
अखेर नगरकरांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. कडक उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना आता पावसाची चाहूल लागली आहे. भारतीय हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 1 आणि 2 जून रोजी पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.
मंडळी, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असून तापमानाचा पारा चांगलाच चढला आहे. त्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. अशातच हवामान विभागाकडून दिलासा देणारा अंदाज जाहीर करण्यात आला आहे.
1 जून आणि 2 जून या दोन दिवसांत जिल्ह्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
यंदा राज्यात मान्सूनचे आगमन काहीसे उशिरा होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र त्यापूर्वी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागणार असल्याने शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळू शकतो.
विशेष म्हणजे खरीप हंगामाच्या तयारीसाठी हा पाऊस महत्त्वाचा मानला जातो. पेरणीपूर्व मशागतीसाठी जमिनीत ओलावा निर्माण होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता या पावसाकडे लागले आहे.





