नगर जिल्ह्यासाठी बुधवार हा घातवार ठरला. अवघ्या १२ तासांत तीन खूनाच्या घटना घडल्या. वेगवेगळ्या तालुक्यात घडलेल्या या हत्याकांडांनी जिल्हा पुरता हादरला. श्रीरामपूरमधील खंडाळ्यात इंजिनिअर मुलाकडून वडिलांची हत्या झाली. त्यापूर्वी काही तास आधी पारनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील विहिरीत एका ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. त्यानंतर काही वेळातच राहुरी कृषि विद्यापीठाच्या कापूस सुधार केंद्राच्या रानात कंत्राटी मजूराचा निर्घून खून झाल्याचे उघडकीस आले. या तिन्ही घटना वेगवेगळ्या तालुक्यात घडल्या असल्या तरी, त्यातील दोन खूनांच्या घटना अत्यंत क्रूर होत्या. या तिन्ही घटनांनी बुधवारी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.
मंगळवारी रात्री उशीरा पारनेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. मांडवे बुद्रुक येथील डोलनर वस्ती परिसरात असणाऱ्या एका विहिरीत एका महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला. ही माहिती संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिसांना देण्यात आली. घारगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, या महिलेचा मृतदेह बाहेर काढला. सुरुवातीला या महिलेची ओळख पटेना.
अखेर काही वेळाने ही महिला जिजाबाई काशिनाथ जाधव (वय ४०, रा. मांडेबुद्रुक, ता. पारनेर) असल्याचे तपासात पुढे आले. मांडेबुद्रुक येथून ही महिला मांडवे बु्द्रुक येथे कशी आली? हा प्रश्न होता. पोलिसांनी तातडीने हा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. ही आत्महत्या नसून घातपात आहे, अशी चर्चा सुरु झाली. मृताच्या कुटुंबियांशी चर्चा सुरु असून, शवविच्छेदन अहवालानंतर याबाबत गुन्हा दाखल होणार असल्याचे समजते.
या घटनेंनंतर अवघ्या काही तासांत श्रीरामपूरही हादरले. श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे बुधवारी पहाटे हत्याकांड घडले. वडिलांनी रात्री मारलेल्या चापटीचा राग डोक्यात बसल्याने इंजिनिअर असलेल्या मुलानेच बापाच्या डोक्यात टिकाव घालून बापाचा खून केल्याचे उघड झाले. सचिन प्रभाकर ढोकचौळे (वय ५५) असे मृताचे नाव आहे. सचिन ढोकचौळे हे खंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेजवळ राहतात. बुधवारी पहाटे ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. पत्नी भारती ढोकचौळे हिने पहिल्यांदा पतीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले.
तिने आरडाओरड करत, मुलगा प्रणव याला बोलावले. याच प्रणवने वडिलांच्या डोक्यात टिकाव घालून त्यांचा खून केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवण ढोकचौळे याचे अभियांत्रीकी शिक्षण पूर्ण झाले आहे. तो काही दिवस गुजरात येथे नोकरी करत होता. परंतु काही दिवसांपासून तो घरी आला होता. मृत सचिन ढोकचौळे यांना दोन मुले होती. त्यापैकी प्रणव हा मोठा होता. नोकरी गेल्यामुळे त्याची मानसिक स्थिती काही दिवसांपासून बिघडलेली असल्याचेही बोलले जाते.
आपल्या लहान भावावर वडिल जास्त प्रेम करतात, ही खंड प्रणवच्या मनात असल्याने वडिल व त्याचे कायम वाद व्हायचे, असेही समोर आले. मंगळवारी रात्री वडिल व मुलाच्या झालेल्या भांडणात वडिलांनी प्रणवच्या तोंडात चापट मारली होती. याच चापटीचा राग डोक्यात बसल्याने प्रणवने झोपेत असलेल्या वडिलांच्या डोक्यात टिकाव टाकत त्यांचा खून केल्याचा आरोप आहे.
