
उत्तरेचं राजकारण भल्याभल्यांना पाणी पाजतं. इथं कधी काय होईल, याचा नेम नाही. आत्ताच अशी स्थिती आहे असं नाही, तर गेल्या सात-आठ दशकांपासून उत्तरेचं राजकारण खतरनाकच राहिलंय. उत्तरेत कोण कुणाची कशी गेम करेल, याचा नेम नसतो. उत्तरेतील आक्रमक राजकारणाचा गड समजल्या जाणाऱ्या श्रीरामपूरमध्येही १९९९ ला अशीच एक निवडणूक झाली. ज्या निवडणुकीनं नुसता धक्कादायक निकालच लावला नाही, तर मुरकुटे नावाच्या राजकीय वादळाला कित्येक वर्षे शांत केलं. याच निवडणुकीनं, जिल्ह्यात पहिल्यांदा राम-लक्ष्मण विशेषणाचे दोन नेते तयार केले. आदीक-मुरकुटे वगळता तिसऱ्या शक्तीचा उदय झाला.
उत्तरेतील श्रीरामपूर मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला. आजही तो काँग्रेसकडेच आहे. याच तालुक्यातील रामराव आदिक हे थेट उपमुख्यमंत्री पदापर्यंत जाणारे जिल्ह्यातील पहिले नेते होते. त्यांच्यानंतर गोविंदराव आदीकांनी श्रीरामपूरच्या राजकारणात एकहाती वर्चस्व मिळवलं. मधल्या काही निवडणुकांचा अपवाद वगळता हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहिला. आदिक, विखे त्यानंतर मुरकुटे गटाने या मतदारसंघावर एकहाती हुकूमत गाजवली. आक्रमक नेता म्हणून ओळख असणारे भानुदास मुरकुटे यांनी वेगवेगळ्या पक्षाकडून या मतदारसंघावर १५ वर्षे हुकूमत गाजवली. सडेतोड आणि आक्रमक नेता म्हणून ते जिल्ह्यात प्रसिद्ध होते. अगदी बाळासाहेब विखेंपासून ते बाळासाहेब थोरातांपर्यंत त्यांनी सगळ्यात नेत्यांवर जाहीर टिका केली होती. चार्टड अकाऊंटंट असणारे मुरकुटे हे श्रीरामपूरचे एक धडाडीचे नेते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी १९८० मध्ये काँग्रेसकडून, १९९० मध्ये जनता दलाकडून आणि १९९५ मध्ये पुन्हा काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक जिंकून स्वतःची राज्यभर ओळख तयार केली होती. आदीक पर्वाचा खरा अस्त मुरकुटेंनीच केला. गोविंदराव आदीकांना सलग दोन निवडणुकांमध्ये पराभूत करुन मुरकुटेंनी जिल्ह्याचे लक्ष वेधले होते. अशोक कारखान्याची सत्ता हातात आल्यावर त्यांनी सहकाराच्या माध्यमातून थेट विखेंनाही कित्येकदा अंगावर घेतले होते. याच मुरकुटे नावाच्या वादळाला रोखण्यासाठी विखे-आदीकांनी केलेल्या १९९९ च्या निवडणुकीचा किस्सा भलताच भारी राहिला.
