अहिल्यानगरचा कर्जत-जामखेड मतदारसंघ. या मतदारसंघात, तब्बल २५ वर्ष भाजपची सत्ता होती. काँग्रेसची पाच दशकाची सद्दी, भाजपनंच मोडली होती. भाजपला आता कुणीत हरवू शकत नाही, अशी स्थिती होती. पण…पण एक निवडणूक अशी आली, जिनं या मतदारसंघाच नाही तर अख्ख्या जिल्ह्याचा राजकीय इतिहास-भुगोल बदलवला. आम्ही इतिहास-भुगोल यासाठी म्हणतोय, की त्या वर्षी आमदार झालेला नेता इतिहासात पहिल्यांदाच बाहेरच्या जिल्ह्यातून येऊन, नगरमध्ये आमदार झाला होता. नगर जिल्हाच मुळी सहकाराचा. इथं फक्त नातं-गोतं आणि मातब्बरीच चालते. गेल्या ७-८ दशकांत, या जिल्ह्यानं फक्त साखरसम्राट आणि भुमिपुत्रांना सत्तेच्या ऊब दिलीय.२००९ साली तर या जिल्ह्यानं, रामदास आठवलेंसारख्या राष्ट्रीय नेत्यालाही सव्वा लाखांच्या फरकानं पाडलं होतं. परंतु बाहेरचा आमदार न होण्याची परंपरा २०१९ मध्ये मोडली. एका युवा नेत्यानं आयुष्यातील पहिलीच निवडणूक जिंकून नगरमध्ये विक्रम करुन दाखवला होता. या नेत्याचं नाव होतं, रोहित पवार.
कर्जत आणि जामखेड मतदारसंघाचा भुगोल अनेकदा बदलला. अगोदर कर्जत तालुका हा श्रीगोंद्याला तर जामखेडचा काही भाग थेट पाथर्डीला जोडलेला होता. 1980, 1985 आणि 1990 या तीन टर्ममध्ये कर्जत मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता. पण पुढं 1995, 1999 आणि 2004 या तिन्ही निवडणुकीत कर्जतचे भुमिपूत्र सदाशिव लोखंडेंनी या मतदारसंघात कमळ फुलवलं. २००९ ला या मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि कर्जत व जामखेड हे दोन्ही तालुके एक झाले. त्यानंतर खुल्या झालेल्या या मतदारसंघात भाजपच्या प्रा. राम शिंदेंनी बाजी मारली. इंदिरा काँग्रेसच्या बापूसाहेब देशमुख या ज्येष्ठ नेत्यांचा त्यांनी पराभव केला. राम शिंदे १० हजारांच्या लीडने जिंकले असले तरी, त्यावेळी या मतदारसंघात बहुरंगी लढत झाली होती. मधुकर आबा राळेभात, जयसिंगराव फाळके, प्रवीण घुले, आंबादास पिसाळ, अशी सगळी दिग्गज मंडळी या निवडणुकीत उभी होती. याच मतविभागणीचा फायदा घेऊन शिंदेंनी आमदारकी मिळवली आणि पुढं दोन टर्म त्यांनीच नेतृत्व केलं. पुढं २०१४ ला, भाजपची सत्ता आल्यावर त्यांना कॅबिनेट मंत्रीपदही मिळालं. पालकमंत्रीही तेच होते. याच मंत्र्याला २०१९ ला एका युवा नेत्यानं आस्मान दाखवलं. तेही बारामतीवरुन येऊन…
२०१९ ची निवडणूक लागल्यावर, भाजपनं मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतल्या राम शिंदेंना पुन्हा तिकीट दिलं. २०१४ ला पुन्हा तिरंगी लढत झाल्यामुळं ते सहज निवडून आले होते. पण, २०१९ ला मात्र शरद पवारांची तिसरी पिढी बारामतीऐवजी, थेट कर्जत-जामखेडच्या निवडणुकीत उतरली. शरद पवारांचे नातू, रोहित पवारांनी राजकारणाचा श्रीगणेशा करण्यासाठी, भाजपचा बालेकिल्ला समजला जाणारा कर्जत-जामखेड मतदारसंघ निवडला. खरंतर, २०१९ च्या निवडणुकीपूर्वी दीड-दोन वर्षे त्यांचं या मतदारसंघात उभं रहायचं ठरलं होतं. आपला-बाहेरचा वाद होईल, हे चाणाक्ष पवारांनी जाणलं होतं. त्यामुळे २०१७ पासून रोहित पवार या मतदारसंघात मुक्कामी होते. या मतदारसंघाचा, संपूर्ण पवार कुटुंबाच्या यंत्रणेने यापूर्वीच अभ्यास केला होता. कर्जतचा जगदंबा साखर