Explained

नगरच्या ५० सीसीच्या ‘लुना’नं भारताच्या सर्वात वेगवान ‘डेक्कन क्विन’ला हरवलं होतं! काय होता तो किस्सा?

मित्रांनो… भारताच्या इतिहासातील एक अशी शर्यत झाली होती, जिचा थरार अनुभवल्यावर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही… १९७२ साली झालेल्या या शर्यतीनं अहिल्यानगरचं नाव जगभरात केलं होतं. एका बाजूला होती, त्या काळातील भारतातील सर्वात वेगवान, आलिशान आणि प्रचंड ताकदवान ‘डेक्कन क्वीन’ एक्स्प्रेस रेल्वे आणि दुसऱ्या बाजूला होती… सायकलसारखी दिसणारी, अवघ्या ५० सीसी इंजिनची एक चिमुरडी दुचाकी… नाव होतं, ‘कायनेटिक लुना’ !

जेव्हा या दोन वाहनांमध्ये पैज लागली, तेव्हा संपूर्ण देशाने लुनाची थट्टा उडवली होती. पण निकाल असा लागला… की अख्खा देश थक्क झाला! एका साध्या मोपेडने भारताच्या सर्वात वेगवान रेल्वेला अशी धोबीपछाड दिली, की हा इतिहास सुवर्णअक्षरांनी लिहिला गेला. आणि सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे, जगाला हादरवून सोडणारी ही किमया आपल्या महाराष्ट्रातील ‘अहिल्यानगर’च्या मातीत घडली… आता ही शर्यत का लागली? कायनेटिक लुना आणि डेक्कन रेल्वेची बरोबरी का केली गेली? कायनेटिक लुनानं ही पैज नेमकी कशी जिंकली होती? लुनाचा हाच गौरवशाली इतिहास आज आपण पाहणार आहोत…

१९७२ चा काळ होता. आजच्यासारखी प्रत्येक घरात बाईक किंवा स्कुटी नव्हती. मध्यमवर्गीय माणूस एकतर पायी चालायचा किंवा सायकलवर प्रवास करायचा. बजाज चेतक किंवा कार घेणं, सामान्यांच्या बजेटच्या बाहेरचं होतं. अशा काळात, अहिल्यानगरच्या औद्योगिक क्षेत्रातून एका अशा व्यक्तीने क्रांतीची ठिणगी टाकली, ज्यांचं नाव होतं हस्तीमल कुंदनमल फिरोदिया… एच. के. फिरोदिया यांना भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील भीष्मपितामह मानलं जायचं. त्यांनी सुरुवातीला बजाज ऑटो आणि फोर्स मोटर्सच्या उभारणीत मोठी भूमिका बजावली होती. त्यानंतर १९७२ मध्ये त्यांनी अहिल्यानगर येथे ‘कायनेटिक इंजिनिअरिंग लिमिटेड’ या स्वतंत्र कंपनीची स्थापना केली. भारतात १००% स्वदेशी आणि सर्वसामान्यांना परवडणारी दुचाकी बनावी, हे त्यांचे मुख्य स्वप्न होतं.

एच. के. फिरोदियांचे सुपुत्र डॉ. अरुण फिरोदिया हे आयआयटी मुंबईचे इंजिनिअरिंग पदवीधर. त्यांनी अमेरिकेतील नामांकित एमआयटी काँलेजमधून उच्च शिक्षण घेतले होते. जेव्हा ते भारतात परतले, तेव्हा त्यांनी कंपनीची धुरा सांभाळली. डॉ. अरुण फिरोदिया यांनी त्यांच्या तरुण इंजिनिअर्सच्या टीमसह सुमारे २ वर्षे संशोधन करून ५० सीसीची पूर्णपणे भारतीय मोपेड विकसित केली. भारतातील सामान्य चाकरमान्याला, दूधवाल्याला, पेपरवाल्याला आणि कष्टकऱ्याला हक्काची दुचाकी द्यायची, असं त्यांचं स्वप्न होतं. या मोपेडचं नाव ठेवलं गेलं, ‘कायनेटिक लुना’!

वजन अवघं ५० किलो, किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे— पेट्रोल संपलं तरी टेन्शन नाही, सायकलसारखे पॅडल मारा आणि पुढे जा! अहमदनगरच्या इंजिनिअर्सनी तयार केलेले हे मॉडेल अल्पावधीतच भारताचा ‘नॅशनल क्रश’ बनू लागलं. तरुणांना आकर्षित करण्यासाठी, क्रिकेट सामन्यांमधील ‘मॅन ऑफ द मॅच’ला लूना देण्यात येऊ लागली. प्रसिद्ध क्रिकेटपटू संदीप पाटील आणि बी. एस. चंद्रशेखर यांनीही मॅन ऑफ द मॅच म्हणून लूना जिंकली.

दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बक्षीस म्हणून लूना दिली जाऊ आली. या सगळ्या चर्चेत फिरोदियांनी एक मास्टरस्ट्रोक टाकला. या गाडीची चर्चा होण्यासाठी त्यांनी विविध युक्त्यांबरोबर टीव्ही आणि वृत्तपत्रांसाठी जाहिरातींवर विशेष लक्ष्य दिले. “चल मेरी लूना”_ आणि “सफलता की सवारी” या टॅगलाइनमुळे लुनाच्या चर्चा वाढल्या. जाहिरातींमध्ये “लूना कराती पक्का वादा, खर्चा कम, मजबुती ज्यादा” हे वचनही समाविष्ट होतं.

