Latest

मृत्यूच्या दारातून परतली मर्दानी…..भरधाव ट्रकच्या धडकेनंतर तरुणीने दाखवलेली हिंमत पाहून सारेच थक्क ! श्रीरामपूरातील अपघाताचा व्हिडीओ व्हायरल…

भरधाव ट्रकची जोरदार धडक, स्कूटीवरून हवेत उडालेली तरुणी आणि समोर मृत्यूचं संकट… पण तिने दाखवलेल्या हिमतीमुळे तिचा जीव वाचला! श्रीरामपूरमधील या थरारक अपघाताची सध्या चर्चा सुरू आहे.

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्रमांक ७, बेलापूर रोडवर ही घटना घडली. बोरावके यांच्या घराकडे वळत असताना स्कूटीवरून जाणाऱ्या तरुणीला वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेमुळे तरुणी हवेत उडाली आणि ट्रकच्या समोरच खाली पडण्याची वेळ आली.

मात्र, संकटाच्या त्या क्षणी तिने प्रसंगावधान राखत ट्रकच्या पुढील बंपरला घट्ट पकडलं. त्यामुळे ती ट्रकच्या चाकाखाली येण्यापासून बचावली. विशेष म्हणजे, स्वतःचा जीव वाचवल्यानंतर ती तरुणी स्वतः उठली आणि स्कूटी उभी केली. तिच्या धाडसाचं उपस्थितांनी कौतुक केलं.

मात्र, मदत करण्याऐवजी ट्रकचालकाने तिच्यावर दादागिरी केल्याचा आरोप आहे. नागरिकांनी तरुणीची बाजू घेतल्यानंतर चालकाने तेथून काढता पाय घेतला. प्रत्यक्षदर्शींनुसार, ट्रकला नंबरप्लेटही नव्हती. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाल्याची माहिती नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button