
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीची जशी एकी दिसली, तशी मविआत मात्र दिसली नाही. तनपुरे हे पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच असल्याने त्यांना जिंकून आणण्यासाठीच मविआने ठरवून घोळ घातलाय का? हा प्रश्न त्यांच्याच कार्यकर्त्यांना पडला. मविआतील ठाकरे गटाचे जिल्ह्यात अस्तित्वच राहिले नाही. गेल्या आठवड्यात शिर्डीत झालेल्या खा. संजय राऊत यांच्या मेळाव्याला तर त्यांच्याच पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरेही उपस्थित नव्हते. जिल्ह्यातील ठाकरे गट सध्या अस्तित्वासाठी लढतोय. पण ज्यांची चर्चा आहे, ते काँग्रेस व राष्ट्रवादीचा शरद पवार गटही सध्या आपल्याच हाताने आपल्या पायावर दगड टाकू पाहतोय, अशी चर्चा आहे. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नगरची जागा काँग्रेसची आहे, असं सांगितलं होतं.
शिवाय ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्तही केलं होतं. असं असताना सपकाळ यांच्या घोषणेनंतरही, पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी खासदारपत्नी राणी लंके यांची उमेदवार जाहीर केली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रंगलेली ही लुटूपुटूच्या लढाईनं या निवडणुकीत काही रंग भरण्याचा प्रयत्न केला. परंतु पुढच्या २४ तासांतच राणी लंके यांच्या नावाची हवा त्यांच्याच पक्षानं काढून घेतली. या २४ तासांत काँग्रेसही बॅकफूटवर गेला. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात खरंच समन्वयाचा अभाव होता, की एकमेकांची जिरवण्यासाठी त्यांनी ही निवडणूकच सोडून दिली, हे मात्र अनुत्तरीत राहिले. त्यातच शुक्रवारी, माघार घेतलेल्या काँग्रेसचे करण ससाणे यांनी वेगळाच बाँम्ब टाकला. या सगळ्या घडामोडी पाहता, मविआचं हसू मात्र नक्की झालं. थोरात-लंके या जोडगोळीत काही बिनसलंय का? असाही प्रश्न आता पडू लागलाय. नेमकं काय चाललंय नगरच्या राजकारणात ?
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत विरोधकांचा ठरवून गेम झाला. अहिल्यानगर लाईव्ह २४ नं महिनाभरापूर्वी जे भाकीत मांडलं होतं, अगदी तसंच झालं. प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये येऊन त्यांनी उमेदवारीही केली अन् ते बिनविरोध निवडूनही आले. अर्थात नगरचं राजकारण पाहता, हे सहजासहजी होणार नव्हतंच.
त्यामुळे काँग्रेसच्या करण ससाणेंची अपक्ष उमेदवारी, काँग्रेसच्या एबी फार्म मिळालेल्या उमेदवाराची निवडणुकीतून माघारी, राष्ट्रवादीच्या अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या दत्तात्रय पानसरे यांच्या उमेदवारीवरुन झालेलं महाभारत… हे सगळं वेगवेगळे ट्विस्ट आणणारं ठरलं. अखेर, अर्ज माघारीची मुदत संपल्यावरही तब्बल चार तासांनी नगरच्या या जागेचा बिनविरोध निकाल जाहीर झाला. महाराष्ट्रात कुठंच पहायला मिळायचं नाही, असं राजकारण नगरमध्ये रंगलं. शेवटी भाजपचे प्राजक्त तनपुरे बिनविरोध विधान परिषदेवर आमदार झाले.
या सगळ्या घडामोडीत लोणीचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, त्यांचे सुपुत्र भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे व त्यांची प्रवरा यंत्रणा मात्र पुन्हा चर्चेत आली. विखेंचं वजन वाढलं. भाजपला सगळ्या रणनितीचा फायदा झाला. परंतु ही झाली एक बाजू… परंतु नगरच्या राजकारणाची दुसरी बाजूही या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आली. ती बाजू होती, विरोधकांची. नगर जिल्ह्यातील महाविकास आघाडी सध्या अखेरच्या घटका मोजतेय. अर्थात नगरच्या काही नेत्यांमध्ये समन्वय नसल्याने, हे घडतंय हा भाग निराळा. परंतु विधान परिषद निवडणुकीत मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील हाच तू-तू-मै-मै चा खेळ, जिल्ह्यातील राजकारणावर दिर्घकाळ परिणाम करणारा ठरणार आहे. ही जागा काँग्रेसला गेलीय, हे माहित असतानाही शरद पवार गटाने शेवटच्या टप्प्यात घोळ घातला.
