Explained

प्रवेश तनपुरेंचा चर्चा मास्टरमाईंड विखेंची… नेमका फायदा काय?

शनिवारी शरद पवार गटाचे माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपात प्रवेश केला. तनपुरे भाजपात येतील, हे डाँ. सजय विखे पाटील यांनी महिनाभरापूर्वीच सांगितलं होतं. राहुरीत पोटनिवडणुकीदरम्यान एका मुद्यावर बोलताना विखेंनी भविष्यात तीन दादा एकत्र दिसतील, असं सांगितलं होतं. सुजय विखेंच्या या वक्तव्याचा अर्थ व तीन दादा कोण? या प्रश्नाचं उत्तर आज मिळालं.

तनपुरेंचा हा पक्षप्रवेश फक्त निवडणुकीच्या निमित्ताने दिसत असला तरी, विखेंनी या पक्षप्रवेशातून एकाच दगडात कित्येक पक्षी मारलेत. हे मारलेले पक्षी, सध्यातरी ना विरोधकांच्या लक्षात आलेत, ना स्वकीय असूनही शितयुद्ध करणाऱ्यांच्या लक्षात आलेत. विखेंनी नगरचं पुढच्या 15-20 वर्षांचं राजकारण सेट केलंय. नगर जिल्हा खऱ्या अर्थानं विखेंनीच तरुण केलाय.

राहुरी पोटनिवडणूक लागली. त्यावेळी विखे पिता-पुत्रांवर सर्वांची नजर होती. काहींनी नेहमीप्रमाणे सुजय विखेंच्या नावाचीच या जागेसाठी चर्चा केली. नगर जिल्ह्यात कोणतीही निवडणूक असली तरी, सुजय विखेंची चर्चा का होते? हा प्रश्न खुद्द पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनाही पडतो. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी या मुद्यावर थेट नाराजीही जाहीर केली होती. खरं चर सुजय विखेंच्या नावाची चर्चा झाली तर, विखेंच्या गोटातील काही नेते नाराज होणार असतात.

ज्यांना निवडणूक लढविण्याची इच्छा असते, त्यांची सुजय विखेंचे नाव आल्याने चलबिचल होणार असते. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत इच्छुक म्हणून सुजय विखेंच्या नावाची चर्चा केली जाते, असं खुद्द प्रवरा यंत्रणा सांगते. राहुरीच्या पोटनिवडणुकीतही असंच झालं. पोटनिवडणूक जाहीर होण्यापूर्वी, या निवडणुकीसाठी सुजय विखेंचे नाव चर्चेत आणले गेले.

राहुरी पोटनिवडणुकीपूर्वीच अहिल्यानगर महानगर पालिकेची निवडणूक झाली होती. त्यात नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व विखेंमधलं ट्युनिंग संपूर्ण जिल्ह्यानं पाहिलं. जगताप-विखे एक आल्यावर काय होतं, हे नगर मनपाच्या निकालानंतर विरोधकांना समजलं. त्यामुळेच जगताप-विखेंमध्ये मिस अंडस्टँन्डींग करुन देण्यासाठी, राहुरीच्या पोटनिवडणुकीत विखेंचं नाव घेतलं गेलं, अशा चर्चा विखेंच्या कार्यकर्त्यांनी केल्या. अर्थात, या चर्चा काही दिवसांतच फुस्स झाल्या.

कारण स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्यासोबत सुजय विखेंचे जसे मित्रत्वाचे संबंध राहिले, तसेच संबंध अक्षय कर्डिलेंसोबतही राहिले. त्यामुळे अक्षय कर्डिले यांना आमदार करण्यासाठी सुजय विखेंनी त्यांच्याच नावाची शिफारस थेट मुख्यमंत्र्‍यांकडे केली होती. आपलं वजन वापरुन त्यांनी अक्षय कर्डिलेंचं तिकीटही आणलं आणि त्यांना विक्रमी मतांनी विजयीही केलं. हा भाग निराळा, परंतु त्यावेळी सुजय विखेंनी तनपुरेंसोबत जे ट्युनिंग जमवलं होतं, ते शेवटपर्यंत कायम ठेवलं. याच निवडणुकीच्या प्रचारात सुजय विखेंनी राहुरी तालुक्यात तीन दादा एकत्र येतील, असंही बोलून दाखवलं होतं.

