
गणेश मंडळांनो, बाप्पांच्या रोषणाईसाठी घेतलेली एक छोटीशी शॉर्टकट पद्धत तुम्हाला थेट तुरुंगात पोहोचवू शकते! मंडळी, यंदाच्या गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवासाठी महावितरणने तात्पुरत्या वीज जोडणीचे नियम कडक केले आहेत.
सार्वजनिक गणेश मंडळांसह धार्मिक उत्सवांसाठी तात्पुरती वीज जोडणी घेताना ‘प्री-पेड स्मार्ट मीटर’ बंधनकारक करण्यात आले आहे. म्हणजे आधी वीज वापरासाठी रिचार्ज करायचा आणि त्यानंतरच वीज वापरता येणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे, मंडप किंवा रोषणाईसाठी अनधिकृतपणे वीज घेतल्यास वीज चोरीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. यामध्ये सहा महिन्यांपर्यंत कारावास आणि १० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.
पावसाळ्यात मंडप आणि विद्युत रोषणाई करताना विशेष काळजी घ्या. विद्युत व्यवस्था अधिकृत वीज कंत्राटदाराकडूनच करून घ्या. शॉर्टसर्किट आणि विद्युत अपघात टाळण्यासाठी अधिकृत वीजजोडणी घ्या आणि बाप्पांचा उत्सव सुरक्षितपणे साजरा करा.





