
अहिल्यानगरमध्ये ९ ऑक्टोबरला दुपारी अडीच वाजता एक धक्कादायक घटना घडली. जामखेडमधील कलाकेंद्रे बंद करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेला वाद थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला.
मागणी मान्य होत नसल्याने एका व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. नितीन दत्तात्रय आजबे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःच्या अंगावर डिझेलसदृश ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
मात्र, परिसरात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली आणि नितीन यांना वेळीच रोखले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, त्यांचे भाऊ सचिन आजबे हे जामखेडमधील कलाकेंद्रे बंद करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. यापूर्वीही आश्वासन मिळाले, मात्र कारवाई झाली नाही, असा आरोप त्यांनी केला. कलाकेंद्रांमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाल्याचा दावाही त्यांनी केला.
या घटनेप्रकरणी नितीन आजबे यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





