
दुष्काळी परिस्थिती आणि घटलेल्या जलसाठ्याच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या आदेशानुसार १६ ऑक्टोबरपासून पाण्यात १० टक्के कपात केली जाणार आहे. मात्र, नागरिकांना होणारा दिवसाआडचा पाणीपुरवठा कायम ठेवण्यात येणार आहे.
शहराला मुळा धरणातून पाणी मिळते. जलवाहिनी आणि अंतर्गत वितरण व्यवस्थेतील गळती तातडीने रोखण्यावर महापालिका भर देणार आहे. नळांना तोट्या बसवणे, टाक्या ओसंडून वाहू न देणे आणि अनावश्यक पाणी वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील भूजल पातळीही चिंताजनक स्थितीत पोहोचली आहे. ताज्या अहवालानुसार जिल्ह्याची सरासरी भूजल पातळी तब्बल २.८० मीटरने खालावली आहे. नगर तालुक्यात ४.८७ मीटर, जामखेडमध्ये ४.७८ मीटर आणि शेवगावमध्ये ३.८८ मीटर घट नोंदवली गेली आहे. पाऊस कमी राहिल्यास टंचाई आणि चाराटंचाई आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.





