
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर पोलिसांनी आता कंबर कसली आहे. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शांतता अबाधित राहावी, यासाठी राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच SRPF आणि दंगल नियंत्रण पथक शहरात दाखल झाले आहे.
संवेदनशील परिसर, प्रमुख चौक आणि गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या हालचालींवर पोलिसांची विशेष नजर असणार आहे.
मात्र पोलिसांसमोरचं आव्हान केवळ रस्त्यांपुरतं मर्यादित नाही. सोशल मीडियावरून अफवा पसरवणाऱ्या, आक्षेपार्ह मजकूर किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करणाऱ्यांवरही पोलिस लक्ष ठेवणार आहेत.
शांतता भंग करण्याचा किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही संशयास्पद माहिती पुढे पाठवण्यापूर्वी पडताळणी करावी आणि सण-उत्सव शांतता, सलोखा आणि बंधुभावाने साजरे करावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.





