
अहिल्यानगर महानगरपालिकेतील कामगार-कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. संपाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला आहे.
दिवाळीच्या आठ दिवस आधीचं प्रत्येक कर्मचाऱ्याला ११ हजार २५० रुपयांचे सानुग्रह अनुदान एकरकमी देण्यात येणार आहे. बोनस आणि सानुग्रह अनुदानाच्या मागणीसाठी महानगरपालिका कामगार युनियनने ७ ऑगस्ट रोजी आयुक्तांना संपाची नोटीस दिली होती.
यानंतर आयुक्त यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय झाला. त्यासोबतच कर्मचाऱ्यांना मिळणारे सण अग्रिम दिवाळीच्या १५ दिवस आधी देण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.
महापालिकेची वसुली आणि उपलब्ध निधीनुसार कर्मचाऱ्यांची थकीत देणीही टप्प्याटप्प्याने अदा केली जाणार आहेत. म्हणजेच, दिवाळीच्या तोंडावर महापालिका कर्मचाऱ्यांना अनुदानासोबत आर्थिक दिलासाही मिळणार आहे.





