अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात आलाय. अर्ज भरण्यासाठी अवघे ३६ तास शिल्लक असताना, शनिवारी सोनईच्या ‘आमराईत’ असं काही घडलं, ज्याने संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय लक्ष वेधून घेतलंय. राजकारणातील दोन कट्टर विरोधक म्हणजेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील हे थेट शंकरराव गडाख यांच्या सोनईतील ‘आमराई’ कार्यालयात एकत्र आले.
तब्बल दोन तास या तीन दिग्गजांमध्ये गुप्त चर्चा रंगली. सहकाराच्या या सर्वात मोठ्या आखाड्यात ‘बिनविरोधचा फॉर्म्युला’ आकाराला येणार की राजकीय संघर्ष पेटणार? आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण या तीन नेत्यांचं जिल्हा बँकेच्या राजकारणातील महत्त्व आणि या गुप्त बैठकीमागचं नेमकं गणित सविस्तर समजून घेणार आहोत.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच जिल्ह्याची ‘आर्थिक वाहिनी’. ग्रामीण भागातील अर्थकारण, शेतकरी, साखर कारखाने आणि दूध संघ या सर्वांची सूत्रं या बँकेच्या हातात असतात. म्हणूनच या बँकेवर ताबा मिळवणं म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व गाजवणं, असं मानलं जातं. पण यंदा या बँकेची निवडणूक एका वेगळ्याच वळणावर आली आहे.
निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू होत्या. संगमनेरच्या बैठकीनंतर आता थेट सोनईच्या आमराईत ही बैठक झाली. राजकारणात एकमेकांचे पाणी जोखणारे हे नेते जेव्हा एका बंद खोलीत दोन तास चर्चा करतात, तेव्हा समजायचं की जिल्ह्याच्या राजकारणात काहीतरी खूप मोठं शिजतंय…
आता बोलूयात या बैठकीतील पहिल्या आणि सर्वात ज्येष्ठ नेत्याबद्दल… ते म्हणजे माजी मंत्री बाळासाहेब थोरात. थोरात हे केवळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाहीत, तर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील ‘चाणक्य’ मानले जातात. संगमनेर आणि आसपासच्या परिसरात सहकाराचं जाळं त्यांनी अत्यंत मजबुतीने विणलं आहे. जिल्हा बँकेवर त्यांची कित्येक वर्षांपासून मजबूत पकड आहे. यंदाच्या निवडणुकीतही सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांच्यावर ‘मुख्य समन्वयक’ म्हणून जबाबदारी सोपवली आहे. थोरात यांचा स्वभाव संयमी आणि सर्वांना एकत्र घेऊन जाण्याचा आहे. त्यामुळेच बँकेची निवडणूक बिनविरोध करायची असेल, तर बाळासाहेब थोरात यांच्या संमतीशिवाय आणि त्यांच्या नियोजनाशिवाय एक पाऊलही पुढे टाकता येत नाही, हे या बैठकीवरून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
बैठकीतील दुसरे महत्त्वाचे नेते म्हणजे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील. विखे पाटील घराण्याचा आणि सहकाराचा इतिहास हा महाराष्ट्राला नवीन नाही. आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू करणाऱ्या विखे घराण्याचा जिल्हा बँकेवर नेहमीच मोठा प्रभाव राहिला आहे. डॉ. सुजय विखे पाटील हे तरुण, उच्चशिक्षित आणि अत्यंत आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. विखे आणि थोरात यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण राज्याला माहीत आहे.
मात्र, या निवडणुकीत सुजय विखे पाटील यांना ‘सहसमन्वयक’ बनवण्यात आलं आहे. सहकाराच्या हितासाठी आणि बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सुजय विखे यांनी घेतलेली लवचिक भूमिका आणि ज्येष्ठ नेते थोरात यांच्यासोबत साधलेला संवाद हा त्यांच्या राजकीय परिपक्वतेची साक्ष देतो.
आता वळूयात या बैठकीचे यजमान… म्हणजेच माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे. गडाख यांचं सोनईतील ‘आमराई’ कार्यालय हे जिल्ह्याच्या राजकारणाचं नेहमीच केंद्रस्थान राहिलं आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचा वारसा चालवणारे शंकरराव हे नेवासा तालुक्याचे ‘किंगमेकर’ आहेत. जिल्हा बँकेच्या राजकारणात गडाख गटाची भूमिका नेहमीच निर्णायक ठरते.
विखे आणि थोरात या दोन परस्परविरोधी विचारसरणीच्या नेत्यांना आपल्या ‘आमराई’ गडावर एकत्र आणून चर्चा घडवून आणण्यात गडाख यांनी महत्त्वाची मध्यस्थाची भूमिका बजावली आहे. जिल्ह्याच्या सहकारात कोणा एकाची हुकूमशाही चालणार नाही, तर सर्वांचा सन्मान राखला जावा, यासाठी गडाख नेहमीच आग्रही असतात आणि या बैठकीतही त्यांनी तीच भूमिका मांडल्याची चर्चा आहे.
तर मित्रांनो, अर्ज मागे भरण्यासाठी आता केवळ ३६ तास शिल्लक आहेत. या ३६ तासांत सोनईच्या आमराईत ठरलेला ‘बिनविरोधचा फॉर्म्युला’ प्रत्यक्षात उतरणार का? जागावाटपाचं गणित कसं सुटणार? कोणत्या नेत्याला किती जागा मिळणार आणि बँक पूर्णपणे बिनविरोध होणार की काही जागांवर राजकीय आखाडा रंगणार, याचंच उत्तर आता मिळणार आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, की राजकीय मतभेद कितीही तीव्र असले, तरी जेव्हा जिल्ह्याच्या सहकाराचा प्रश्न येतो, तेव्हा थोरात, विखे आणि गडाख हे तिन्ही दिग्गज एकत्र येऊन जिल्ह्याला नवी दिशा देऊ शकतात, हे या बैठकीने दाखवून दिलं आहे.





