Explained

Prajakt Tanpure Vs Rani Lanke लढत होईल का? संधीचं सोनं करण्याची निलेश लंकेंना संधी

स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत, शेवटच्या टप्प्यात आता रंगत आलीय. राजकारण न समजणारा जिल्हा, म्हणून नगरला ओळखलं जातं. नगरची हिच ओळख, यथार्थ ठरविणाऱ्या घडामोडी शेवटच्या टप्प्यात घडताना दिसत आहेत. विधान परिषदेच्या या निवडणुकीसाठी भाजपनं अखेरच्या क्षणी डाव टाकला. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून ही जागा मिळवत, तिथं शरद पवार गटाच्या माजीमंत्र्याला तिकीट दिलं. प्राजक्त तनपुरे हे सोमवारी शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अर्थात, या सगळ्या घडामोडींमागे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डाँ. सुजय विखे पाटील हेच आहेत, हेही लपून राहिलेलं नाही. महायुतीत जसा गच्चा झालाय, अगदी तसाच, उलट त्यापेक्षा जास्त गच्च्या महाविकास आघाडीत होताना दिसतोय.

2029 पूर्वी आमदार होण्याची ही शेवटची संधी असल्याने महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गट, हे दोघेही आक्रमक झालेले दिसत आहेत. नगरच्या राजकारणात ऐनवेळी ज्येष्ठ-श्रेष्ठ नेत्यांचंही ऐकलं जात नाही, असा इतिहास आहे. इथंही तेच होतंय. ही जागा महाविकास आघाडीत काँग्रेसला आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केलं. त्यानंतर नगरचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या गोटातील दोन नावे पुढे करत त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तयारही केलं. पण पुन्हा माशी शिंकली. शरद पवार गटाचे नेते, अर्थात थोरातांचेच चेले असणाऱ्या खा. निलेश लंके यांनी ऐनवेळी त्यांच्या पत्नीला पुढं केलंय.

राणी लंके या सोमवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं सांगितलं जातंय. अर्ज माघारीपर्यंत तनपुरेंविरोधात ही जागा राणी लंके लढवणार की, अन्य कुणी लढवणार? करण ससाणे, दीप चव्हाण, राणी लंके, यांच्यातून अर्ज कोण माघारी घेणार? महाविकास आघाडीत खरंच बिघाडी होतेय का? लंकेंना ताकद दाखविण्याची ही शेवटची संधी का आहे? याच प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न…

अहिल्यानगर विधान परिषदे निवडणुकीचं अर्ध चित्र रविवारी सायंकाळी स्पष्ट झालं. भाजपनं अपेक्षेप्रमाणे माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी जाहीर केली. तनपुरे हेच भाजपचे उमेदवार असतील, असं भाकित अहिल्यानगर लाईव्ह 24 नं, महिनाभरापूर्वीचं केलं होतं. आमचं भाकीत तंतोतंत खरं ठरलं. राहुरीच्या पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिलेंना उमेदवारी, त्यानंतर प्राजक्त तनपुरेंसोबत यशस्वी मध्यस्थी, आणि आता तनपुरेंना विधान परिषदेवर संधी, या सगळ्या घडामोडीमागचे मास्टरमाईंड राहिले, ते माजी खा. सुजय विखे पाटील… हे झाकूनही राहिलेलं नाही.

आम्ही जेव्हा हे सगळं सांगत होतो, तेव्हा आमच्यावर विखे धार्जीणा चॅनल, असा शिक्का मारला गेला. परंतु जे सत्य आहे, तेच आम्ही मांडत राहिलो. डाँ. सुजय विखे डोक्यानं खेळताहेत, लंकेंना लोकसभेला मदत करणाऱ्यांचा, टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करताहेत, हे आम्ही आजही सांगतोय. अक्षय कर्डिले यांची आमदारकी किंवा प्राजक्त तनपुरे यांचा भाजपप्रवेश, हे दोन्ही मुद्दे विखेंच्या पुढच्या 15-20 वर्षांच्या राजकारणावर सकारात्मक परिणाम करणारे ठरणार आहेत, हेही आम्ही सांगितलंय. आम्ही सांगतोय, तसंच घडेल, असं चित्र सध्यातही दिसतंय.

नगरच्या राजकारणातील जवळपास सगळेच प्यादे, आता विखेंच्या हातात आलेत. कुणालातरी जवळ घ्यायचं, म्हटल्यावर कुणीतरी लांब जाणार, हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळेच नगरच्या राजकारणातील प्रवरा यंत्रणेच्या या डावपेचाने काही नेते नाराज झालेत. हे होणारचं होतं. विखे विरोध, जिल्ह्याला आत्ताच दिसतोय का? तर नाही. तीन-चार दशकांपासून विखे विरुद्ध जिल्हा, हे समिकरण महाराष्ट्रानं पाहिलंय. स्व. बाळासाहेब विखे, त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे व आत्ता डाँ. सुजय विखे या तिन्ही पिढ्यांच्या राजकारणात, हे दिसलंय. सुजय विखेंनी सलग तीन निवडणुकीत ताकद दाखवलीय. जे कुणालाच शक्य नव्हतं, ते करुन दाखवलं.

