Latest

पारनेर हादरलं… जमिनीच्या वादातून रक्तरंजित थरार ! झोपेतच काढला काटा; पतीचा मृत्यू, पत्नीची प्रकृती चिंताजनक!

अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील जातेगाव येथे जमिनीच्या वादातून घडलेल्या घटनेने परिसर हादरला आहे. घरात पती-पत्नी झोपलेले असताना अचानक काही जण तेथे आले. त्यानंतर सुरू झालेल्या मारहाणीत पतीचा जीव गेला, तर पत्नी गंभीर जखमी झाली.

मृत हिरामण सुरेलाल भोसले आणि त्यांची पत्नी चांदणी उर्फ दिव्या भोसले हे रविवारी पहाटे घरी झोपले होते. त्याचवेळी राजू भोसले, मंजाबापू भोसले, देवेंद्र भोसले, धर्मा भोसले आणि रत्नकुश भोसले यांच्यासह अन्य एका व्यक्तीने तेथे येऊन हल्ला केल्याचा आरोप आहे.

पिंपळनेर येथील जमिनीत हिस्सा का मागता आणि आमच्याविरोधात पोलिसांत तक्रार का करता, असा जाब विचारत हिरामण यांना लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण करण्यात आली. पतीला वाचवण्यासाठी धावलेल्या चांदणी यांनाही मारहाण करण्यात आली. आरोपींनी घरातील कागदपत्रे आणि मोबाईलही लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हल्लेखोर निघून गेल्यानंतर हिरामण यांना रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. चांदणी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button