
संगमनेरच्या राजकारणात एका सोशल मीडिया पोस्टवरून वातावरण तापलं आहे. आमदार अमोल खताळ यांच्या विरोधात भावपूर्ण श्रद्धांजलीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकारामुळे खताळ चांगलेच संतापले असून, त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
“आतापर्यंत कायद्याचा सन्मान करून शांत होतो; मात्र आता शांत बसणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. या पोस्टमागे नेमकं कोण आहे, याचा शोध घेतल्याचाही दावा खताळ यांनी केला.
या प्रकरणाचा त्यांच्या राजकारणाशी संबंध जोडला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. संबंधित व्यक्तीशी आपला कोणताही आर्थिक व्यवहार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
तसंच, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीचा मोबाईल आणि संपर्क तपासण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कायदेशीर कारवाईबाबत पुढील पाऊल उचलणार असल्याचं खताळ यांनी सांगितलं. त्यामुळे संगमनेरच्या राजकारणात हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.





