नगर शहरातील बुरुडगाव परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाला ४ जूनला तब्बल अर्धा कोटींना लुबाडण्यात आले. ही घटना साधी सुधी नव्हती. आता हे अर्धा कोटी कसे लुबाडले, तर स्वस्तातल्या सोन्याच्या आमिषाने. स्वस्तातल्या सोन्याच्या आमिष काही कमी होत नाही, आणि त्यातील लुबाडणूकही कमी होत नाही. श्रीगोंदा, संगमनेर, पारनेर, कर्जत-जामखेड आदी परिसरात स्वस्तातल्या सोन्याने लुबाडणूक झाली होती. आता पुन्हा अशाच घटनेची पुनरावृत्ती झाली. परंतु लुबाडणूक झालेला काही नगरचा नव्हता. आणि लुटणारी टोळीही नगरची नव्हती. परंतु नगरची खासियत पाहिली तर या टोळीने लुबाडणुकीसाठी मुद्दाम नगरची निवड केली.
अहिल्यानगर तालुक्या पोलिस ठाण्यात ४ जूनला एक तक्रार दाखल झाली. नगरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तिघांकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यातील बांधकाम व्यावसायिक असणाऱ्या अविनाश अनिल नलावडे (वय ३४, रा. सणसवाडी, ता. माणगाव, जि. रायगड) यांनी पोलिसांना एक फिर्याद दिली. ही फिर्याद भयंकर होत. फिर्यादीनुसार अविनाश नलावडे हे रायगड जिल्हा परिषदेचे सदस्यही आहेत. त्यांना व त्यांच्या दोन साथीदारांना नगरमध्ये बोलावून घेत जबर मारहाण झाली होती. ही मारहाण एवढी भयंकर होती, की त्यापैकी दोघांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. परंतु नलावडे हे नगरला का आले, हे फिर्यादीत नमूद करण्यात आले. तो मुद्दाच सध्या चर्चेत आलाय.
नलावडे हे जिल्हा परिषद सदस्य असले तरी, ते बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे राजू मोहिते व अक्षय मोहिते हे सख्खे भाऊ कामाला आहेत. मोहिते बंधू हे डबर व्यवसाय करतात, त्यामुळे नलावडे व त्यांची ओळख आहे. यातील राजू मोहिते याने २५ मे रोजी नलावडे यांना पुण्यात नेले. तेथे बापू पवार नावाच्या व्यक्तीसोबत नलावडे यांची ओळख करुन दिली. या बापू पवारकडे तब्बल चार किलो सोने असल्याचं राजू मोहितेनं नलावडे यांना सांगितलं.
आता हे सोनं चोरीचच असेल, हे कदाचित नलावडे यांना समजलं असावं. परंतु तरीही ते सोनं स्वस्तात देतोय, म्हटल्यावर नलावडे यांनाही ते घेण्याचा मोह झाला. हे चार किलो सोनं २५ लाख रुपये किलोप्रमाणे पवारला विकायचं, असं राजू मोहितेनं सांगितलं. आता ते सोनं खरं की खोटं, हे तपासण्यासाठी बापू पवारनं त्याने सोबत आणलेले सोन्याचे काँईन नलावडे यांना दिले. ते काँईन नलावडे यांनी त्यांच्या सोनाराकडून तपासले. तर ते शंभर टक्के खरे असल्याचं समजलं. नलावडे यांचा विश्वास बसला. आता हेच सोनं विकत देण्याच्या बहाण्यानं, राजू मोहितेच्या मध्यस्थीनं बापू पवारनं नलावडे यांच्यावर डाव टाकला.
सुरुवातीला नलावडे यांना रोख रक्कम घेऊन या, तुम्हाला किलोभर सोनं देऊ, असा विश्वास दिला. त्यानुसार पैशाची तजबीज करुन नलावडे यांनी पैसे जमा झाल्यावर मोहितेच्या माध्यमातून पवारशी संपर्क केला. पवारनं सुरुवातीला सोनं घेण्यासाठी नलावडे यांना हिंगोलीला बोलावलं. नलावडे हे रायगडवरुन हिंगोलीला निघाले. सोबत सोनार सोनाराम माळी व गाडीचा चालक प्रकाश जंगम होते. दोन वाहनांतून ते हिंगोलीकडे निघाले. परंतु प्रवाासदरम्यान त्यांना हिंगोलीला न येता अहिल्यानगरला येण्याचं सांगण्यात आलं.
