
नेवासा तालुक्यात जिल्हा बँक निवडणुकीत मोठी घडामोड घडलीय ! अंतिम दिवशी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी नेवासा तालुका विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
विशेष म्हणजे या मतदारसंघातून गडाख यांचाच एकमेव अर्ज राहिल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
नेवासा तालुक्यात या मतदारसंघात सुमारे १३० सेवा सोसायटी मतदार आहेत. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये उमेदवारीसाठी चुरस असताना नेवाशात मात्र एकच अर्ज दाखल झाल्याने या निवडणुकीची चर्चा रंगली आहे.
शंकरराव गडाख यांना सहकार क्षेत्राचा दीर्घ अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी जिल्हा सहकारी बँकेच्या चेअरमनपदाची जबाबदारीही सांभाळली आहे.
२००७ मध्ये त्यांच्या कार्यकाळात महिला बचत गटांना ४ टक्के व्याजदराने कर्जपुरवठ्याचा निर्णय घेण्यात आला होता. या एकमेव अर्जामुळे नेवासा सहकारातील गडाख यांच्या राजकीय-सामाजिक प्रभावाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.





