Explained

‘हे’ आहे महाराष्ट्रातलं एकमेव दुर्योधनाचे मंदिर! येथे खलनायकाची पूजा का होते?

मित्रांनो, संपूर्ण जगात जेव्हा देवांची पूजा केली जाते. पण, थांबा… महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात मात्र चक्क महाभारतातील महाखलनायकाची पूजा केली जाते! होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. ज्या दुर्योधनाने द्रौपदीचे वस्त्रहरण केले, ज्याच्या अहंकारामुळे महाभारताचे महाभयानक युद्ध घडले, त्या दुर्योधनाचे आपल्या महाराष्ट्रात एक भव्य मंदिर आहे!

अहिल्यानगर जिल्हा… हा जिल्हा नेहमीच आपल्या अद्भूत आणि रहस्यमय परंपरांसाठी ओळखला जातो. मग ती आगडगाव येथे भरणारी ‘भुतांची यात्रा’ असो, किंवा निंबेदैत्य नांदूर येथे होणारी ‘राक्षसाची पूजा’ असो! पण या सगळ्यांमध्ये सर्वात जास्त थक्क करणारी गोष्ट म्हणजे, कर्जत तालुक्यातील ‘दुरगाव’ येथे असणारे दुर्योधनाचे मंदिर. महाराष्ट्रातील हे एकमेव दुर्योधन मंदिर आहे. पण लोक एका खलनायकाला का पूजतात? यामागे कोणतं रहस्य दडलंय? चला, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दुरगावचा हाच रोमांचक इतिहास आणि पौराणिक संदर्भ सविस्तर जाणून घेणार आहोत.

हे मंदिर नेमके आहे कुठे? तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात. राशीन गावापासून जवळच असलेल्या कुळधरण या मोठ्या गावाशेजारी ‘दुरगाव’ नावाचे एक छोटेसे, शांत गाव वसलेले आहे. या गावाचे नाव आधी ‘दुर्गाव’ होते आणि नंतर ते ‘दुरगाव’ झाले. आणि या नावाचा थेट संबंध इथल्या दुर्योधन मंदिराशी जोडला जातो. इतिहासकार आणि तज्ज्ञांच्या मते, हे मंदिर साधारण १५ व्या शतकातील म्हणजेच ५०० वर्षांपेक्षा जास्त जुने आहे. संपूर्ण भारतात दुर्योधनाची फार कमी मंदिरे आहेत जसे की उत्तराखंड आणि केरळमध्ये… पण महाराष्ट्रात हे एकमेव आणि अद्वितीय मंदिर आहे, ज्याचा दुरगावच्या ग्रामस्थांना प्रचंड अभिमान आहे.

आता प्रश्न पडतो की दुर्योधन हस्तिनापूर सोडून थेट महाराष्ट्रातल्या या भागात कसा आला? महाभारतातील कथेनुसार, महाभारत युद्धानंतर जखमी झालेला दुर्योधन पांडवांना शरण न जाता, स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी दंडकारण्यात निघून गेला होता. हेच दंडकारण्य आजच्या अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पसरलेले होते. असंही मानलं जातं की, कौरवांनी जेव्हा पांडवांना अज्ञातवासात पाठवले होते, तेव्हा पांडव काही काळ याच दुरगावमध्ये वास्तव्याला होते. याची साक्ष देणारा ‘पांडव डोह’ आजही या गावात अस्तित्वात आहे! विशेष म्हणजे, दुरगावचे लोक दुर्योधनासोबतच या पांडव डोहाचीही तितक्याच भक्तीभावाने पूजा करतात.

मित्रांनो, दुर्योधन हा महाभारतात कितीही क्रूर दाखवला असला, तरी तो महादेवाचा परमभक्त होता. म्हणूनच या दुर्योधन मंदिरात तुम्हाला महादेवाच्या दोन पिंडी पाहायला मिळतात. पण या मंदिराचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे इथे असलेला एक ‘गुप्त भुयारी मार्ग’! लोकांच्या मते, या मंदिरातून निघणारा भुयारी मार्ग थेट अश्वत्थामाच्या मंदिरापर्यंत जात असे. महाभारत युद्धात अमर राहिलेला द्रोणाचार्य पुत्र अश्वत्थामा आणि दुर्योधन हे जिवलग मित्र होते. जुन्या लोकांच्या मते, दुर्योधन रात्रीच्या वेळी याच गुप्त भुयारी मार्गातून अश्वत्थामाला भेटण्यासाठी जात असे! विचार करा, ५०० वर्षांपूर्वीचे हे भुयार आणि त्यामागची ही मैत्री किती अद्भूत असेल!

आता वळूयात या व्हिडिओच्या सर्वात रंजक आणि व्हायरल होणाऱ्या भागाकडे! दुरगाव हे गाव आवर्षण प्रवण क्षेत्रात म्हणजेच दुष्काळी भागात येते, जिथे पाऊस खूप कमी पडतो. इथल्या जुन्या जाणत्या ग्रामस्थांमध्ये पावसाविषयी एक अत्यंत अजब लोककथा प्रसिद्ध आहे. असे मानले जाते की, दुर्योधनाचा स्वभाव अत्यंत उग्र होता, त्यामुळे त्याला पाहून आकाशातील ढग सुद्धा घाबरून पळून जातात आणि गावात पाऊस पडत नाही! मग गावकऱ्यांनी यावर काय तोडगा काढला माहितीये? जेव्हा पावसाळ्यात अजिबात पाऊस पडत नाही, तेव्हा गावकरी एकत्र येतात आणि दुर्योधनाला मंदिराच्या गाभाऱ्यात कोंडून ठेवतात म्हणजेच त्याचे दर्शन बंद करतात ! आणि चमत्कार असा की, दुर्योधनाला कोंडल्यानंतर गावात हमखास पाऊस पडतो, अशी जुन्या काळातील लोकांची ठाम श्रद्धा आहे! आहे की नाही थक्क करणारी गोष्ट..!

महाभारतात आपण पाहिले की, दुर्योधन हा गदायुद्धात अत्यंत निपुण होता आणि तो भगवान श्रीकृष्णांचे मोठे बंधू बलराम यांचा लाडका शिष्य होता. शेवटी भीमाने द्यूत प्रसंगातील आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी दुर्योधनाची मांडी फोडली आणि त्याचा अंत केला. पण इतिहासकारांचा एक वर्ग असंही मानतो की, दुर्योधनाचे मूळ नाव ‘दुर्योधन’ नसून ‘सुयोधन’ म्हणजे चांगला योद्धा असे होते! मात्र, त्याच्या वाईट वर्तनामुळे जगाने त्याला दुर्योधन नाव दिले. परंतु, दुरगावच्या या मंदिरात दर तीन वर्षांनी मोठा उत्सव होतो आणि अधिक महिन्यात आठ दिवस अखंड हरिनाम सप्ताह देखील केला जातो, जिथे त्याला देव मानून पूजले जाते.

या अनोख्या वैशिष्ट्यांमुळेच आता महाराष्ट्र सरकारने या दुर्योधन मंदिराला ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे, ज्यामुळे या परिसराचा विकास होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button