नागपूरपासून मुंबईपर्यंत जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या चर्चा कायम होतात. सुमारे ७०१ किलोमिटर लांबीच्या या महामार्गामुळे, प्रवास जलद झाला असला, तरी तो सुखाचा मात्र नक्कीच झालेला नाही. या महामार्गावरील अपघात हे चिंतेचे कारण असतानाच, आता या महामार्गावर होणारी लुटमारही वाढली आहे. हा सहा पदरी द्रुतगती महामार्ग ज्या १० जिल्ह्यातून जातो त्या मार्गावर अनेक अंतरजिल्हा व आंतरराज्य टोळ्या प्रवाशांची लुटमार करत असल्याच्या घटना घडल्या आहेत. मंगळवारी अशाच एका टोळीचा नगर पोलिसांनी छडा लावला. या कारवाईत पोलिसांनी सहा आरोपींना बेड्या ठोकल्या असल्या तरी, यातील बरेच आरोपी हे दुसऱ्या जिल्ह्यातील आहेत. अहिल्यानगरच्या एलसीबीने या टोळीकडून ९ लाखांपेक्षा जास्तीचा मुद्देमाल हस्तगत केलाय. या टोळीने कसा नाकात दम आणला होता, आणि नगर एलसीबीनं ही टोळी कशी पकडली.
समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हा १६ तासांचा प्रवास आठ तासांवर आला. ७०१ किलोमिटर लांबीचा हा महामार्ग महायुती सरकार व केंद्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट ठरला. हा महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावरती, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक आणि ठाणे या जिल्ह्यांतून जातो. या प्रत्येक जिल्ह्यात या महामार्गावर कुठे ना कुठे लुटमारीच्या घटना घडल्या. बरोबर दोन वर्षांपूर्वी म्हणजेच, डोणगाव शिवारात लुटमारीच्या घटनांचा श्रीगणेशा झाला.
वीस दिवसांत दोनदा प्रवाशांची लुटमार झाली. पहिल्या लुटमारीत किरकोळ ऐवज लुटण्यात आला असला तरी, ३० मे २०२४ रोजी डोणगाव शिवारातील एचपी पेट्रोल पंपाजवळ विश्रांतीसाठी थांबलेल्या रमेश सुरेशभाई पटेल या पुण्यातील व्यापाऱ्याला लुटण्यात आले. पेट्रोल पंपावर पहाटे झोपेसाठी थांबले असताना पटेल यांच्या कारची काच फोडून दरोडेखोरांनी कारमध्ये झोपलेल्या रमेश पटेल यांच्या चाकूहल्ला करत त्यांच्या गळ्यातील चार तोळ्यांची चेन ओरबाडून नेली. या लुटमारीत तब्बल दीड लाखांपेक्षा जास्त ऐवज लुटून नेण्यात आला होता.
त्यानंतर २०२५ सालीही या लुटमारीच्या घटना घडत राहिल्या. छत्रपती संभाजीनगर ते नागपूर दरम्यान असणाऱ्या बोगद्यात वाहनांवर दगडफेक करुन त्यांना लुटण्याचे प्रकार या वर्षी नित्याने झाले. यावर्षी छत्रपती संभाजीनगर येथील एका कुटुंबाला अडवून मारहाण करत त्यांच्याकडील सोने लुटून नेण्यात आले होते. त्यानंतर वैजापूर, जांबरगाव शिवारात रात्री दोन प्रवाशांच्या वाहनांवर दगडफेक करुन त्यात एकाला जखमी करण्यात आले होते. अर्थात हे दोन्ही प्रवासी जखमी अवस्थेत तेथून पळून गेले. त्यानंतर नागपूर-पुणे मार्गावरील करजना गावाजवळ मध्यरात्री एका ट्रॅव्हल्सवर दगडफेक करण्यात आली. ट्रॅव्हल्स चालकाने गाडी न थांबविल्यामुळे लुटारुंना लुटमार करता आली नाही. त्यानंतर काहीच दिवसांत मेहेकरजवळ मुंबईकडे जाणाऱ्या एका कुटुंबाला लुटण्यात आले.
त्यानंतर २२ ऑगस्ट २०२५ रोजी फरदापूर टोलनाक्याजवळ एका सोने-चांदीच्या व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील सुमारे पाच किलो सोने लूटून नेण्यात आले होते. मेहेकर पोलिसांनी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यावेळीही पाच आरोपींना अटक केली होती. हे आरोपी महाराष्ट्रातील नाही तर थेट एएमपीतील होते. एमपीतून येऊन ते महाराष्ट्रात दरोडे टाकत होते, अशी माहिती पुढे आली. या व्यापाऱ्याचा वाहनचालकही या लुटारुंना सामिल होता, असे नंतर तपासात समोर आले. २०२६ मध्येही समृद्धीवरील लुटमार कायम राहिली. मार्च महिन्यात नागपूर एमआयडीसीतून कोळसा घेऊन भिवंडीकडे चाललेल्या एका ट्रकचालकाला शहापूर-खुटघर परिसरात लुटण्यात आले.
