Rajiv Rajale : नगर हा जसा सहकाराचा जिल्हा आहे, तसाच तो प्रज्ञावंतांचा जिल्हाही आहे. भाऊसाहेब थोरात, दादा पाटील शेळके, बाळासाहेब विखे, शंकरराव कोल्हे, शंकरराव कोल्हे, यशवंतराव गडाख, रावसाहेब पटवर्धन, मधू दंडवते, अण्णासाहेब म्हस्के, बाळासाहेब भारदे, बी. जे. खताळ यांच्या वैचारीक जडणघडणीतून हा जिल्हा समृद्ध झालाय. याच वैचारीक वारशात असाही एक नेता होता, जो अत्यंत प्रगल्भ व आभ्यासू होता. अगदी कमी वयात, विधानसभेतील आपल्या पहिल्याच भाषणात या नेत्याने थेट मुख्यमंत्र्यांच्या टाळ्या घेतल्या होत्या. अगदी विरोधी पक्षातील आमदारांनीही, लेखी पत्र देऊन त्या भाषणाची वाहवा केली होती. आमदार असतानाही हातात झाडू घेऊन नगरची जिल्हा परिषदेची इमारत झाडून स्वच्छ करणारा हा नेता होता, स्व. राजीव राजळे… राजीव राजळे हे अगदी कमी वयात या जगातून निघून गेले. परंतु त्यांचे काही किस्से व काही आठवणी आजही नगरच्या राजकीय पटलाला दिशा देणाऱ्या ठरत आहेत. आज याच राजीव राजळेंबाबत आपण काही माहिती नसणाऱ्या गोष्टी समजून घेणार आहोत…
दूध प्रश्नापासून ऊस दाराच्या प्रश्नावर बोलणारा नेता कोणता, तर राजीव राजळे… प्राचीन भारतापासून मध्ययुगीन भारत व थेट आधुनिक भारताच्या मांडणीवर बोलणारा नेता कोणता, तर राजीव राजळेंना नगरच्या राजकारणातील एक आभ्यासू व संवेदनशील नेता म्हणून ओळखले जात होते. ७ ऑक्टोंबर २०१७ ला वयाच्या फक्त ४८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. वडील अप्पासाहेब राजळे यांचा राजकीय वारसा चालवत काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी १९९९ मध्ये आपल्या राजकीय जीवनास सुरूवात केली. राजकारणात उडी घेतल्यावर पहिल्या तीन महिन्यांतच त्यांनी पाथर्डी विधानसभा निवडणूक लढवली. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. भाजपच्या दगडू बडे यांनी त्यांचा ८२४ मतांची पराभव केला. पराभव झाला, पण राजळे शांत बसले नाहीत. निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ते पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले.
युवक काँग्रेसची बांधणी करतांना गावोगावी दौरे करत त्यांनी कार्यकर्ते जोडले. वडिलांचा कार्यकर्त्यांच्या मोठा संच राजीव यांना मिळाल्याने अल्पावधीतच त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाचा विश्वास संपादन केला. कुटुंबातूनच त्यांच्यावर समाजकारण व राजकारणाचे संस्कार झाले. मामा माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून राजकारणाची सूत्रे आत्मसात करताना तालुक्याची राजकीय बांधणी ताकदीने केली. पुढच्या पाच वर्षांनी म्हणजेच, २००४ ला त्यांनी पुन्हा विधानसभा निवडणुक लढवली. त्यावेळी भाजपकडून अॅड. प्रताप ढाकणे हे त्यांच्या विरोधातील उमेदवार होते. परंतु या निवडणुकीत राजळेंनी तब्बल सहा हजार मतांनी ढाकणेंचा पराभव केला.
राजळे पहिल्यांदा विधानसभेत गेले. आपल्या पहिल्याच टर्ममध्ये त्यांनी संपूर्ण विधानसभा गाजवली. अर्थसंकल्पीय अधिवेशनातील त्यांचे सव्वा तासांचे भाषण तर प्रचंड गाजले. विकासाचा अनुशेष शेतकऱ्यांची अवस्था, सावकारकी, गावातील समस्या, शहरातील समस्या यांची त्यांनी केलेली मुद्देसूद मांडणी ऐकूण, स्वतः मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनीही भाषणानंतर पहिली टाळी वाजवली होती. त्यानंतर संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला होता. आत्ताचे नेते जसे, लग्न, वाढदिवस, अंत्यविधी, दहावे, तेरावे, साखरपुडा, सप्ताह, जत्रा, यात्रा, अशा कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा सपाटा लावतात ना… तसं राजळे अगदी १५ वर्षांपूर्वी करायचे. संपूर्ण पाथर्डी तालुका त्यांनी पिंजून काढला होता.
