Explained

ATS Raid In Shrirampur | श्रीरामपूरमधील चौघांची चौकशी, पाकिस्तानला काय माहिती दिली?

गेल्या काही वर्षांपासून, श्रीरामपूर शहर चांगलंच चर्चेत आलंय. काही संवेदनशील घडामोडींमुळे या शहराची चर्चा देशभर झालीय. कुख्यात अतिरेकी बंटी जहागीरदारची हत्या, त्यानंतर त्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेला जमाव, सोशल मीडियावरुन झालेली दमबाजी, बंटीचे केलेले उदात्तीकरण, त्यानंतर रामनवमी मिरवणुकीवर दगडफेक, या सगळ्यांमुळे श्रीरामपूर थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलं. यूपीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जशी देशविरोधी कारवाया करणाऱ्यांची धिंड काढली, तशीच धिंड श्रीरामपूरमधील कट्टरवाद्यांचीही निघावी, अशा चर्चा सुरु झाल्या. त्यातच दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने श्रीरामपूरमधील चौघांना ताब्यात घेतल्यावर हे शहर पुन्हा बातम्यांमध्ये झळकू लागलं.

श्रीरामपूरमधील ज्या चौघांची चौकशी केली, ते पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टरच्या संपर्कात असल्याचा संशय एटीएसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या चौघांनी पाकिस्तानात नेमकी काय सूत्रे हलवली, ते लवकरच समोर येईल. हिंदूत्ववादी कार्यकर्ता सागर बेग यांच्या हत्येचा काही गेम होता का? अशाही चर्चा सुरु झाल्यात.

गेल्या दोन दिवसांपासून नगर जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. याच गदारोळात याच नगर जिल्ह्यात एक मोठी घडामोड घडली. परंतु निवडणुकीच्या चर्चांमध्ये या बातमीकडे कुणाचेही लक्ष्य गेले नाही. बातमी अशी होती की, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने श्रीारामपूर शहरातील तीन आणि तालुक्यातील एकाला दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले. पाकिस्तानातील एका गुंडाशी व त्याच्या टोळीशी या चौघांचाही संबंध असल्याचा सुगावा एटीएसला लागला होता. शिवाय हे चौघेही पाकिस्तानमधील सोशल मिडिया हॅडलरच्याही संपर्कात असल्याची कुणकुण एटीएसला लागली होती. याच संशयावरुन एटीएसनं बुधवारी भल्या पहाटे श्रीरामपूरमध्ये दाखल होत सात ते आठ ठिकाणी छापे टाकले.

या छाप्यापूर्वी एटीएस पथकाने संबंधीत ठिकाणी टेहाळणी केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर अगदी नियोजनबद्ध पद्धतीने व गुप्तरित्या हे छापे टाकले गेले. त्यात अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. परंतु याच कारवाईदरम्यान तब्बल तीन ते चार जण पसार झाल्याची माहितीही समोर आली. चौकशीत एटीएसचा संशय बळावलेल्या चौघांना तसेच ताब्यात ठेवले गेले. त्यांची तब्बल १० तास चौकशी झाली. या छाप्यात काही संशयास्पद मोबाईल, माहिती, कागदपत्रे, लॅपटाँप, कम्पुटरही ताब्यात घेतले. बुधवारी दिवसभर हा सगळा प्रकार होऊनही त्याची कुणकुण कुणालाच लागली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, पाकिस्तानमधील काही गुन्हेगारी टोळ्यांशी श्रीरामपूरमधील काही तरुणांचे संपर्क आहेत. सोशल मिडियाच्या माध्यमातून हे तरुण पाकिस्तानमधील काहींसोबत चँटींग व काँलिंगच्या माध्यमातून संपर्कात आहेत. श्रीरामपूरमधील या तरुणांना, पाकिस्तानमधील हॅण्डलरने कदाचित, हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांची माहिती गोळा करण्याचे कामही दिल्याच्या चर्चा आहेत. या चारही तरुणांनी श्रीरामपूर शहरातील काही ठिकाणांची व व्यक्तींची माहिती पाकिस्तानमधील गँगस्टरला व त्याच्या गँगला दिल्याचा संशय आहे.

