
तोंडातली जखम साधी समजून दुर्लक्ष करताय? थांबा! २-३ आठवडे ती बरी होत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे ! मंडळी, तोंडाचा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात ओळखला तर उपचारासाठी मोठी मदत होऊ शकते.
तोंडात वारंवार होणारी किंवा दीर्घकाळ न भरणारी जखम हे एक महत्त्वाचं संकेत असू शकतं. याशिवाय तोंडात पांढरा किंवा लाल डाग, गाठ, सूज किंवा विनाकारण रक्तस्राव होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
तोंड उघडताना त्रास, अन्न चावताना किंवा गिळताना अडचण, आवाजात बदल, दात सैल होणे किंवा अचानक वजन कमी होणे हीदेखील संभाव्य धोक्याची चिन्हे आहेत. तंबाखू, गुटखा, धूम्रपान आणि अतिमद्यपानामुळे धोका वाढू शकतो. त्यामुळे या सवयी टाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
तोंडात कोणताही असामान्य बदल दोन आठवड्यांपेक्षा जास्त टिकला, तर स्वतःहून निष्कर्ष काढू नका. दंतवैद्य किंवा डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. लक्षणं दुर्लक्षित करू नका… कारण वेळेवर केलेली तपासणी जीव वाचवू शकते!