कारण नसताना राणी लंके यांचं नाव पुढे करुन, मविआत फुट पाडली. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापूर्वी काही तास आधी हा सगळा घोळ झाला. त्यामुळे काँग्रेसही गोंधळली. करण ससाणे यांनी अपक्ष अर्ज भरला असला तरी, ते काँग्रेसचे उमेदवार आहेत का, हे त्यांच्याच कार्यकर्त्यांना समजलं नाही. ज्यांच्या नावाने काँग्रेसने एबी फार्म दिला, ते दीप चव्हाण यांनी अर्जच दाखल केला नाही. काँग्रेसचा एबी फार्म मिळाला नसल्याने, करण ससाणे यांनी उमेदवारी मागे घेतली का? हेही समजले नाही. तिकडे अवघ्या २४ तासांच्या आत, राणी लंके यांनीही माघार घेतल्याचं व ही जागा काँग्रेसची असल्यानं आम्ही वरिष्ठांच्या आदेशानं माघार घेत असल्याचं शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी जाहीर केलं.
नगर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या विरोधक म्हणून फक्त बाळासाहेब थोरात व खा. निलेश लंके हीच दोन नावे सध्या चर्चेत आहेत. परंतु या दोघा नेत्यांमध्येच समन्वय नसल्यानं, प्राजक्त तनपुरे हे बिनविरोध निवडून आले, अशा चर्चा रंगल्या. थोरात-लंके ही गुरुशिष्याची जोडी समजली जाते. परंतु तनपुरेंविरोधात या दोघांमध्ये समन्वय का नव्हता? हे समजले नाही. काँग्रेसनं यासाठी शरद पवार गटाला दोषी ठरवलं तर शरद पवार गटानं आम्ही वेळेत माघार घेतल्याचं स्पष्टीकरण दिलं. विखे यंत्रणेपुढं थोरात व लंके दोघांनीही माघार घेतली का?हा प्रश्न पडू लागला. मविआचं सध्या राज्यात काही खरं राहिलेलं दिसत नाही. त्यातल्या त्यात नगर जिल्ह्यात मात्र मविआनं काही प्रमाणात विरोध कायम ठेवला होता. परंतु विधान परिषद निवडणुकीत थोरात-लंके यांच्या चर्चेचा अभाव राहिला का? चर्चेचा अभाव राहिला असेल तर तो का? थोरात-लंके यांचं खरंच बिनसलंय का? हे प्रश्न समोर आले.
आपण उमेदवारी का मागे घेतली, याबाबत काँग्रेसच्या करण ससाणेंनी दिलेलं उत्तरही आता चर्चेत आलंय. प्रसार माध्यमांशी बोलताना करण ससाणे म्हणाले की, आमच्या नगरसेवकांच्या आग्रहामुळे मी उमेदवारी अर्ज भरला होता. माझी स्वतःची ही निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती. पक्षाकडे मी उमेदवारीही मागितली नव्हती. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही निवडणूक लढवण्यास सांगितले नव्हते. किंबहुना, त्यांच्याशी माझी या विषयावर चर्चाही झाली नाही.
पक्षाकडून मला उमेदवारी करण्याबाबत कोणतीही सूचना नव्हती, असे ससाणे यांनी सांगितल्यावर चर्चा वाढल्या. ससाणे यांना थोरातांनी सांगितलं नव्हतं तर मग थोरात कुणाला उमेदवारी देणार होते, हाही प्रश्नच होता. महाविकास आघाडीचं जागावाटप थेट मुंबईत ठरल्यानंतर, खा. लंके यांच्या पक्षाने व त्यांच्या कार्यकर्त्यांनी राणी लंके यांना अचानक पुढे का आणलं? हाच खरा प्रश्न आहे. तनपुरेंना बिनविरोध आमदार करण्याची खेळी नेमकी कुणी केली? हे मविआच्या कार्यकर्त्यांना समजलं नाही. याचे दूरगामी परिणाम नगरच्या राजकारणावर मात्र नक्की होतील.





