
राहुरी तालुक्यातून अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाथरूमला जाऊन येते, असं आईला सांगून घराबाहेर पडलेली १४ वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाली. या घटनेमुळे कुटुंबीय चिंतेत पडले आणि मुलीचा परिसरात शोध सुरू झाला.
६ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मुलगी कुठेही आढळून न आल्याने तिच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुरुवातीला अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम १३७ (२) नुसार अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मुलीचा शोध घेतला. तपासादरम्यान नेवासा तालुक्यातील चांदा येथील २७ वर्षीय अक्षय गोविंद शिंदे याचे नाव समोर आले. पोलिसांनी आरोपी आणि मुलीला ताब्यात घेतले असून, मुलीला नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
या प्रकरणात आरोपीविरोधात पॉस्को कायद्याची वाढीव कलमे लावण्यात आली आहेत. पोलीस उपनिरीक्षक मनोज आहिरे पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.





