेच जळून जाते, असं सांगितलं जातं. ही शनिमूर्ती काळ्या पाषाणाची असून, ती ५ फूट ९ इंच उंचीची व १ फूल सहा इंच रुंदीची आहे. ती उघड्यावर असून वर्षानुवर्षे तिच्यावर तैलाभिषेक सुरु आहे. दिवसाला या मुर्तीवर साधारणः दीड हजार लिटर तेलाचा अभिषेक होत असल्याची आकडेवारी मांडली जातेय. याशिवाय ऊन-वारा, पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे या मुर्तीची झिज होत असल्याचा अंदाज व्यक्त केला गेलाय.

या मुर्तीबाबत व तिची झिज होण्याबाबत जेव्हा चर्चा सुरु झाली त्यानंतर सरकारने छत्रपती संभाजीनगर येथील पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांची नेमणूक करुन या शनिशिळेची तपासणी केली. शनिमूर्तीवर अर्पण होणारे तेल हे गुणवत्तापूर्ण नाही, असा अहवाल यापूर्वीच आला होता. शिवाय देवस्थानकडे या तेलाची पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळाही नाही. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून देवावर नित्कृष्ठ दर्जाचे तेल वाहिले जात असल्याचा आरोप होता. याच रासायनिक तेलामुळे शनिमूर्तीची झिज होत असून मुर्तीचा काही भाग २०२२ साली तुटल्याचेही समोर आले होते. नगरमधील अन्न व औषध प्रशासनानेही या गंभीर बाबीकडे यापूर्वी दुर्लक्ष केल्याचे दिसले. त्यापूर्वी या मुर्तीचे स्टक्चरल ऑडीच करण्याची गरज लक्षात घेऊन देवस्थान प्रशासनाने पुरातत्व विभागाला याबाबतचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला आता मंजूरी मिळाली आहे. लवकरच याबाबत अहवाल येऊन मुर्तीला पंढरपुरच्या विठ्ठलाच्या मुर्तीसारखा वज्रलेप दिला जाईल, अशा बातम्या सुरु झाल्या आहेत.

खरंतर शनिशिळेवर भाविक काहीही अर्पण करत आहेत. ज्या वस्तू शनिशिळेवर अर्पण केल्या जातात, त्यात तेलासह इतर कोणत्याही वस्तूची गुणवत्ता तपासली जात नाही. लोखंडी अंगठी, काळे कापड, घोड्याची सांगून अर्पण केली जाणारी लोखंडाची नाळ, काळे तीळ, अशा कोणत्याच वस्तूची गुणवत्ता तपासली जात नाही. या कडक वस्तूंच्या घर्षणामुळे शनिमूर्तीची झीज होत असल्याचे सांगितले जातेय. शिंगणापूरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे असणारे भेसळयुक्त तेल.. कोणतेही तेल येथे तिळाचे तेल म्हणून विकले जातेय. तेलाच्या गुणवत्ता तपासण्यासाठी देवस्थान प्रशासनाकडे कोणतीही ठोस उपाययोजना नाही. ती उपाययोजना आतातरी व्हावी, अशी भाविकांची अपेक्षा आहे. शनैश्वर देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनीही शनिमुर्तीच्या संरक्षणाबाबत आता पुढाकार घेतल्याचे दिसले. पंढरपुरच्या विठ्ठल-रुख्मिणी मंदीराप्रमाणे शनिमूर्तीची वैज्ञानिक पद्धतीने परिक्षण व संवर्धन करण्यासाठी देवस्थान प्रशासनाने आता पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा सुरु केला आहे. पत्रव्यवहार केला आहे. कदाचित येत्या काही काळात शनिमूर्तीवर वज्रलेपही लावला जाईल, असेही सांगितले जात आहे.

मुर्तीचं पावित्र्य टिकविण्यासाठी व होणारी झिज थांबविण्यासाठी चौथऱ्यावरुन तेल ओतण्याचे प्रकार पूर्णपणे बंद करावेत, अशीही मागणी होत आहे. व्हिआयपी नाही किंवा अन्य कुणीही नाही, असा पवित्रा जर प्रशासनाने घेतला तरच मुर्तीचे पावित्र्य कायम राहिल, अशाही चर्चा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button