सुजय विखेंचं हेच तीन दादांचं वक्तव्य शनिवारी खरं ठरलं. सुजय दादा, अक्षय दादा आणि आता प्राजक्त दादा हे तीन दादा राहुरी तालुक्यात एकत्र आले. तनपुरेंना थांबविण्यात जसा सुजय विखेंचा सिंहाचा वाटा राहिला. तसाच तनपुरेंना आमदार करण्यातही आता सुजय विखेंचाच सिंहाचा वाटा राहिल, हे कुण्या ज्योतीषाने सांगण्याची गरज नाही. सुजय विखे जसं बोलतात, तसं करतात याचा प्रत्यय या निमित्ताने आला.

पोटनिवडणुकीतही उमेदवार म्हणून सुजय विखेंचं नाव जाणूनबुजून पुढं आणलं जात होतं, परंतु त्यालाही विखेंनी सडेतोड उत्तर दिलं. मला मागच्या दाराने विधान परिषदेत जाण्याची इच्छा नाही. मी समोरा समोर लढून जिंकूनच लोकसभा किंवा इतर सभागृहात जाईल, असं विखेंनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं होतं. आता तनपुरेंना विधान परिषदेत संधी मिळेल, अशी स्थिती निर्माण झालीय.

आता तनपुरेंना भाजपात घेऊन विखेंनी फक्त भाजपाचा फायदा केलाय का? तर नाही. विखेंनी भाजपाचा फायदा केलाच, परंतु नगरचं पुढच्या 15-20 वर्षांचं राजकारणही सेट केलंय. नगर जिल्ह्यात विखेंनी विरोधी पक्षातील विरोधकांना गेल्या विधानसभेला गारद केलं. त्यात संगमनेर, नेवासा, पारनेर, शेवगाव-पाथर्डी या मतदारसंघाचा समावेश होता.

ज्या मतदारसंघात विखेंना लोकसभेला विरोध झाला, तिथं विखेंनी थेट लक्ष घालून विरोधकांना त्यांची जागा दाखवली. परंतु गेल्या काही वर्षांपासून नगर जिल्ह्यात भाजपातीलच काही नेत्यांसोबतही विखेंचं शितयुद्ध सुरु आहे. या शीतयुद्धालाही विखेंनी, तनपुरेंच्या उमेदवारीने चांगलीच चपराक दिलीय.

आता तनपुरेंसारखा तगडा विरोधक भाजपमध्ये आल्यावर विखेंनी 2029 ची लोकसभा आणखी एकतर्फी केलीय. कारण गेल्या लोकसभेला निलेश लंके यांचा जो विजय झाला होता, त्याला काही प्रमाणात तनपुरेंची साथही कारणीभूत होती. परंतु आता तनपुरेच भाजपात आल्यामुळे लंकेंचे दक्षिणेतील वजन आणखी कमी होणार आहे.

शिवाय विखेंसोबत शितयुद्ध करणारे स्वपक्षातील नेतेही यामुळे शांत होणार आहेत. कारण नगरच्या सहकाराच्या राजकारणात तनपुरेंचं नातंगोतं मोठ्ठ आहे. याच नात्यागोत्यातील कोपरगावचे काळे व पाथर्डीतील राजळे हे यापूर्वीच महायुतीत आलेत. आता संगमनेरचे थोरात-तांबे, नेवाशाचे गडाख हेही लवकरच महायुतीत येतील अशा चर्चा आहेत. त्यामुळे स्वपक्षातील विरोधकांसमोर आपसूकच विखेंची ताकद वाढणार आहे.

विखेंनी तनपुरेंना आपल्या पक्षात घेऊन एकाच दगडात अनेक पक्षी मारलेत. परंतु विखेंच्या या डावामागचं खरं गणीत समजायला विरोधकांना 2029 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या निकालाची वाट पहावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button