
दुष्काळाचं सावट, पावसाची कमतरता आणि वाढता उत्पादन खर्च अशा संकटात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. कोपरगावातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना यंदाच्या गळीत हंगामात उसाला पहिली उचल प्रतिमेट्रिक टन ३ हजार २०० रुपये देणार आहे. कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी ही घोषणा केली.
कारखान्याच्या २०२६-२७ या ७२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ घटस्थापनेच्या मुहूर्तावर करण्यात आला. यंदा कमी पावसामुळे उसाची अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहनही आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांना केले.
विशेष म्हणजे, जानेवारीनंतर गाळपासाठी येणाऱ्या उसाला अतिरिक्त अनुदान मिळणार आहे. १ ते १५ जानेवारीदरम्यान प्रतिटन १०० रुपये, १६ ते ३१ जानेवारीदरम्यान १५० रुपये, १ ते १५ फेब्रुवारीदरम्यान २०० रुपये, तर त्यानंतर गाळपासाठी येणाऱ्या उसाला प्रतिटन २५० रुपये विशेष अनुदान दिले जाणार आहे. या घोषणेमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किती दिलासा मिळतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