१९९९ ला शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यावेळी प्रवरेचे बाळासाहेब विखे व संगमनेरचे बाळासाहेब थोरात वगळता जिल्ह्यातील बहुतांश नेते त्यांच्यासोबत गेले. अकोल्याचे मधुकरराव पिचड, श्रीगोंद्याचे बबनराव पाचपुते, कोपरगावचे शंकरराव कोल्हे, नेवाशाचे यशवंतराव गडाख, राहुरीचे प्रसाद तनपुरे यांच्यासह श्रीरामपूरचे भानुदास मुरकुटेंनीही शरद पवारांना साथ दिली. या वर्षी राज्यात मुदतपूर्व निवडणुका लागल्यावर, या सगळ्याच नेत्यांना शरद पवारांनी तिकीट दिलं. श्रीरामपूरमधून भानुदास मुरकुटेंही राष्ट्रवादीचे उमेदवार झाले. मुळात हा मतदारसंघ परंपरागत काँग्रेसचा असल्याने, काँग्रेसला मुरकुटेंविरोधात उमेदवार हवा होता. शिवाय काँग्रेसमध्ये असणाऱ्या विखे व आदिक गटालाही मुरकुटेंचा बदला पूर्ण करायचा होता. मुरकुटे सलग तिसऱ्या टर्मलाही विद्यमान आमदार होते. आता मुरकुटेंसमोर लढायचं म्हटल्यावर, विखे-आदीक या दोन्ही नेत्यांनी उमेदवाराचा शोध सुरु केला. मुरकुटेंविरोधात फक्त तुल्यबळ नेताच शोधायचा नव्हता तर शेवटपर्यंत लढणारा नेता शोधायचा होता. कारण त्यावेळी मुरकुटेंची फक्त श्रीरामपूरच नाही, तर संपूर्ण उत्तरेत चांगलीच दहशत होती.
उमेदवाराचा शोध घेताना विखेंसमोर अचानक श्रीरामपूरचे नगराध्यक्ष जयंत ससाणेंचं नाव आलं. ससाणे हे श्रीरामपूरच्या राजकारणात १९८० पासून सक्रीय होते. ते पूर्वीचे आदीकांचे व नंतर मुरकुटेंचे कार्यकर्ते असले तरी, नगरपालिकेत तब्बल १५ वर्षांपासून सक्रीय होते. श्रीरामपूर शहराचा विचार केला, तर ससाणेंएवढा लोकप्रिय नेता शहरात दुसरा कुणीच नव्हता. त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या काळात श्रीरामपूर शहराचा कायापालट झाला, हे अगदी ससाणेंचे विरोधकही मान्य करत होते. शहरातील भुयारी गटार योजना, शुद्ध पाणीपुरवठा योजना, रस्त्यांचे सुशोभीकरण, दुभाजक आणि ‘झोपडपट्टी मुक्त श्रीरामपूर’ यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांचे श्रेय ससाणे यांचेच होते. मुरकुटे राष्ट्रवादीत गेल्यावर ससाणेही राष्ट्रवादीत जाणार होते. परंतु तेव्हाच विखे गटाने डाव टाकला. ससाणेंना काँग्रेसमध्येच थांबवत त्यांच्या तिकीटासाठी आपलं वजन खर्च केलं. झालंही विखेंच्या मनासारखंच… विशेष म्हणजे आता आदीकांचीही साथ ससाणेंना मिळाली. काँग्रेसनं श्रीरामपूरमधून जयंतराव ससाणेंना तिकीट दिलं. पण त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी मात्र आपसून विखेंच्या खांद्यावर पडली. मुरकुटेंसोबत विखेंचं जुनं शितयुद्ध होतंच. पण आता पक्ष वेगवेगळे असल्यानं, मुरकुटेंसोबत विखेंना थेट लढता येणार होतं.
