
अहिल्यानगरमधून एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर आली आहे. भूसंपादनाच्या नुकसानभरपाईचे तब्बल दीड कोटी रुपये मिळवून देण्यासाठी सव्वा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मंडळी, श्रीगोंदा-पारनेर प्रांत कार्यालयातील महसूल सहायक आणि एका कंत्राटी कर्मचाऱ्याविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश विजय ढुमणे आणि अमोल कानिफनाथ खामकर अशी या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जंगलेवाडी परिसरातील एका कुटुंबाची १४३ गुंठे जमीन राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलासाठी संपादित करण्यात आली होती. या जमिनीच्या बदल्यात शासनाकडून सुमारे १ कोटी ४७ लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली होती.
मात्र ही रक्कम प्रत्यक्षात मिळण्यासाठी संबंधित नागरिकांना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागले. आरोपानुसार, महसूल सहायक आणि कंत्राटी कर्मचाऱ्याने वेळोवेळी पैशांची मागणी केली. तक्रारदारांनी हा प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर करण्यात आलेल्या पडताळणीत आरोपींनी १ लाख २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे महसूल सहायक मंगेश ढुमणे याच्यावर यापूर्वीही २०२२ मध्येही त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. आता त्याच्यावर दुसऱ्यांदा लाचेचा गुन्हा दाखल झाल्याने महसूल विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