पण मित्रांनो, युट्यूबवर जसे ट्रोलर्स असतात, तसेच त्या काळातही होते. लुना बाजारात आल्यावर अनेकांनी नाकं मुरडली. तसं पाहिलं तर, पुणे सायकलींसाठी प्रसिद्ध होतं. पण त्याच शहरात लुनानं दुचाकी बाजारपेठ काबीज केली. तेव्हा ‘अवघ्या ५० सीसीची ही सायकलसारखी गाडी भारतातील खराब रस्ते आणि कठीण घाटांवर कशी टिकणार? ही तर लोणावळ्याच्या घाटातच दम तोडेल!’ अशा चर्चा रंगू लागल्या.

नगरच्या मातीचा एक स्वभाव आहे… इथे कोणी आव्हान दिलं की इतिहास घडवला जातो! आपल्या नगरच्या इंजिनिअरिंगवर आणि लुनाच्या ताकदीवर होणारे संशयाचे वार अरुण फिरोदिया यांना सहन झाले नाहीत. त्यांनी थेट एक अशी घोषणा केली, ज्याने दिल्लीपासून मुंबईपर्यंतच्या ऑटोमोबाईल क्षेत्रात खळबळ उडवून दिली. त्यांनी थेट आव्हान दिलं— ‘डेक्कन क्वीन रेल्वेला’! आमची लुना डेक्कन क्विन रेल्वेलाही हरवेल, अशी घोषणा त्यांनी केली. तेव्हा लोकांनी या घोषणेला फक्त प्रसिद्धी मिळवण्याचा स्टंट समजलं. ५० सीसीची लुना मोपेड सुपरफास्ट डेक्कन क्वीन रेल्वेशी स्पर्धा कशी करू शकेल? हा प्रश्न विचारला जाऊ लागला. ससा आणि कासवाच्या गोष्टीसारखीच ही स्पर्धाही देशभर गाजली…

अखेर स्पर्धेचा ऐतिहासिक दिवस उजाडला. पैजा लागल्या होत्या, कोट्यवधी रुपयांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पुणे रेल्वे स्टेशनवरून सकाळी ठीक ७ वाजून २० मिनिटांनी डेक्कन क्वीन रेल्वे मुंबईसाठी सुटली. त्याच सेकंदाला तत्कालीन विधान परिषदेचे अध्यक्ष जयंतराव टिळक यांना पुणे स्टेशनवरुन लुनाला हिरवा झेंडा दाखवला आणि शर्यतीला सुरुवात झाली. ही शर्यत दादर रेल्वे स्टेशनवर संपणार होती. त्याकाळचे जांबाज रायडर अफाक शेख यांनी नगरच्या लुनाला किक मारली आणि हायवेवरून मुंबईच्या दिशेने झेपावले! त्या काळात आजच्यासारखा गुळगुळीत ‘मुंबई-पुणे एक्सप्रेसवे’ नव्हता.

रस्ते अरुंद होते, जागोजागी ट्रॅफिक होतं. खरी परीक्षा होती ती ‘लोणावळा-खंडाळा घाटाची’! घाटात जेव्हा तीव्र चढण यायची, तेव्हा ५० सीसीचं छोटं इंजिन गरम व्हायचं, गती कमी व्हायची. पण रायडर अफाक शेख थांबले नाहीत. जेव्हा इंजिन कमी पडायचं, तेव्हा ते स्वतः पायाने सायकलसारखे पॅडल मारून इंजिनला बुस्ट द्यायचे! इकडे रेल्वे लोहमार्गावरून सुसाट धावत होती, तर तिकडे नगरच्या मातीत तयार झालेली लुना रस्त्यावरील खड्डे आणि ट्रॅफिक चिरडत पुढे जात होती. हा सामना आता जिद्दीचा होता!

तिकडे मुंबईच्या दादर स्टेशनवरही हजारो लोकांचा श्वास रोखला गेला होता. पत्रकार कॅमेरे घेऊन सज्ज होते. रेल्वे ट्रॅकवर अजून ट्रेनची शिट्टीही ऐकू आली नव्हती… आणि अचानक दादर स्टेशनच्या बाहेरील रस्त्यावर एक परिचित आवाज गुंजला… ‘टूर्र्र… टूर्र्र…’

लोकांनी पाहिलं आणि दादर स्टेशन टाळ्यांच्या कडकडाटाने आणि ‘नगर’च्या नावाने दुमदुमून गेलं..! कारण, डेक्कन क्वीन रेल्वे दादरला पोहोचण्याच्या तब्बल १५ ते २० मिनिटं आधी कायनेटिक लुनाने मुंबई गाठली होती!
होय! एका ५० सीसीच्या मोपेडने भारतातील सर्वात वेगवान एक्सप्रेस रेल्वेला धुळ चारली होती. दुसऱ्या दिवशी सर्व राष्ट्रीय वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर ही हेडलाईन छापून आली. या एका शर्यतीनं अख्ख्या भारतात नगरच्या इंजिनिअरिंगचा डंका वाजवला!

या ऐतिहासिक लुनाच्या जाहीरातीत — ‘चल मेरी लुना’! ही नवी ओळ अॅड झाली. ही केवळ जाहिरात नव्हती, ती प्रत्येक भारतीय मध्यमवर्गीयाच्या प्रगतीची गाथा बनली होती. काळाच्या ओघात पेट्रोलची लुना बंद झाली असली, तरी तिचा हा गौरवशाली इतिहास पुसला जाऊ शकत नाही. म्हणूनच कायनेटिक कंपनीने याच ऐतिहासिक वारशाला जपत, पुन्हा एकदा आपल्या नगरच्या मातीची शान वाढवण्यासाठी आधुनिक इलेक्ट्रिक ई-लुना बाजारात आणली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button