नलावडे यांनी हिंगोलीकडून आपला प्रवास अहिल्यानगरकडे सुरु केला. वाटेत पुन्हा फोन करुन त्यांची ठिकाणे बदलली गेली. सुरुवातीला नगर-पुणे हाय-वे वरील सुप्याला येण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर काही वेळाने रायतळे येथे या, असा निरोप त्यांना मोबाईलवरुन दिला गेला. त्यानंतर नगर जवळील सारोळा स्टेशनला या, असं त्यांना सांगितलं गेलं. स्वस्तात सोनं मिळतंय म्हटल्यावर घेणाऱ्यांनीही वेगवेगळी ठिकाणे बदलूनही त्यांच्यावर विश्वास ठेवला. अखेर सुरक्षित लोकेशन म्हणून नगर जवळील बुरुडगाव परिसरात नलावडे यांना बोलविण्यात आलं.
बुरुडगाव परिसरात रेल्वे उड्डाणपुलाच्या परिसरात निर्जन स्थळ फिक्स करण्यात आलं. व्यवहार करण्यासाठी हीच जागा सेफ आहे, असं समोरुन सांगितलं गेलं. नलावडे आपल्या सहकाऱ्यांसह उड्डाणपुलाजवळ गेले. तेथे बापू पवार यानं आपल्याकडील सोनं नलावडे यांना दिलं. नलावडे यांनी आपल्यासोबत आणलेल्या सोनाराला हे सोनं चेक करण्यासाठी गाडीत दिलं. सोनार सोनं चेक करत असतानाच, राजू मोहिते यानं शिट्टी मारली. पहिल्यांदा नेमकं काय होतंय, हे नलावडे यांच्या लक्षात आलं नाही. परंतु पुढच्या काही सेकंदात उड्डाणपुलाजवळील उसाच्या शेतात दबा धरुन बसलेले आणखी दहा ते पंधरा जण हातात काठ्या-कोयते घेऊन बाहेर आले.
त्यांनी लगेच नलावडे व सोनार व चालकावर हल्ला सुरु केला. लोखंडी राँड, हत्यारे असं सगळं काही त्यांच्याकडे होतं. या तिघांना बेदम मारहाण करत, या लुटारुंनी त्यांच्या दोन्ही गाड्यांची झडती घेतली. आरोपींनी त्यांच्याकडून ४६ लाख रुपये रोख, साडेतीन तोळ्याची गळ्यातली चैन, एक लाखांचे महाकालीचे लाँकेट, अडीच तोळे सोन्याच्या तीन अंगठ्या असा एकूण ५२ लाख ८० हजारांचा ऐवज चोरला. व काही वेळात हे सगळे लुटारु तेथून गायब झाले.
हे तिघेही गंभीर जखमी अवस्थेत रस्तात पडले. अखेर कुणीतरी त्यांना रुग्णालयात दाखल केले आणि त्यानंतर या लुटीचा खुलासा झाला. ४ जूनला ही फिर्याद दाखल झाल्यावर नगरच्या पोलिसांनी अवघ्या काही तासांत तपासासाठी पथके तैनात केली. फिर्यादीत नमूद केलेल्या काही नावांसह अनोळखी १० ते १५ जणांचा शोध सुरु आहे. ही घटना अगदीत धक्कादायक होती.
स्वस्तात सोन्याच्या अमिषाने आत्तापर्यंत नगरच्या टोळ्याच लुटत होत्या. परंतु आता बाहेरच्या टोळ्या येऊन नगरमध्ये लुटमार करत असल्याने पोलिसांचंही टेन्शन वाढलं. या टोळीत नगरचे काही गुन्हेगार सामिल असण्याच्या शक्यता आहेत. असे गुन्हे करणाऱ्या नगरच्या काही टोळ्यांवर पोलिसांनी लक्ष्य केंद्रीत केलं आहे. लुटमारीच्या बातम्या देऊनही हे प्रकार थांबत नसल्याने सोन्याचा मोह किती वाईट असतो, याची प्रचिती पुन्हा एकदा आलीय.