श्रीरामपूर शहर व जिल्ह्यातील इतर काही भागांची रेकीही या चौघांनी केल्याच्या शक्यता आहेत. या सगळ्या संशयावरुन या चौघांचीही चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडून काही डिजीटल माध्यमे जप्त करण्यात आली. या सगळ्या पुराव्यांची फाँरेन्सिक व तांत्रिक तपासणी होणार आहे. डिलिट केलेला सगळा डाटा रिकव्हर केला जाणार आहे. हे चौघे कधीपासून पाकिस्तानशी संबंधीत आहेत, हेही तपासले जाणार आहे.

ज्या चार जणांना एटीएसने ताब्यात घेतले होते, त्यांनी चौकशीत काही संशयास्पद माहिती दिल्याचेही समोर आले आहे. एका तरुणाने त्याला पाकिस्तानमधील एका इंस्टाग्राम खात्यावरून मेसेज आल्याचे कबूल केले. त्यांच्यात संवादही झाला, परंतु नंतर घाबरून त्याने ते सर्व चॅट्स डिलीट करून टाकल्याचे सांगितले. दुसऱ्या एका तरुणानेही, त्याला पाकिस्तानच्या एका व्हॉट्सॲप नंबरवरून फोन आल्याचे कबूल केल्याचे सांगितले जातेय. फोन करणाऱ्याने त्याला श्रीरामपूरमधील काही लोकांबद्दल आणि परिसराबद्दल चौकशी केली. मात्र, आपण कोणतीही माहिती दिली नाही, असा दावा या तरुणाने केला. परंतु एटीएसला त्यांच्या बोलण्यावर विश्वास नाही, त्यामुळे त्यांच्याकडील सर्व सीमकार्ड आणि इलेक्ट्राँनिक्स साहित्य जप्त करण्यात आले आहे.

तिसऱ्या तरुणाने, तो एका पाकिस्तानी इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करत असल्याचे कबूल केले. पण आपण पाकिस्तानला कोणतीही महत्त्वाची माहिती शेअर केली नसल्याचे या तरुणाचे म्हणणे आहे. परंतु असे होते, तर या सगळ्या तरुणांनी त्यांचे चॅट्स डिलीट का केले? हा प्रश्नच आहे. चॅट्स डिलिट करण्यामागे नक्की काय हेतू होता? श्रीरामपूरमधील कुणाची माहिती या तरुणांनी पाकिस्तानला दिली? या तरुणांनी कुणाकुणाची रेकी केली? या सगळ्या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी या सर्वांच्या फोनचा डेटा रिकव्हर केला जात आहे. हिंदूत्ववादी कार्यकर्ते सागर बेग हे त्यांच्या आक्रमक भाषणामुळे चर्चेत आहेत. त्यांच्याबाबतही या चौघांचा काही प्लॅन होता का?

हेही तपासले जात असल्याचे समजते. संपूर्ण चौकशीनंतरच खरी माहिती समोर येईल. अद्याप या चारही तरुणांबाबत फक्त चर्चा सुरु आहेत. एटीएसच्या छापेमारी दरम्यान, काही संशयित घरी हजर नव्हते. ते फरार झाल्याचा संशय आहे. एटीएसने आता त्यांचा शोध सुरु केला आहे. पाकिस्तानमधील गुन्हेगारी नेटवर्क आणि सोशल मीडिया हँडलर्स हे श्रीरामपूरमधील या स्थानिक तरुणांचा वापर करून काही मोठा कट रचण्याचा डाव होता का? या अँगलनेही एटीएसकडून तपास केला जात आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नसली तरी एटीएसने तपासाची गती मात्र वाढवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button