Explained

Ahilyanagar Crime | फुटभर अंतरावरुन आजोबाला घातल्या गोळ्या, राहुरीत नातवाचा नंगानाच…

राहुरीत तालुक्यात पुन्हा एकदा गावठी कट्ट्याची दहशत दिसून आली. एका सराईत गुन्हेगाराने, भावबंदकीच्या पूर्वीच्या रागातून आपल्याच चुलत आजोबावर गोळीबार केला. फुटभर अंतरावरुन आजोबांच्या उजव्या छातीत गावठी कट्ट्यातून गोळीबार करुन आरोपी पसार झाला. आजोबांवर सध्या नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असले तरी, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. घरगुती वादातून या सराईत आरोपीने यापूर्वीही याच कुटुंबासोबत अनेक धक्कादायक प्रकार केले आहेत. मार्च महिन्यात याच आरोपीने गोळी मारलेल्या आजोबांची चारचाकी गाडी पेटवून दिली होती. आता थेट गोळीबार केल्याने राहुरी तालुक्यात दहशत पसरली आहे. नेमका प्रकार काय घडला? आरोपी कोण आहे?

राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा परिसर शुक्रवारी सकाळी एका धक्कादायक घटनेने हादरला. दगडू गंगाराम कोहकडे (वय 73) हे वयोवृद्ध गृहस्थ सकाळी नेहमीप्रमाणे घराशेजारील बाळेश्वर डोंगरावर फिरायला गेले होते. सकाळी सहा वाजेच्या सुमारास ते पायी व्यायाम करत असतानाच, तेथे त्यांचा चुलत नातू, प्रवीण बाबासाहेब कोहकडे (वय 25) हा आला. एका विना क्रमांकाच्या दुचाकीवर आलेल्या प्रवीणने चुलत आजोबाला दुचाकी आडवी लावत थांबवले.

तू माझ्यावर आत्तापर्यंत खूप खोटे गुन्हे दाखल केलेत, असे म्हणत प्रवीणने दगडू कोहकडे यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद विकोपाला गेला व प्रवीणने दगडू कोहकडे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दगडू कोहकडे यांनीही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यावर हा वाद आणखी वाढला.

रागाच्या भरात प्रवीण याने सोबत आणलेल्या गावठी कट्ट्यातून अगदी एक फूट अंतरावरुन दगडू कोहकडे यांच्या उजव्या छातीत गोळी मारली. गोळी लागल्याबरोबर दगडू कोहकडे हे जमीनीवर कोसळले. तोपर्यंत आसपास लोक गोळा होऊ लागले होते. गोळीबाराचा आवाज ऐकल्यावर लागलीच कोहकडे यांच्या कुटुंबातील लोक बाळेश्वर डोंगराकडे धावले. त्यांनी जखमी दगडू कोहकडे यांना तातडीने नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात आजोबांवर तातडीने शस्त्रक्रीया करण्यात आली, परंतु अजूनही त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचेच सांगितले जातेय. घटना गंभीर होती. त्यानंतर तातडीने पोलिसांना या घटनेची खबर देण्यात आली. पोलीस‎ उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी‎ जयदत्त भवर आणि राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, यांनी ‎पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.‎ पाहणीत गोळीबार केल्यानंतरची पोंगळी सापडल्याचेही सांगितले जातेय.

गोळीबार करणारा चुलत नातू प्रवीण बाबासाहेब कोहकडे हा परिसरातील ‎सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वीही घरफोडी, चोरी आणि आर्म ॲक्ट‎ यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.‎ दोन महिन्यापूर्वी प्रवीण कोहकडे यानेच संदीप दगडू कोहकडे यांची चारचाकी गाडी पेटवून दिली होती. त्यात या गाडीचे मोठे नुकसान झाले होते. दगडू कोहकडे यांच्या कुटुंबासोबत प्रवीण याच्या कुटुंबाचा वाद गेल्या अनेक दिवसांपासून होता.

प्रवीणविरोधात यापूर्वीही या कुटुंबाने अनेक गुन्हे दाखल केले होते. त्याला अनेकदा अटकही झाली होती व तो जामीनावर बाहेरही आला होता. जामीनावर बाहेर आल्यावर तो पुन्हा या कुटुंबासोबत वाद घालत असे. परंतु आता त्याने भरदिवसा केलेल्या गोळीबाराच्या कृत्यामुळे मोमीन आखाडा परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेबाबत राहुरी पोलीस‎ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोधासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत. ‎सराईत गुन्हेगाराला लवकरात लवकर बेड्या ठोकल्या जातील, असा‎ विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.‎

घरगुती वाद किती विकोपाला जावू शकतो, हे या घटनेनं दाखवून दिलंय. नव्या एसपींना जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अजून वचक बसवता आलेला नाही, हे या घटनेनं दाखवून दिलंय. जिल्ह्यातील गावठी कट्ट्यांचा प्रश्नही यानिमित्ताने पुन्हा ऐरणीवर आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button