कारखाना पूर्वीच बंद पडला होता. तो कारखाना विकत घेऊन पवार कुटुंबानेत तो अंबालिका केला होता. हाच अंबालिका कारखाना पुर्ण क्षमतेने चालवून पवारांनी कर्जत तालुक्यात यापूर्वीच संपर्क वाढवला होता. रोहित पवारांची बारामती अँग्रो व अजित पवारांच्या अबालिकाने या तालुक्यातून २० टनापेक्षा जास्त गाळप करुन शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला होता. उजनी धरणाच्या पट्ट्यातील शेतकऱ्यांशी पवार कुटुंबाने चांगले संबंध ठेवलेले होते. निवडणुकीपूर्वी म्हणजेच, २०१७- २०१८ ला या तालुक्यात दुष्काळ पडला. हाच दुष्काळ रोहित पवारांच्या पथ्यावर पडला. दुष्काळात रोहित पवारांनी स्वतः या दोन्ही तालुक्यात टॅकरने पाणीपुरवठा केला. जनावरांच्या चारा छावण्याही उघडल्या. शाळा-महाविद्यालयात आरोग्य शिबिरे भरवली. क्रिया स्पर्धा भरवल्या. या दोन वर्षांत, दोन्ही तालुक्यांतील तरुण रोहित पवारांना नावानिशी ओळखू लागले होते. सृजन फाऊंडेशन आणि एकात्मिक विकास संस्थेच्या मार्फत त्यांनी सलग वर्षभर या मतदारसंघात विविध उपक्रम सुरु ठेवले. खासगी कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून या मतदारसंघात विविध विकासकामे मार्गी लावली. विद्यार्थीनींना दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च उचलला. बारामती अँग्रोतून तरुणांना रोजगार दिला. इतर कंपन्यांचे रोजगार मेळावेही घेतले. २०१९ च्या निवडणुकीपर्यंत, रोहित पवार कर्जत-जामखेडच्या घराघरांत पोहोचले होते.
२०१९ ला रोहित पवारांनी कर्जत-जामखेडमधून उमेदवारी करण्याचं फिक्स केल्यावर बारामतीचं अख्खं कुटुंब त्यांच्या मदतीला आलं. सुप्रिया सुळेंनीही या मतदारसंघात हळदीकुंकवाचे कार्यक्रम केले. महिला मेळावे घेतले. सुनंदा पवारांनीही मतदारसंघात इतर कार्यक्रम राबववले. आता शरद पवार व अजित पवार या दोन मुख्य मोहऱ्यांची बारी होती. अजित पवारांनी ही निवडणूक एकास एक करण्यासाठी, मतदारसंघातील इतर नेत्यांना एकत्र आणलं. अनेकांची मनधरणी केली. त्या काळात या दोन्ही तालुक्यातले सगळेच प्रमुख विरोधक पवारांनी आपल्याकडे खेचले. शरद पवारांनीही सभांचा धडाका लावला. काँग्रेस व इतर पक्षातील स्थानिक नेत्यांना सोबत घेतलं. मोट बांधली आणि विद्यमान मंत्री असलेल्या, राम शिंदेंसोबत लढत दिली. या निवडणुकीत आपला-बाहेरचा, मराठा-ओबीसी, अशी सगळी युद्धनिती व कुटनिती वापरली गेली. भाजपनं माधव पॅटर्न वापरून, तर राष्ट्रवादीनं मराठा कार्ड वापरुन मतांचं ध्रुवीकरण केल्याच्याही चर्चा झाल्या.
निकाल लागला तेव्हा कमळाचा बालेकिल्ला ढासाळला होता. रोहित पवारांना १ लाख ३५ हजार ८२४ मतं पडली होती. तर विद्यमान मंत्री असलेल्या राम शिंदेंना फक्त ९२ हजार ४७७ मतांपर्यंत मजल मारता आली होती. तब्बल ४३ हजार ३ मतांनी रोहित पवार आयुष्यातील पहिल्याच निवडणुकीत आमदार झाले होते. नगरच्या इतिहासात पहिल्यांदाच बाहेरच्या जिल्ह्यातील नेत्याला खुर्ची मिळवता आली होती. त्यानंतर २०२४ लाही रोहित पवार पुन्हा निवडून आले. पहिल्या पराभवानंतरही भाजपनं ताकद दिलेल्या राम शिंदेंचा त्यांनी दुसऱ्यांदाही पराभव केला. रोहित पवार लढत राहिले आणि भाजप राम शिंदेंना ताकद देतच राहिले.