गेल्या विधानसभेला मुख्यमंत्री पदाच्या दावेदारासह दोन मंत्र्‍यांचा व खासदारपत्नीचा पराभव करणं, अशक्यच होतं. परंतु ते घडलं. विधानसभेनंतर जिल्ह्यातील 12 नगरपालिका आणि लगेच लागलेली नगर मनपा, या सलगच्या तीन निवडणुकीत विखेंनी जिल्हा भाजपमय केला. विखेंच्या या चमत्कारामुळे काही स्वपक्षातील नेतेही सावध होणारच होते. तसे ते सावधही झालेत. त्यामुळे यापूर्वी जसं नगरचं राजकारण होतं, तसंच पुढेही विखे विरुद्ध जिल्हा… असंच असेल.

आता विधान परिषदेतही खासदारपत्नी राणी लंकेंचं नाव, अशाच शितयुद्धातून पुढे आल्याचं दिसतंय. तनपुरे हे जरी निवडणुकीचा चेहरा असले तरी, यामागचे खरे मास्टरमाईंड विखेच आहेत. त्यामुळे तनपुरेंचा विजय हा विखेंचाच विजय ठरणार आहे. याच विजयाला धक्का देण्यासाठी महाविकास आघाडीने आपले, ठेवणीतले अस्त्र-शस्त्र बाहेर काढलेत, असा अर्थ घेता येतो.

नगर जिल्ह्यात रविवारी जे राजकारण झालं, त्यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी होईल का? हे अर्ज माघारीपर्यंत कळेलच. परंतु आता राणी लंकेंचं जे नाव पुढं आलंय, तेच कायम ठेवणं, हिच खरी लढाई ठरणार आहे. लंके विरुद्ध विखे ही लढाई जिल्हा गेल्या दोन वर्षांपासून पाहतोय. या लढाईतील पहिल्या युद्धात सुजय विखेंचा पराभव झाला. परंतु त्यानंतर पुढच्या सलग तीन-चार निवडणुकीत, विखेंनी लंकेंना चारीमुंड्या चित केले. काही दिवसांपूर्वी खा. निलेश लंके यांनी थेट विधानसभा लढविण्याचा मनसुबा व्यक्त केला. आपलं स्टेटमेंट चुकलं, असं समजल्यावर त्यांनी पु्न्हा आपल्या वक्तव्यावर यू-टर्न घेतला. आपण फक्त खडा मारुन पाहिला, असा पोचारा फिरवला. परंतु लंकेंच्या या स्टेटमेंटचं, विखे समर्थकांनी आयतं कोलीत केलं.

2029 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीला अजून तीन वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे लंकेंना विखेंचा हिशोब चुकता करण्यासाठी विधान परिषदेची निवडणूक, ही आयती संधी आहे. लंकेंनी प्राजक्त तनपुरेंविरोधात आपल्या पत्नीची उमेदवारी कायम ठेऊन, एका दगडात दोन पक्षी मारावेत, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तनपुरेंना गद्दार म्हणविणाऱ्या शरद पवार गटाला व तनपुरेंच्या आडून विखेंचा पराभव करु पाहणाऱ्या लंकेंनी या नामी संधीचं सोनं करावं, असं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना वाटतंय.

तनपुरे-लंके या लढतीची जशी, लंके समर्थकांना उत्सुकता आहे, तशीच उत्सुकता विखे समर्थकांनाही आहे. तनपुरे- लंके ही फाईट झाल्यास, प्रवरा यंत्रणाही तेवढ्याच त्वेषाने ही लढाई करेल. विखे-लंके या 2029 च्या लढाईपूर्वी, तनपुरे-लंके ही लढाई जिंकून, प्रवरा यंत्रणेलाही दूध का दूध पाणी का पाणी करण्याची आयती संधी यामुळे मिळणार आहे. त्यामुळे प्रवरा यंत्रणाही तनपुरे विरोधात राणी लंके यांनीच उमेदवारी करावी, यासाठी देव पाण्यात घालून बसलीय, असंही सांगितलं जातंय. खा. निलेश लंके यांनी पुन्हा एकदा समोरासमोर लढावं, अशी प्रवरा यंत्रणेचीही इच्छा आहेच. आता ही इच्छा पूर्ण होईल का, हे येत्या काही दिवसांत कळेलच. परंतु ही लढाई सुपरहाँट होईल, हे मात्र नक्की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button