Latest

दिवाळीपूर्वी शेतकर्यांना आर्थिक मदत मिळणार – आ खताळ

शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे काम सुरू असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी महायुती सरकारच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.

संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे मळगंगा माता नवरात्रोत्सवा निमित्त कन्याकुमारी ते सावरगाव तळ आणलेल्या पवित्र ज्योतीचे आमदार खताळ यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित भाविकांना आ खताळ म्हणाले, की दरवर्षी निसर्गाच्या बदलत्या चक्राचा फटका शेतीला बसत आहे. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती, तर यंदा पावसाने ओढ दिल्याने कोरड्या दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे.

निसर्गातील बदल आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना सातत्याने संकटांचा सामना करावा लागत आहे. यंदा पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार देणे ही शासनाची जबाबदारी आहे.

शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न महायुती सरकारच्या माध्यमातून केला जाणार आहे. दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, समाजातील प्रत्येक घटकानेही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून सहकार्याची भावना जपली पाहिजे.
असेही आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले

निसर्गाची परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी आपल्यातील भक्तीभाव कमी होता कामा नये. देव, देश आणि धर्म यांचे महत्त्व आजच्या तरुण पिढीला समजावून सांगणे गरजेचे आहे. आपल्या संस्कृतीतील परंपरा, श्रद्धा आणि संस्कार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही आमदार अमोल खताळ यांनी केले.नवरात्र उत्सव तरुण मित्र मंडळ महायुतीचे कार्यकर्ते सावरगाव तळ ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आगामी काळात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेणे आवश्यक आहे. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. गावोगावी जलसंधारणाची कामे झाल्यास भूजलपातळी वाढण्यास मदत होईल आणि भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करता येईल. यासाठी शासनाच्या प्रयत्नांबरोबरच लोकसहभागातूनही व्यापक काम उभे राहणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button