आई भारती ढोकचौळे यांनी स्वतः आपल्या मुलाविरोधात पोलिसांत फिर्याद दिली. श्रीरामपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देत आरोपी मुलगा प्रणव याला ताब्यात घेतले. खून केल्यावर प्रणव घरातच थांबलेला होता. आईसमोरही त्याने खून केल्याची कबूली दिली. प्रणव हा मानसिक आजाराने ग्रस्त असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती नातेवाईक व स्थानिकांकडून मिळत आहे. पोलिसांकडून याबाबत अधिक तपास करण्यात येत असून वैद्यकीय नोंदींचीही पडताळणी केली जात आहे.
श्रीरामपूरमधील प्रकार बुधवारी सकाळी सहाच्या दरम्यान उघडकीस आला. त्याच दरम्यान, राहुरीही हादरले. राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्यालगत असणाऱ्या राहुरी कृषि विद्यापीठाच्या कापूस सुधार केंद्राच्या शेतीवर मंगळवारी मध्यरात्री भिषण हत्याकांड घडले. प्रकल्पाच्या कार्यालयावर कंत्राटी मजूर म्हणून कामाला असणाऱ्या श्रीकांत पोपट दोंदे (वय २७, रा. गोटुंबा आखाडा, ता. राहुरी) या तरुणाचा खून झाल्याचे उघड झाले. मंगळवारी नेहमीप्रमाणे श्रीकांत दोंदे हा सायंकाळी पाच वाजता ड्युटीवर आला. त्याची ड्युटी रात्री एक वाजेपर्यंत होती. दोंदे याची ड्युटी संपण्यापूर्वी रात्री पाऊण वाजेच्या सुमारास दुसरा कंत्राटी कर्मचारी बंडू बर्डे हा ड्यूटीवर आला.
नेहमीप्रमाणे श्रीकांत हा ड्युटीच्या ठिकाणी नसल्याने बंडू बर्डे याने श्रीकांतचा शोध घेतला. मध्यरात्री बॅटरीच्या प्रकाशात श्रीकांतला आवाज देऊनही तो काहीच प्रतिसाद देत नसल्याने बंडू बर्डे यांनी कार्यालयाच्या मागील बाजूस बॅटरीच्या प्रकाशात पुन्हा शोध सुरु केला. त्यावेळी त्यांना एक हृदयद्रावक दृष्य दिसले. श्रीकांत दोंदे हा कार्यालयाच्या मागील बाजूस रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याच्या शरीरावर गंभीर वार करण्यात आले होते. हा प्रकार पाहिल्यावर बंडू बर्डे यांनी तातडीने विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर राहुरी पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर विद्यापीठाचे सुरक्षा कर्मचारी आणि पोलिस तातडीने घटनास्थळी आले.
अज्ञात हल्लेखोराने तीक्ष्ण हत्याराने श्रीकांत दोंदे याची हत्या केल्याचे दिसून आले. मृतदेह तत्काळ पोस्टमाँर्टमसाठी पाठविण्यात आला. या हत्येमागील गुढ अद्यापही कायम आहे. वैयक्तीक वाद, जुने वैमनस्य की अन्य काही कारणातून हा खून झाला, याचा तपास पोलिस करत आहेत. या घटनेचा तपास आता स्थानिक गु्न्हे शाखेने हातात घेतला असून, तांत्रिक तपास, काँल रेकाँर्ड आणि परिसरातील हालचालीसाठी सीसीटीव्ही कँमेऱ्याची तपासणी करण्यात येत आहे. श्वान पथक व फाँरेन्सीक लॅबनेही काही पुरावे गोळा केले आहेत.
या तिन्ही घटनांनी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. बुधवार हा जिल्ह्यासाठी खऱ्या अर्थाने घातवार ठरला. या तिन्ही घटनांचा तपास सुरु असून, खंडाळ्यातील खूनी मुलाला फक्त ताब्यात घेतले आहे. इतर दोन घटनांचे मारेकरी लवकर गजाआड होतील, असे सांगण्यात येत आहे.