१० ते १२ दरोडेखोर चालत्या ट्रकमध्ये चढले व त्यांनी चाकूचा धाक दाखवून चालकाच्या खिशातील रोकड व गाडीतील डिझेल चोरले. त्यानंतर मे महिन्यात गुजरात येथून मुंबईला जात असलेल्या एका व्यापाऱ्याला दुसरबीडजवळ लुटण्यात आले. अभयसिंह वाघेला हा धान्याचा व्यापारी रोख १२ लाख रुपये घेऊन गुजरातकडे जात होता. दुसरबीड टोलनाक्याजवळ बोलेरो व इनोव्हा या दोन गाड्यांमध्ये आलेल्या १० ते १२ दरोडेखोरांनी या व्यापाऱ्याला पिस्तूलचा धाक दाखवून त्याच्याकडील रोकड लंपास केली. पोलिसांनी या टोळीचाही पर्दाफाश केला. आंतराज्यातील हे दरोडेखोर बीड जिल्ह्यात लपून बसले होते. त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल व ४ जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली.
आता दोन दिवसांपूर्वी नगरच्या एलसीबीनं याच समृद्धी महामार्गावर लुटमार करणारी एक टोळी पकडली. या टोळीने २७ मे रोजी समृद्धी महामार्गावर अक्षरशः नंगानाच चालवला होता. लातूर येथील ट्रकचालक दत्ता बाबुराव राजुळे हे आपल्या ट्रकने मुंबईकडे जात असताना या टोळीने त्यांना पोल क्रमांक ५२९ जवळ अडवले. राजुळे यांना बेदम मारहाण करत त्यांच्या खिशातील रोकड व ट्रकमधील डिझेल घेऊन ही टोळी पसार झाली. त्याच दिवशी या टोळीने एका वॅगनआर चालकालाही अडवले. कारचालक व त्याची पत्नी यांना चाकूचा धाक दाखवून सोन व रोकड असा तब्बल सव्वा लाखांचा ऐवज या टोळीने लूटला. त्यानंतर याच महामार्गावर या टोळीने आणखी एका ट्रकचालकाला अडवत त्याच्याकडील तब्बल १५० लिटर डिझेल चोरुन नेले. एकाच दिवशी घडलेल्या या तिन्ही घटनांमध्ये तब्बल दीड लाखांचा ऐवज लुटला गेला होता.
कोपरगाव पोलिसांत हे सर्व गुन्हे दाखल झाले. समृद्धी महामार्गावरील या गंभीर दरोड्यानंतर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर एलसीबीचे विशेष पथक तयार करून, जालना आणि छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये रवाना करण्यात आले. या दरोड्यांचा तपास लावत पोलिसांनी अवघ्या 4 दिवसांत, जालना आणि कोकमठाण येथून 6 जणांना ताब्यात घेतले.
पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने जालना, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर आणि साकुरी परिसरातील निखिल बद्रीनारायण गोरे (रा. अंबड, जालना) एक विधीसंघर्षित बालक (वय 17) शिवनाथ शांताराम आव्हाड (रा. संतनगर, शिर्डी, मूळ- वैजापूर) ओम बालाजी खरात (वय 19, रा. जालना, हल्ली- छत्रपती संभाजीनगर) राहुल राधाकिसन कोकाटे (वय 23, रा. पैठण, मूळ- बदनापूर) साईराज गणेश शहाणे (वय 21, रा. साकुरी, ता. राहाता) या आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आपल्या इतर 3 साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून दरोड्यात वापरलेली एक व्हेरना कार, स्विफ्ट कार, 6 मोबाईल आणि रोख रक्कम जप्त केली आहे. समृद्धी महामार्गावर प्रवासी सुरक्षा आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी महामार्ग पोलीस आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे विशेष सुरक्षा पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांद्वारे नियमित गस्त, सीसीटीव्ही मॉनिटरिंग आणि त्वरित मदत पुरवण्याचे काम केले जाते. तरीही हे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. ही लुटमार थांबून समृद्धीचा प्रवास सुखाचा कधी होईल, असा प्रश्न आता प्रवाशांमधून विचारला जात आहे.





