
समाजातील जातीभेद कमी करण्यासाठी राज्य शासनाकडून आंतरजातीय विवाह करणाऱ्या पात्र दांपत्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनपर अर्थसहाय्य दिले जाते. पण अहिल्यानगर जिल्ह्यातील १४१ जोडपी गेल्या ९ महिन्यांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.
शासनाकडून निधी न मिळाल्याने पात्र लाभार्थ्यांना अनुदान मिळत नाहीये. पण, आता या सर्व प्रस्तावांसाठी ७० लाख ५० हजारांचा निधी मागवण्यात आला असून, तो पुढील दोन महिन्यांत मिळण्याची शक्यता समाज कल्याण विभागाने व्यक्त केली आहे.
ऑक्टोबर २०२५ पर्यंतचे अनुदान वितरित झाले असून त्यानंतर आलेले सर्व प्रस्ताव प्रलंबित आहेत. या योजनेचा लाभ अनुसूचित जाती, जमाती, भटक्या-विमुक्त प्रवर्गातील एका व्यक्तीने सवर्ण हिंदू, जैन, लिंगायत, बौद्ध किंवा शिख समाजातील व्यक्तीशी विवाह केल्यास मिळतो.
पात्र लाभार्थींनी काळजी करण्याचे कारण नसून, निधी प्राप्त होताच प्रलंबित सर्व पात्र प्रस्तावांना अनुदान दिले जाईल, असे समाज कल्याण विभागाने स्पष्ट केले आहे.





