
तुम्ही साऊथचे सस्पेंन्स थ्रीलर पिक्चर पाहता का? पाहत नसाल तरी, एखाद्या खुनासाठी किती परफेक्ट प्लॅन केला जातो, हे नुकतेच एका मर्डर मिस्ट्रीवरुन समोर आलं. विशेष म्हणजे, या मर्डर मिस्ट्रीमध्ये ज्याचा खून झाला, त्याचीच बायको या घटनेतील संशयीत व्हिलन आहे. अगदी थंड डोक्यानं, एका पत्नीनं १५ वर्षांच्या संसाराचा भयानक शेवट केला. जो मारला गेलाय तो तरुण, श्रीरामपूर तालुक्यातील लोणी बुद्रुकचा आहे. आणि या प्रकरणातील अजून एक संशयीतही नगर जिल्ह्यातीलच आहे.
मंगळवारी, २१ जुलैला नेवासा पोलिस ठाण्यात एक मिसिंग दाखल झाली. लोणी खुर्द येथील ६० वर्षीय रज्जाक तय्यब शेख यांनी आपला पुतण्याशी आपला संपर्क होत नसल्याचं पोलिसांना सांगितलं. आपला पुतण्या जाबीर रफीक शेख (वय ३६, रा. लोणीबुद्रुक, ता. श्रीरामपूर) हा काल घरातून गेला. पण आता त्याचा फोन बंद लागतोय, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी शेवटचा फोन काँल व इतर माहिती घेतल्यावर त्याचं शेवटचं लोकेशन समजलं. संभाजीनगर जिल्ह्यातील शिल्लेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या रांजणगाव पोळ येथे तो गेल्याचं पोलिसांना समजलं. गंगापूर तालुक्यात लासूर स्टेशन ते संभाजीनगर महामार्गावर हे गाव आहे.
आता जाबीर तेथे का गेला, याची माहिती पोलिसांनी काढायला सुरुवात केली. जाबीरचं लग्न १५ वर्षांपूर्वी झालं होतं. संभाजीनगर जिल्ह्यातील पडेगाव ही त्याची सासूरवाडी. तेथील शब्बो उर्फ शबाना शेख हिच्याशी त्याचा विवाह झाला होता. सुरुवातीचे काही दिवस चांगला संसार झाल्यावर या दोघांमध्ये खटके उडू लागले. वाद विकोपाला गेल्यावर शब्बो, गेल्या चार वर्षांपासून तिच्या माहेरीच राहते. हे पोलिसांना समजलं. जाबीर शिल्लेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेला होता त्यामुळे नेवासा पोलिसांनी हा तपास तेथील पोलिसांकडे वर्ग केला.
आता पुन्हा तपासाचा पुढील भाग सुरु झाला. जाबीरच्या नातेवाईकांशी व मित्रांशी संपर्क करण्यात आला. त्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली. जाबीरला सोमवारी त्याच्या पत्नीचा काँल आला. दोघे विभक्त राहत असल्यानं तिनं समझोता करण्यासाठी पती जाबीरला भेटण्यासाठी बोलावलं. गंगापूर तालुक्यातील रांजणगाव पोळ येथील वेलकम हाँटेलवर तू ये, असं तिनं जाबीरला सांगितलं. पत्नीनं बोलावल्यामुळे जाबीर सोमवारी सकाळीच घरातून निघाला. त्यानं त्याच्या नातेवाईंकांनाही हे सांगितल्याचं पुढं आलं. त्यानंतर तो शब्बोनं सांगितलेल्या हाँटेलवर पोहोचला. काही वेळात तिथं पत्नी शब्बोही आली. त्यानंतर हे दोघे हाँटेलच्या रुमवर गेले. त्यानंतर काही वेळात तिथं शब्बोचा मामाही आला.
मामाचं नाव होतं, कलीम मेहमूद पठाण (रा. सोनेसांगवी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर). साधारणः सकाळी सव्वादहा वाजता हे सगळे हाँटेलच्या रुममध्ये होते. त्यानंतर काही वेळाने ही मामा-भाची या हाँटेलातून निघून गेले. पण जबीर हाँटेलमधून बाहेर आलाच नाही. सकाळी सव्वादहा ते मंगळवारी 21 जुलै रोजी पहाटे चार वाजेच्या दरम्यान झालेल्या मारहाणीत जाबीरचा मृत्यू झाल्याचे समोर आले. हॉटेलच्या रुममध्ये जाबीरवर इतका गंभीर हल्ला करण्यात आला की त्याचा मृत्यू झाला. हा खून साधासूधा नव्हता. त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. जाबीरचा इतक्या क्रूरपणे आणि निर्दयतेने खून का करण्यात आला, यामागील याचा तपास आता सुरु झाला.
मृताच्या काकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन, पत्नी शबाना शेख व तिचा मामा कलीम मेहमूद पठाण या संशयीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून या दोघांचाही शोध सुरु आहे. शिल्लेगाव पोलिसांचे एक पथक संशयीतांचा शोध घेत आहे. हाँटेलमधील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेण्यात आलं आहे. संशयीतांचे लोकेशन ट्रॅक करुन हाँटेलच्या कर्मचाऱ्यांचे जबाब घेण्यात आले आहेत. पत्नीने आपल्याच पतीचा एवढ्या निर्दयीपणे खून का केला, याचाही तपास सुरु आहे. हे प्रकरण अगदीच भयंकर होतं. समाज कुठं चाललाय? हा प्रश्न यानिमित्ताने पुढं आलाय. या खून प्रकरणानं अहिल्यानगर जिल्ह्यात मात्र एकच खळबळ उडाली आहे.