वृध्देश्वर साखर कारखान्याला कार्पोरेट लूक देऊन तोट्यात गेलेला कारखाना नफ्यात आणण्याचे कसब त्यांचेच. तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून पाठपुरावा करत त्यांनी पाथर्डी शहरात पहिला पेट्रोल पंप आणला. त्यामुळे संस्था उर्जितावस्थेत आली. मढी, वृध्देश्वर, हनुमान टाकळी, भगवानगड या तीर्थक्षेत्रांना शासनाचा निधी मिळवून देण्यासाठी वारंवार पाठपुरावा करत ग्रामीण रस्त्यांची बांधणी केली. जिल्ह्यात सर्वाधिक शेततळ्याचा मान मिळण्यामागे राजळे यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. वांबोरी चारीला निधी मिळविण्यासाठी थेट राज्यपालांकडे जाणे किंवा त्यासाठी थेट मुख्यमंत्री व जलसंपदामंत्र्यांकडे ठिय्या मांडून बसण्याचे कामही राजळेंनी केले.
पाठपुरावा करुन त्यांनी बांबोरी चारीला ३० लाखांचा निधी आणला. मिरी-तिसगाव पाणी योजना, हातगावसह १२ गाव पाणी योजना, बोधेगाव पाणी योजना या योजना त्यांनीच मार्गी लावल्या. २०१२ साली त्याच्या पत्नी मोनिका राजळे या मिरी गटातून जिल्हा परिषद सदस्या म्हणून निवडून आल्या. त्याच टर्मला त्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षाही होत्या. परंतु त्यापूर्वी स्वतः आमदार असताना हातात झाडू घेऊन, जिल्हा परिषदेची इमारत संपूर्ण स्वच्छ करणारा नगर जिल्ह्यातील पहिला आमदार होण्याचा मानही राजळेंनी मिळवला होता. राजळे गेली कित्येक वर्षे पाथर्डीत जनता दरबार भरवायचे. प्रश्न समजून घ्यायचे. एका फोनवर प्रश्नही मार्गी लावायचे.
पुढे २००९ ला पाथर्डी मतदारसंघाची तोडफोड झाली. शेवगाव व पाथर्डी असा दोन तालुक्यांचा मिळून एक मतदारसंघ झाला. त्यावेळी राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली. ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली व चंद्रशेखर घुलेंना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. भाजपकडून प्रताप ढाकणे होते. या निवडणुकीत राजळेंनी अपक्ष उमेदवारी केली पण त्यांचा पराभव झाला. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचीही पुनर्रचना झाली. काँग्रेसशी दुरावलेल्या राजाभाऊंनी अजितदादांवरील प्रेमापोटी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेथून ते नगर दक्षिण लोकसभा लढवतील अशा शक्यता होत्या. परंतु नगरमधील काही नेत्यांनी त्यांचं तिकीट कापलं. अजित पवार समर्थक असणाऱ्या राजाभाऊंचं नगर दक्षिणेतून, विजय भांबळे यांचं परभणीतून तर मुन्ना महाडीक यांचं कोल्हापूरातून तिकीट कापलं.
परंतु राजाभाऊ अपक्ष लढले. त्यात त्यांचा पराभव झाला. पुढे २०१४ ला गोपीनाथ मुंडेंनी आग्रहानं त्यांच्या पत्नी मोनिका राजळेंना भाजपकडून लढण्याचा आग्रह केला. तिकीटही दिलं. आता राजळेंनी आपल्या पत्नीला पहिल्याच निवडणुकीत निवडूनही आणून दाखवलं. मतदारसंघातील विविध विकासकामे करण्यासाठी त्यांनी पत्नीला मोलाचे मार्गदर्शन केले. परंतु पुढे तीनच वर्षांनी त्यांचे निधन झाले. राजाभाऊ हा चालताबोलता शब्दकोश होता. राजकारणाचा संदर्भ ग्रंथच होता. राजाभाऊंना जे-जे कार्यकर्ते ओळखतात, त्यांना आजही त्यांची कमतरता जाणवते. राजीव राजळे यांच्या निधानाने या मतदारसंघातील एक आभ्यासू व्यक्तीमत्व हरपले, हे मात्र नक्की…





