
अहिल्यानगर जिल्ह्यातील ७५३ ग्रामपंचायतींचा कारभार पुन्हा गतीमान होणार आहे. मंडळी, ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय समित्यांची मुदत संपल्यामुळे गेल्या काही काळापासून गावपातळीवरील विकासकामांवर परिणाम झाला होता.
आता शासनाने ८ सप्टेंबर रोजी राजपत्र जारी करून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर विस्तार अधिकारी किंवा अन्य शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या माध्यमातून पुढील दोन दिवसांत ७५३ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केले जाणार आहेत. कृषी, आरोग्य, शिक्षण, पंचायत विभागातील विस्तार अधिकारी किंवा इतर शासकीय अधिकाऱ्यांना ही जबाबदारी दिली जाऊ शकते.
महत्त्वाची बाब म्हणजे, यापूर्वीच्या प्रशासकीय समित्यांकडे आर्थिक अधिकार नव्हते. मात्र नव्या प्रशासकांना आर्थिक अधिकार मिळणार असल्याने रस्ते आणि इतर रखडलेली विकासकामे पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
नियुक्त अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत कारभाराचे तातडीने प्रशिक्षणही दिले जाणार आहे.





