मैदानावर प्रचंड तणाव… करोडो भारतीयांचे श्वास रोखलेले… समोर इराणच्या संघाचं बलाढ्य आव्हान होतं. मॅच शेवटच्या ६० सेकंदावर आली होती. एका चुकीमुळे भारताचं सुवर्णपदक हातातून निसटणार होतं. अशा अत्यंत दबावाच्या क्षणी, भारताचा एक तरुण खेळाडू रेड मारण्यासाठी पुढे सरसावतो… त्याच्या डोळ्यात भीती नव्हती, तर एक जिद्द होती. तो मॅटवर वाघासारखा फिरतो आणि… एकाच चढाईत तब्बल दोन पॉईंट्स घेऊन अख्खा सामना भारताच्या बाजूने फिरवतो..! हा खेळाडू दुसरा कोणी नसून नगरच्या मातीतला, श्रीरामपूरच्या टाकळीभानचा अस्लम इनामदार होता..! पण मित्रांनो, टीव्हीवर दिसणारं हे सुवर्णपदक आणि हा झगमगाट, ही या कहाणीची फक्त सुरुवात आहे. या चमचमत्या सोन्याच्या मागे लपलाय एक असा भयानक संघर्ष, जो आजपर्यंत कोणत्याही मुख्य प्रवाहातील बातमीने तुम्हाला पूर्णपणे सांगितलेला नाही. चहाच्या टपरीवर ग्लास धुणाऱ्या एका पोराचा आशियाई क्रीडा स्पर्धेचा ‘महानायक’ बनण्याचा हा प्रवास… आज आपण अगदी जवळून अनुभवणार आहोत!
अस्लम इनामदार… आज हे नाव जगाला माहिती आहे. पण या नावाचा पाया रचला गेलाय अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातल्या टाकळीभान या छोट्याशा गावात. वर्ष होतं २०११. अस्लम अवघा ११ वर्षांचा होता. अचानक एका वादळाने या हसत्या-खेळत्या कुटुंबाला उद्ध्वस्त केलं. अस्लमच्या वडिलांचं छत्र हरपलं. घरात कमावणारं दुसरं कोणीच नव्हतं. तीन लहान मुलं आणि पदरात फक्त गरिबी.
अशा वेळी अस्लमच्या पाठीशी उभी राहिली त्याची माऊली—झाकिरा इनामदार. लोकांच्या घरी जाऊन धुणी-भांडी करणं, लोकांच्या शेतात मजुरी करणं, हे त्यांच्या रोजच्या आयुष्याचं वास्तव होतं. अनेक रात्री अशा गेल्या, जेव्हा घरातल्या पोरांच्या पोटात अन्न होतं, पण आई उपाशी झोपली होती. आईच्या हाताला पडलेले घट्टे पाहून अस्लमच्या मनात एक आग पेटत होती – काहीतरी करायचं, या गरिबीला लाथ मारून बाहेर पडायचं!
पण पोट कसं भरणार? शालेय वयात, जेव्हा मुलं खेळतात, अभ्यास करतात, तेव्हा अस्लम एका छोट्या हॉटेलमध्ये, एका चहाच्या टपरीवर काम करू लागला. उष्टे ग्लास धुणे, टेबल साफ करणे या कामातून मिळणाऱ्या काही रुपयांवर घर चालत होतं. अनेकदा गावातले लोक त्याला टपरीवर काम करताना पाहायचे. पण कोणालाच ठाऊक नव्हतं की, चहाचे कप धुणाऱ्या याच हातांमध्ये एक दिवस भारताचा तिरंगा फडकवण्याची ताकद निर्माण होणार आहे!
कुठल्याही यशस्वी माणसाच्या मागे एक असा चेहरा असतो, जो स्वतः अंधारात राहून दुसऱ्याला प्रकाशात आणतो. अस्लमच्या आयुष्यातला तो ‘सायलंट हिरो’ म्हणजे त्याचा मोठा भाऊ. भावाला स्वतःला कबड्डीची प्रचंड आवड होती. पण जेव्हा घरात दोन वेळच्या अन्नाची भ्रांत होती, तेव्हा मोठ्या भावाने एक अत्यंत कठीण निर्णय घेतला. त्याने स्वतःचा खेळ बाजूला ठेवला, कष्ट करायला सुरुवात केली, जेणेकरून लहान भाऊ म्हणजेच आपला अस्लम मैदानावर जाऊ शकेल!
बातम्यांमध्ये फक्त प्रो-कबड्डीचे मँटवरील सामने दाखवले जातात. पण अस्लमची खरी परीक्षा श्रीरामपूरच्या स्थानिक मैदानांवर झाली. तिथे मॅट नव्हती, तिथे होती फक्त माती… पायात घालायला शूज नव्हते. अनवाणी पायाने, उन्हातान्हात अस्लम तासनतास सराव करायचा. पाय अक्षरशः रक्तभंबाळ व्हायचे, पण थांबणं अस्लमला ठाऊक नव्हतं. भावाने दिलेली एकच शिकवण होती—’तू फक्त खेळ, बाकी मी बघून घेईन!
आता आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहोत, जी ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. राज्य पातळीवर खेळण्यासाठी जेव्हा प्रवासाचे पैसे नसायचे, तेव्हा अस्लम रेल्वेच्या जनरल डब्यातून तिकीट न काढता, टीसीच्या भीतीने अनेकदा सीटच्या खाली, जमिनीवर झोपून प्रवास करायचे. भुकेची जाणीव होऊ नये म्हणून फक्त पाणी पिऊन दिवस काढायचे. हा तो संघर्ष आहे, जो अस्लमला ‘इनामदार’ बनवून गेला!