आता खरा डाव सुरु झाला होता. तीन टर्म आमदार असल्यानं व अशोक कारखाना ताब्यात असल्याने मुरकुटेंची ग्रामीण भागावर चांगली पकड होती. परंतु कारखान्याच्याच काही संचालकांसोबत मुरकुटेंचे खटके उडत होते. हीच बाब हेरून प्रवरा यंत्रणा कामाला लागली. ससाणेंना शहराची जबाबदारी देऊन, प्रवरा यंत्रणेनं पडद्यामागून ग्रामीण भागावर लक्ष्य केंद्रीत केलं. ससाणे हे मुरकुटेंचे पुर्वीचे खंदे समर्थक मानले जायचे. त्यामुळे मुरकुटे गटाने सुरुवातीला ससाणेंच्या उमेदवारीला हलक्यात घेतलं. नगराध्यक्ष कसा आमदार होईल, म्हणून अशोकची यंत्रणा सुरुवातीला सुस्त राहिली. मात्र जसजसा प्रचार पुढंपुढं सरकत गेला, तसतसं वातावरण फिरायला लागलं. ससाणे यांनी अतिशय संयमी, सुसंस्कृत आणि विकास करणारा नगराध्यक्ष अशी आपली प्रतिमा मतदारांसमोर मांडली. या निवडणुकीत सर्वात मोठा टर्निंग पॉईंट शेवटच्या दोन दिवसांत ठरला. भानुदास मुरकुटे यांच्याकडे मोठी आर्थिक आणि राजकीय ताकद होती. कारखानाही होता. पण असं सांगतात की, मतदानाच्या आदल्या रात्री राधाकृष्ण विखे पाटील स्वतः श्रीरामपूरमध्ये तळ ठोकून बसले. विखे आणि ससाणेंनी दोन दिवस आधी तालुक्यातील प्रमुख गावांच्या सरपंचांची आणि विविध सोसायट्यांच्या प्रमुखांची गुप्त बैठक घेतली. अशोक कारखान्याचे सभासद व संचालकांशी पडद्यामागून संपर्क साधला. जे सभासद मुरकुटेंना घाबरत होते, ते दिवसा मुरकुटेंच्या प्रचारात आणि रात्री ससाणेंच्या बैठकीला यायचे, असेही काही किस्से सांगितले जाऊ लागले. मतदानाच्या अगोदर काही तास, वातावरण आतून फिरलं होतं.
ससाणेंच्या पथ्यावर पडणारी अजून एक गोष्ट यावर्षी झाली होती. ही लढत फक्त मुरकुटे व ससाणे म्हणजेच काँग्रेस व राष्ट्रवादीत न होता, तिरंगी झाली होती. शिवसेनेचे अनिल कांबळेही या निवडणुकीत उभे होते. ग्रामीण भागात शिवसेनेचीही ताकद चांगली होती. त्यामुळे ग्रामीण भागाचे होणारे मतविभाजन हे ससाणेंच्या पथ्यावर पडणार, हाही अंदाज प्रवरा यंत्रणेने बांधला होता. निकाल लागला तेव्हा हे सगळे अंदाज खरे ठरले. काँग्रेसच्या जयंत ससाणे काठावर का होईना पण विजयी झाले. ससाणेंना ३६ हजार ५३ मते मिळाली. तर मुरकुटेंना ३५ हजार ३८४ मतांवर समाधान मानावे लागले. ६६९ मतांनी ससाणे निवडून आले होते. शिवसेनेच्या उमेदवारामुळे मुरकुटेंचा गेम झाला होता. शिवसेनेच्या उमेदवारानेही २१ हजार २८० मते घेऊन, जोरदार मतविभागणी केली होती.
अशक्य वाटणारा मुरकुटेंचा पराभव ससाणेंसारख्या नगराध्यक्षाने करुन दाखवला होता. पुढं २००४ सालीही ससाणेंनी पुन्हा एकदा बाजी मारली. त्यानंतर मात्र २००९ मध्ये हा मतदारसंघ आरक्षित झाल्यावर ससाणेंना थांबावं लागलं. पण तरीही ससाणेंनी आपल्या गटाच्या भाऊसाहेब कांबळेंना सलग १० वर्षे आमदार करुन दाखवलं. जयंत ससाणे व राधाकृष्ण विखे ही जोडी नगरच्या राजकारणात पुढं राम-लक्ष्मणाची जोडी म्हणून प्रसिद्ध झाली. विखेंच्या मध्यस्थीनेच ससाणेंना पुढं शिर्डी संस्थानचं अध्यक्षपदही मिळालं होतं. याच बाजीगर नेत्याचं १९ फेब्रुवारी २०१८ रोजी निधन झालं. पुढं कायम आमदार बदलणारा मतदारसंघ म्हणून श्रीरामपूर चर्चेत आलं. पण ससाणे होते तोपर्यंत तेच श्रीरामपूरच्या राजकारणाचे खऱ्या अर्थानं सारथी राहिले.