प्रवास सुरू झाला होता, पण नियतीला अस्लमची आणखी एक कठीण परीक्षा घ्यायची होती. अस्लमनं खेळासाठी श्रीरामपूर सोडून थेट ठाणं गाठलं. तो २०१४ चा काळ… अस्लमच्या खेळाची चर्चा सुरू झालीच होती की, एका स्थानिक सामन्यादरम्यान त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांनी सांगितलं—’पाय फ्रॅक्चर झालाय, शस्त्रक्रिया करावी लागेल.’ एका गरिबाच्या घरात हा शब्द म्हणजे बॉम्ब पडल्यासारखा होता. ऑपरेशनसाठी लागणारे हजारो रुपये आणायचे कुठून? अस्लम तब्बल २ ते ३ वर्षे मैदानापासून दूर होता. विचार करा, एका उदयोन्मुख खेळाडूची ऐन उमेदीची तीन वर्ष घरात बसून गेली. नातेवाईक, आजूबाजूचे लोक म्हणू लागले, ‘आता याचं करिअर संपलं. खेळून काय पोट भरणार आहे का? टपरीवरच काम करू दे पुन्हा. पण आईचा विश्वास आणि भावाची जिद्द कायम होती. अखेर, एका शासकीय योजनेच्या मदतीने आणि काही चांगल्या लोकांच्या सहकार्याने त्याच्या पायावर शस्त्रक्रिया झाली. लोक म्हणत होते तो कधी उभा राहू शकणार नाही, पण अस्लमने मैदानावर असा काही कमबॅक केला की टीका करणाऱ्यांची तोंडं कायमची बंद झाली. ठाण्याच्या वासिंदमधील ‘जय बजरंग क्लब’ आणि पुढे अशोक शिंदे सरांचे मार्गदर्शन… अस्लमची घोडदौड आता थांबणार नव्हती! प्रो कबड्डीमध्ये त्यानं आपलं सीझन गाजवलं आणि कर्णधारम म्हणून पुणेरी पलटनला विजेतेपद मिळवून दिलं. कबड्डीच्या स्थानिक सामने खेळायला जाताना तिकीटासाठी खिशात पैसे नसायचे. तेव्हा अस्लमनं रेल्वेच्या सीटखाली झोपून प्रवास केला. परंतु प्रो कबड्डीच्या ९ व्या सिझनमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यानं पहिल्यांदा महागडी कार जिंकली. परंतु या महागड्या कारच्या पुढच्या सीटवर बसून त्यानं आपल्या आईला फिरवलं.
पण एवढ्यावर थांबणं अस्लमला मान्य नव्हतं. तो थेट भारतीय राष्ट्रीय संघात गेला. आणि उजाडला २०२६ च्या आशियायी क्रिडा स्पर्धेच्या कबड्डीच्या फायनल मॅचचा तो ऐतिहासिक दिवस… आशियाई क्रीडा स्पर्धेची फायनल मॅच! भारत विरुद्ध इराण. इराणचा संघ भारताला तगडी फाईट देत होता. सामन्याची शेवटची काही मिनिटं शिल्लक असताना स्कोअर अत्यंत अटीतटीचा होता. भारत केवळ काही पॉईंट्सने पुढे-मागे होत होता. संपूर्ण देशाचे डोळे टीव्ही स्क्रीनला खिळले होते. अशा वेळी कर्णधार आणि देशाचा मुख्य रेडर म्हणून अस्लम इनामदार कोर्टवर येतो. मैदानावर इराणचे सात डिफेंडर्स साखळी करून उभे होते. अस्लमने दीर्घ श्वास घेतला… त्याला या क्षणी फक्त समोरचे डिफेंडर्स दिसत नव्हते, तर त्याला दिसत होते टाकळीभानचे ते गरिबीचे दिवस, आईचे धुणी-भांडी करतानाचे कष्ट, भावाने केलेला त्याग आणि चहाच्या टपरीवर घालवलेल्या त्या रात्री!
अस्लमने डाव्या कोपऱ्यातून चढाई केली… इराणच्या खेळाडूंनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण अस्लमने हवेत सूर मारला आणि एकाच वेळी इराणच्या दोन तगड्या डिफेंडर्सना चकवून मिडल लाईनला स्पर्श केला! टू पॉईंट्स! डायरेक्ट दोन पॉईंट्स! या एका चढाईने सामन्याचे चित्र संपूर्णपणे पलटवले. भारताने इराणवर ३-४ पॉईंट्सची निर्णायक आघाडी घेतली आणि पुढच्या काही सेकंदात भारताने सुवर्णपदकावर नाव कोरलं!
टाकळीभानच्या मातीतून निघालेलं एक पोरगं, आज जगाच्या पाठीवर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावत उभं होतं. ज्या हातांनी कधी चहाचे ग्लास धुतले, त्याच हातांनी आज देशासाठी सोन्याचं पदक जिंकलं होतं. अस्लम इनामदारची ही कहाणी आपल्याला शिकवते की, तुमची परिस्थिती कितीही गरिबीची असो, जर तुमच्याकडे जिद्द असेल आणि पाठीशी कुटुंबाची साथ असेल, तर तुम्ही जगातील कोणतीही लढाई जिंकू शकता!





